बोरिवलीच्या इतिहास कट्टावर अवतरल्या शिवछत्रपतींच्या अष्टराज्ञी

    17-May-2024
Total Views |

itihas katta 
 
मुंबई : "शिवछत्रपतींच्या दैदीप्यमान तेजस्वी व्यक्तिचरित्राच्या प्रभावळीत आपल्याला त्यांचा परिवार मात्र काहीसा झाकोळलेला दिसून येतो. महाराजांच्या जीवनातील स्त्रीशक्तीचा विचार केल्यास राजमाता जिजाऊच डोळ्यांसमोर उभ्या राहतात. शिवाजी महाराजांच्या अर्धांगिनी होण्याचे भाग्य लाभलेल्या अष्टराज्ञी म्हणजे काहीशी बाजूला पडलेली, विस्मृतीत गेलेली, विखुरलेली अशी इतिहासाची पाने आहेत. स्वराज्यनिर्मितीत त्यांच्या अस्तित्वाची आणि अदृश्य योगदानाची संघटित माहिती सर्वांनी घेतली पाहिजे", अशी कळकळ इतिहास अभ्यासक शिल्पा परब-प्रधान ह्यांनी व्यक्त केली. त्या बोरिवली इतिहास कट्टा येथे बोलत होत्या.
 
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केन्द्र यांच्या वतीने एक्सर, बोरीवली येथील वनविहार उद्यानात आयोजित इतिहास कट्टयावर दि . १२ मे २०२४, संध्या. ५.३० वाजता गोष्ट 'ती'ची या दुसऱ्या पर्वातील, शिवकाळातील राजस्त्रियांवरील दुसरी गोष्ट ' शिवछत्रपतींच्या अष्टराज्ञी ' संपन्न झाला. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांनी यावेळी प्रास्ताविक केले.
 
त्या पुढे म्हणाल्या, " तत्कालीन समाजमान्यतेनुसार शिवरायांनी आठ विवाह केले. सगुणाबाई (शिर्के), सईबाई (निंबाळकर), पुतळाबाई (मोहिते-चव्हाण), लक्ष्मीबाई(जयश्रीबाई मोरे ), सकवारबाई (गायकवाड), काशीबाई (जाधव), गुणवंताबाई (इंगळे), सोयराबाई (मोहिते) ह्या आठही राण्यांचा इतिहास वेगळा आहे. या सर्व पत्नींवर महाराजांचे नितांत प्रेम होते, पण स्वराज्याच्या संसारात ते आकंठ बुडाल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक कुटुंबांची जबाबदारी मात्र या राण्यांनीच समर्थ पार पाडली होती. आवश्यक तिथे राजांना सल्ले देतानाही त्यांनी राज्यकारभारात लुडबुड केली नाही. महाराजांच्या सावली बनून राहताना त्यांनी आयुष्यभर संयम आणि मर्यादा ह्यांचे पालन केले. कर्नाटक मोहिमेत स्त्रीसैन्याला त्रास दिल्याबद्दल महाराजांनी आपल्या मेव्हण्याचे, शेखोजी गायकवाड यांचे डोळे काढण्याची शिक्षा दिली होती. राण्यांनी त्यांच्या या कठोर निर्णयाला सहकार्य केल्याचे आढळून येते."