योगिक-संतोष

    10-Jun-2024
Total Views |
yogsadhana
 

योगसाधनेतील पहिला नियम अर्थात शौच याविषयी आपण मागील लेखात जाणून घेतले. दुसरा नियम संतोष हा आहे. याविषयी आपल्या मनात निश्चितपणे शंका येईल. कारण, संतोष हा तर मनाचा भाव आहे. तो नियम कसा होऊ शकतो? पण, सखोल विचारांती असं पटतं की तो नियमच आहे. त्याविषयी सविस्तर...

असं! तर आपल्यासमोर असणार्‍या प्रत्येक परिस्थितीचे दोन भाग असतात. पहिला भाग आपल्या अधिपत्याखालील परिस्थिती व दुसरा भाग आपल्या अधिपत्याबाहेर असलेली परिस्थिती. उदाहरणार्थ, एखाद्या नोकरदार माणसाच्या बाबतीत, साहेबांनी आज काय काम करावं, हे हाताखालील क्लार्कच्या अधिपत्याखाली नसतं. त्याला नेमून दिलेले काम करणे, एवढेच त्याच्या अधिपत्याखाली आहे. त्याने साहेबांनी आज काय करावं, या विषयावर आपली शक्ती, बुद्धी खर्च करू नये. ती आपल्याला नेमून दिलेल्या कामावर खर्च करावी. म्हणजे, ते काम उत्तम होऊन आनंद निर्माण होईल व संतोष मिळेल. असं आपल्यासमोरील प्रत्येक परिस्थितीचे पृथ:करण कर्म सुरू करण्यापूर्वी करावं. म्हणजे, आपल्या क्रियाशक्तीचा योग्य रितीने वापर होऊन हातातील कर्म उत्तम होईल. कर्म उत्तम झाल्यामुळे आनंदाची निर्मिती होऊन मनाचा संतोष वाढेल. यालाच ‘विवेक’ म्हणतात, अन्यथा कार्य उत्तम न झाल्याने खेद निर्माण होऊन असंतोष वाढेल.

या पृथ:करण करण्याच्या कृतीत आपले एक विशिष्ट प्रकारचे खुले, निर्णायक लक्ष्य धारण करणे समाविष्ट आहे. लक्ष केंद्रित करणे, इतर गोष्टींबरोबरच, एखाद्याला काय वाटते किंवा हवे आहे हे स्पष्ट होण्यासाठी, एखाद्याच्या परिस्थितीबद्दल नवीन अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी आणि परिस्थितीतील बदल किंवा उपचारांना उत्तेजन देण्यासाठी हे तंत्र वापरून हातातील कार्य उत्तम होऊ शकतं व आपली कार्यतत्परता वाढली जाऊ शकते. ज्यामुळे संतोष आपल्या स्वभावाचा स्थिरभाव बनेल.

संतोषबाबत भक्तिमार्गात भगवंत भागवताच्या एकादश स्कंधात म्हणतात, “माझ्या भक्तीनें अंत:करणांत जे स्वाभाविक सुख प्राप्त होते, ते संपत्ती किंवा विपत्ती आली तरी सर्वत्र समभाव झाल्याने संतोषच उत्पन्न करते. त्यासाठी भक्त व्हावं लागतं. भक्तांची लक्षणे जो विभक्त नाही तो भक्त. जो परमेश्वराकडून मिळणार्‍या भेटीविषयी आसक्त नसून, त्याच्या प्रेमाविषयी आसक्त आहे. आपल्या प्रत्येक कर्मात जो भगवंताचे अधिष्ठान ठेवतो, तो भक्त. त्यासाठी भगवंत आहे ही परमश्रद्धा मनात पाहिजे. त्याविषयी संशय असणार्‍या व्यक्तींना ते जमणार नाही.” ‘संशयात्मा विनश्यती’ असं श्रीभगवद्गीतेत भगवंत सांगतात.

त्यासाठी खाता, पिता, उठता बसता, कर्म करता परमेश्वर माझ्यासोबत आहे, ही जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे व आपलं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करून जगण्यात खरा आनंद आहे. त्याला अर्पण करायचा आहे, ही भावना जागृत झाली की, माणसाचं प्रत्येक कर्म हे सात्त्विकच होईल. ज्या कर्मामुळे कोणीही दुखावले जाणार नाही, कोणाचाही उपमर्द होणार नाही. कर्म भगवंताला अर्पण केल्यामुळे ‘कर्मण्ये वा धिकारस्ते, मा फलेशू कदाचन’ ही वृत्ती जोपासली जाईल. मग वरील उक्तीप्रमाणे सर्वत्र समभाव झाल्याने संतोषच उत्पन्न होईल. म्हणून भक्ती म्हणजे काय व भक्तांची लक्षणे कोणती, हे बघणे जरूरीचे आहे. ते असे:

भक्ती: सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो
मत्तःस्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्योवेदान्त
कृद्वेदविदेव चाहम्॥
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५ श्लोक -१५)
अर्थ : मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे.

यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत!!
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५ श्लोक १९)
अर्थ : हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्त्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो.

ही श्रद्धा वृद्धिंगत झालेल्या भक्तांची लक्षणे

निरपेक्षता आणि माझे मनन। शांती आणि समदर्शन। पांचवें ते निर्वेर जाण। पंचलक्षण हे मुख्यत्वें॥ १८०-१४ एकनाथी भागवत॥
हा समभाव होण्यास॥
सुख दु:खे समेकृत्वा, लाभालाभो जयोजया:॥
ही धारणा जोपासावी लागते. त्यासाठी हे दृश्य जग नश्वर आहे, हे सत्य पचवावं लागतं. म्हणून आध्यात्मिक विचार हा श्रेष्ठ ठरतो.
संतोष निर्माण होण्यासाठी अशी सर्व मनांची मशागत केल्यानेच संतोष प्राप्त होतो, नव्हे तो मग आपल्या मागेच लागतो.

डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५