निकाल लागून आठवडा होण्याच्या आधीच इंडी आघाडी फुटली; 'या' दोन मोठ्या पक्षात वाद

    07-Jun-2024
Total Views |
 INDI
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकांचे निकाल लागून आठवडाही झाला नाही, त्यातचं आता इंडी आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. राजधानी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची युती तुटली आहे. आम आदमी पक्षाने आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्षामध्ये युती होणार नसल्याचे जाहीर केले आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकला चलोची भूमिका घेतली आहे.
 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने दिल्ली आणि गुजरातमध्ये एकत्र निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही पक्षांना दारुण पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाने दिल्लीत आमदारांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आम आदमी पक्षाने काँग्रेससोबतची युती तोडत विधानसभा निवडणुकीत एकट्याने लढण्याची घोषणा केली.
 
 
दिल्ली सरकारमध्ये मंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र विधानसभा निवडणूक आम्ही एकटेच लढवू. ते पुढे म्हणाले की, ही युती लोकसभा निवडणुकीपर्यंत राहणार हे आधीच ठरले होते. लोकसभेची निवडणूक आम्ही प्रामाणिकपणे लढवली होती. मात्र आता ही युती पुढे कायम राहणार नाही.
 
दिल्लीच्या जनतेसोबत मिळून ही लढाई आम्ही जिंकू, असे गोपाल राय म्हणाले. आम आदमी पक्ष संपूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक एकटाच लढवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणूक इंडी आघाडी सोबत लढवली होती. दिल्लीत काँग्रेसने तीन जागा लढवल्या होत्या आणि आम आदमी पक्षाने चार जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना सर्व जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले आणि दिल्लीच्या सातही जागांवर भाजपनं मोठ्या मताधिक्यासह विजय मिळवला.