मोनोचे नवीन रेक रुळावर

२१ किमी लांबीच्या मोनोरेलच्या ताफ्यात नवीन मोनोरेल दाखल

    16-May-2024
Total Views |

monorail


 मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागील महिन्यात वितरित झालेल्या नवीन मोनोरेल रेकसाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. चाचणीअंती मिळणाऱ्या निष्कर्षातून पुढील रेकसाठी ऑर्डर दिली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांसह सुरक्षा अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात केल्या जातील.

चेंबूर - संत गाडगे महाराज चौक या २१ किमी लांबीच्या मोनोरेलच्या ताफ्यात दोन नवीन मोनोरेल लवकरच दाखल होणार आहेत. पहिल्या रेकीचे काही डबे मुंबईत नुकतेच दाखल झाले आहेत. हे नवीन रेक सार्वजनिक वापरात येण्यापूर्वी मोनोरेलची तयारी, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या डायनॅमिक चाचण्या विविध परिस्थितीत मोनोरेलच्या कार्यक्षमतेची चाचणी घेतात.
एमएमआरडीए नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्यादृष्टीने सर्व प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. हैदराबादमध्ये मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत या मोनोरेल स्वदेशी पद्धतीने तयार केल्या जात आहेत. एमएमआरडीएने निविदा काढल्यानंतर ऑर्डर केलेल्या एकूण १० मोनो रेकपैकी पहिले रेक मुंबईत आले आहेत. त्यामुळे चेंबूर आणि संत घाडगे महाराज चौक दरम्यानच्या मोनोरेल सेवा सुधारण्याची आशा निर्माण झाली. या नवीन रेकच्या डायनॅमिक चाचण्या केल्या जातील आणि त्यानंतर तो प्रवासी सेवांसाठी यंत्रणेत दाखल होईल. हैद्राबादस्थित मेधा एसएमएच रेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एमएमआरडीएने १० मोनोरेलच्या नवीन रेकची ऑर्डर दिलेली आहे. या नवीन मोनोरेलची प्रवासी क्षमता सध्याच्या मोनोप्रमाणे २५२ प्रवाशी असेल असा अंदाज आहे. यापैकी एका रेकची किंमत सुमारे ५९ कोटी रुपये इतकी आहे.

मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने २००७-२००८ मध्ये मोनोरेल प्रकल्प आणला. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी जवळपास २० किमीची मोनोरेल मार्गिका चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशा दोन टप्प्यांत साकारण्यात आली. मोनोच्या ताफ्यात या नवीन १० गाड्या आल्यावर, मोनोच्या २ फेऱ्यांमधील अंतर हे केवळ ५ मिनिटांवर येईल. तसेच सद्यस्थितीतील सुरू असलेल्या ११८ फेऱ्या वाढून ट्रेन ऑपरेशन प्लॅननुसार २५० पेक्षा जास्त होऊ शकतील. तसेच उपनगरीय रेल्वे आणि मेट्रो स्थानकांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी ट्रॅव्हलेटर तयार करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे एमएमआरडीए राबवत असलेल्या या योजनांमुळे मोनोरेलची प्रवासी संख्या नक्कीच वाढेल, असा एमएमआरडीएला अंदाज आहे