प्रयत्नान्ती परमेश्वर...

    03-Jun-2024
Total Views |
Parents and children

नैराश्य हे केवळ प्रौढांपुरते मर्यादित नाही, तर हल्ली विद्यार्थीदशेतही कित्येकांना नैराश्याने, अपयशाने ग्रासलेले दिसते. त्यातूनच मग आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत काही तरुण-तरुणींची मजल जाते. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव आपले पाल्य नैराश्येकडे झुकण्याचे पुसटसे देखील संकेत असतील, तरी पालकांनी तातडीने त्यांच्याशी संवाद योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. यासंबंधी पालक आणि पाल्यांना मार्गदर्शन करणारा लेख...

पालकांची मुलांच्या बाबतीत विकासाची मानसिकता असणे महत्त्वाचे. म्हणजेच, अयशस्वी झाल्यानंतर त्यांच्या मुलांशी संवाद साधताना, पालकांचा असा विश्वास असायला हवा की, बुद्धिमत्ता आणि क्षमता कायमसाठी निश्चित नसते. त्यात मुलामुलांमध्ये चढउतार दिसत असतात. त्याची पातळी कमीजास्त पातळी असू शकते. पण, प्रयत्न आणि चिकाटीने शालेय यश वृद्धिंगत होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या मते, मुले पालकांच्या प्रतिसादाचे निरीक्षण करून अपयश सकारात्मक की नकारात्मक असायला हवे की नाही, हे शिकतात. उदाहरणार्थ, जे पालक त्यांची मुले कमी मार्क्स किंवा ग्रेडसह घरी येतात, तेव्हा सामान्यत: चिंता, निराशा आणि राग दर्शवतात. याच्याविरुद्ध जे पालक शिकण्यावर लक्ष केंद्रित करतात, ते त्यांच्या मुलांना सूचित करतात की, शिकून आणि अभ्यासातील सुधारणेद्वारे शैक्षणिक बुद्धिमत्ता तयार होऊ शकते. अपयश हा जीवनाचा एक सामान्य घटक आहे. जेव्हा मुलांच्या मनात अयशस्वी होण्याची भीती असते, तेव्हा त्यांना चिंता आणि उदास होण्याचा धोका अधिक असतो. मुलांना अयशस्वी होण्यास शिकवणे आणि परत बाउन्स करण्यास शिकवणे, त्यांना अधिक मजबूत करू शकते. कारण, जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अपयश अधिक सक्षम बनवते.
 
पालक मुलांना अपयशाच्या दहशतीतून सुटावयास कसे शिकवतात? हे खरे तर कठीण आहे. परंतु, पालकांनी मुलांच्या अपयशात जास्त ना गुंतता थोडे मागे हटण्याचा प्रयत्न करणे आणि अपयशाशी हुज्जत घालण्यासाठी जागा देणे आवश्यक आहे. जर तुम्ही नेहमी त्यांना कुरवाळत बसाल आणि त्यांना नापास न होण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर ते कधी अयशस्वी होऊ शकत नाहीत आणि पुन्हा प्रयत्न करू शकत नाहीत. हा एक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा अनुभव आहे, जो त्यांनी शिकण्याची गरज आहे. प्रथम, त्यांच्या त्या अपयशाच्या क्षणी असलेल्या भावनांचे निराकरण करा. त्यांना राग, दुःखी किंवा निराशा वाटू शकते. त्यांना कळू द्या की, अगदी प्रौढांसाठीही निराश होणे सामान्य आहे आणि यशस्वी होण्याची त्यांची इच्छा ही एक मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुमचे मूल एखाद्या गोष्टीत अयशस्वी होते, तेव्हा त्यांना कळू द्या की, ते किती निराश आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत, हे तुम्हालाही माहित आहे. जेव्हा तुम्ही त्यांना कसे वाटते ते सांगता, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना त्या भावनांवर मात करण्याची आणि पुढे जाण्याची संधी देत असतो. पालकांचा हा दृष्टिकोन आपल्या मुलांना त्यांच्या भावना ओळखण्यास आणि त्यातून बाहेर येण्यास मदत करते. आपल्या मुलाला नकारात्मक भावना अधिक स्वीकारण्यास शिकवते. त्यांना शांत राहण्यास आणि त्या भावना हाताळण्यास मदत करू शकते.
 
पालकांनी केवळ मुलांच्या वाढीच्या मानसिकतेवर विश्वास ठेवला पाहिजे, असे नाही, तर त्यांनी त्यांच्या मुलांना अपयशानंतरही तुम्ही सुधारू शकतात आणि विकसित होऊ शकतो, या विश्वासानुसार प्रतिसादही दिला. तुमच्या चिंता, निराशा किंवा शिक्षा करण्याच्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिल्यास ते अपयशानंतर यशस्वी होऊ शकतात, यावर विश्वास ठेवण्यास शिकणार नाहीत. म्हणून , आपल्या स्वतःच्या नकारात्मक भावनांशिवाय त्यांना प्रतिसाद द्या. स्मित करा, जर ते ऐकण्याच्या ग्रहणक्षम मनःस्थितीत असतील, तर त्यांच्याबरोबर यशस्वी लोकांच्या अपयशांची यादी आणि त्यांनी त्यांच्या नकारात्मक अनुभवांचे यशोगाथेत कसे रूपांतर केले, ते समजावून सांगा. दुर्दैवाने, जसजसे जग मुलांवर विजेते होण्यासाठी प्रचंड दबाव वाढवते आणि पालकांना शक्य तितक्या सर्व प्रकारे त्यांना यशस्वी करण्याची सक्ती आणते, तसतसे आपण अधिकाधिक मुले पाहत आहोत जी अगदी लहानशा अपयशामुळे आणि चुकांमुळेही अस्वस्थ होतात. तुमचे सर्व लक्ष तुमच्या मुलाच्या अंतिम ध्येयावर केंद्रित करण्याऐवजी, त्यांच्या अथक प्रयत्नांवर जोर देण्यासाठी त्यांना अधिक प्रेरणा आणि ऊर्जा द्या. त्यांना अयशस्वी होण्याचा अधिकार आहे, हे कबूल करा. त्यांनी किती कठोर परिश्रम केले आहेत आणि ते प्रयत्न करण्यासाठी त्यांच्याकडे किती धैर्य आहे, हे त्यांना जाणवू द्या. हा दृष्टिकोन मुलांना प्रयत्न करून मिळू शकणार्‍या आनंदावर आणि त्यांच्या आवडींवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करते.

स्पष्टपणे सांगावयाचे तर, कष्ट, त्रास किंवा निराशा सहन करणे हे एक अमूल्य जीवन कौशल्य आहे. जेव्हा शिक्षणाचा व शाळेचा प्रश्न येतो, तेव्हा अपूर्णतः सहन करण्याची क्षमता, एखादी गोष्ट तुमच्या इच्छेनुसार होईलच, असे नाही, ही जाणीव आणि शिकणे ही प्रक्रिया महत्त्वाची असते, हे समजणे गरजेचे. मुलांना फक्त कसे जिंकायचे, एवढेच नाही तर कसे हरायचे, हे देखील लहानपणापासून शिकवणे महत्त्वाचे. अयशस्वी होणे हा एक आव्हानात्मक अनुभव असू शकतो आणि कधीकधी तो मन जरी दुखावतो तरी मुलांना गंभीर विचार आणि लवचिकता कशी विकसित करायची, हे सुद्धा शिकवतो. जरी सुरुवातीला तुमचे मूल यशस्वी झाले नाही, तर त्यांनी पुनःपुन्हा प्रयत्न केल्यास ते यशस्वी होतील आणि अधिक कुशल बनतील. तुमच्या मुलांना विश्वास द्या की, तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात. जेव्हा मुले त्यांच्या दृष्टिकोनात काय बदल केले जाऊ शकतात, हे समजावून घेतील, तेव्हा ते स्वतःमध्ये नसलेल्या अनेक गोष्टी ज्या बदलायची गरज आहे, त्या ओळखतील. स्वतःला दोषी न मानता, त्या बदलायचा प्रयत्न करतील. ‘प्रयत्नान्ती परमेश्वर’ हे अमूल्य तत्त्व मग तेही समजून घेतील.
 
 
डॉ. शुभांगी पारकर