ओसामा बिन लादेनचा फोटो, इसिसचा जिहादी व्हिडिओ, अब्दुलला मिळाला जामीन! कोर्ट म्हणाले, "कुणी फक्त..."

    08-May-2024
Total Views |

ISIS
 
 
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने दहशतवादाशी निगडीत UAPA प्रकरणास सोमवार, दि. ६ मे रोजी सुनावणी केली. यात अम्मार अब्दुल रहमानला जामीन मिळाला आहे. हा तरुण इसिसशी निगडीत असल्याच्या संशयावरुन त्याला अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने म्हटले की, "ओसामा बीन लादेनचा फोटो, जिहाद प्रचार आणि इसिसचा झेंडा ठेवला म्हणून कुणी दहशतवादी होत नाही."
 
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ओसामा बिन लादेन, आणि जिहाद प्रचाराची सामग्री तसेच इसिसच्या झेंड्यासारखी आक्षेपार्ह सामग्री बाळगली म्हणजे त्याला दहशतवादी ठरविता येणार नाही. उच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, "आज इलेक्ट्रॉनिक युगातील या प्रकारात अशी आपत्तीजनक सामग्री इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे ती कुणीही बाळगू शकतो.

त्यामुळे यामुळे त्याचा इसिसशी किंवा अन्य कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असेल, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे हा काही गुन्हा ठरू शकत नाही. यामुळे व्यक्तीच्या मानसिकतेचा ठावठिकाणा समजू शकेल. परंतू यामुळे कुठल्याही प्रकारची शिक्षा त्याला देता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणात अन्य कुठल्या ठोस पुराव्याविना आरोपीला शिक्षा देता येणार नाही."


संबंधित व्यक्ती हा मध्य पूर्वेतील इस्त्रायल फिलिस्तानी युद्धातील बातम्या पाहत होता. त्याबद्दल इतर मजकूर पहात होता. तसेच कट्टरपंथी मुस्लीम उपदेशकांची भाषणे ऐकत होता. तो गुन्हेगार ठरविण्यासाठी इतक्या गोष्टी पुरेश्या नाहीत की तो दहशतवादाला समर्थन देत आहे. खंडपीठाने म्हटले की, UAPA अंतर्गत कलम ३८ आणि ३९चा दुरुपयोग होऊ शकतो.
 
अम्मार अब्दुल रहमानला न्यायालयाने जामीन मंजूर केला. रहेमानला एनआयएने युएपीए अंतर्गत २०२१मध्ये अटक केली होती. त्याच्यावर इसिसशी संबंधित असल्याचा आणि त्यांचा प्रचार केल्याचा आरोप होता. यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये त्याला न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.