आत्मज्योतीने तेजाची ‘आरती’

    15-May-2024   
Total Views |
Aarti Bharj

आयटीमधील नोकरी ते एक यशस्वी मानसोपचार तज्ज्ञ असा आरती भार्ज यांचा प्रवास सर्वस्वी प्रेरणादायी आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाविषयी...
 
आरती अविनाश भार्ज यांचा जन्म 1974 मध्ये ठाण्यात एका उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याकाळी तिचे वडील डॉक्टर होते आणि आई गृहिणी. एकुलती एक म्हणून आरतीच्या आवडीनिवडींना तिच्या पालकांकडून अगदी लहानपणापासूनच वेगळा आकार मिळाला. आरतीला नृत्याची, विशेषतः कथ्थकची प्रचंड आवड होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी, तिला प्रख्यात कथ्थक शिक्षक प्रति-गोपीकृष्ण डॉ. राजकुमार केतकर यांच्याकडून कथ्थक नृत्य पुरस्कारही मिळाला. त्यांच्याच छत्रछायेत तिने आपल्या कलागुणांचा विकास केला. महाविद्यालयामधून पदवी घेण्यापूर्वी तिने ‘कथ्थक विशारद’ मिळविल्यामुळे आरतीचे कथ्थकमधील समर्पण आणि प्रतिभा वाखाणण्योजागीच. ठाण्यातील आरतीची सुरुवातीची वर्षे शैक्षणिक प्राविण्य आणि अभ्यासेतर कामगिरीत विस्तारत गेली. ज्यामुळे, तिच्या बहुआयामी कारकिर्दीचा पाया रचला गेला.

आरतीचा शैक्षणिक प्रवास सरस्वती मराठी शाळेतून सुरू झाला. या शाळेत ती तिच्या शैक्षणिक कामगिरीसाठी ओळखली जात होती. तसेच, विविध अभ्यासेतर उपक्रमांमध्ये तिचा सक्रिय सहभाग असे. केवळ अभ्यासातच नाही, तर खो-खो आणि कबड्डीसारख्या खेळांमध्ये आणि वक्तृत्व आणि शास्त्रीय नृत्य स्पर्धांमध्येही तिने प्रावीण्य मिळविले. तिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले, ते तिच्या मेहनतीचे फळ. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरतीने केळकर महाविद्यालयामधून अकरावी-बारावी, तर रुईया महाविद्यालयामध्ये ‘कॉम्प्युटर सायन्स’मध्ये ‘बॅचलर ऑफ सायन्स’ केले. तिचा शैक्षणिक प्रवास पुणे विद्यापीठातून ‘कॉम्प्युटर सायन्स’मध्ये पदव्युत्तर पदवीसह सुरू राहिला. तिथे तिने वर्गात पाचवा क्रमांक पटकाविला.
 
आरतीच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात एका बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरीपासून झाली, जिथे तिने 20 वर्षे काम केले. कामाकरिता आरतीला विविध देशांत दौरे करावे लागत होते. त्यामुळे तिला तिथल्या संस्कृती आणि कामाच्या वैविध्यपूर्ण वातावरणात काम आणि प्रवास करणे आवश्यक होते. या अनुभवांमुळे तिला मानवी वर्तन आणि मानसशास्त्रात रस निर्माण झाला, ज्यामुळे तिला या क्षेत्रात पुढील अभ्यास करता आला. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना, आरतीने ‘औरा हीलिंग’, ‘प्राणिक हीलिंग’ आणि पर्यायी औषधोपचार यांसारख्या उपचारपद्धतींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या स्वारस्याने तिला ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर, तिने सायन रुग्णालयामध्ये इंटर्नशिप केली. तिने आयपीएच, ठाणे येथे समुपदेशन अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक महासंघाद्वारे मान्यताप्राप्त nlp (न्यूरो-लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग) ‘मास्टर प्रॅक्टिशनर’ आणि ‘इमोशन्स मास्टरी’ प्रशिक्षक म्हणून तिने आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

आरतीच्या आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक यशोशिखरे पादाक्रांत केली आहेत. ‘वी टुगेदर फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या आरती मुख्य सचिव आहे आणि 2018 पासून ‘ध्यान बँक प्रकल्पा’तही तिचा सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्रातील विविध संस्थांना धान्य दान करण्यावर लक्ष केंद्रित करणारी संस्था म्हणून ‘वी टुगेदर फाऊंडेशन’ नावारुपास आली आहे. शालेय जीवनापासूनच कविता करण्याचा आरतीला छंद होता. त्यांनी ‘कोचिंग’ विषयात एका पुस्तकात लेख लिहून, तीन वर्षांपूर्वी लेखनकार्याची सुरुवात केली. ‘पर्यावरण संस्कृती’ मासिकात ती मानसिक आरोग्याविषयी सदर लिहिते आणि विविध कार्यशाळांमध्ये व्याख्यानेही देते. ‘इमोझिल’ हे आरतीचे पुस्तक कोविड काळात सहा हजार लोकांना उपयुक्त ठरले. आता या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीलाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तिसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे. अनेक ठिकाणी व्याख्यात्या म्हणून online आणि प्रत्यक्ष सादरीकरण करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाते.

तरुण मुलांसाठी कार्यशाळा आणि RYLAमध्ये त्यांना अनेकदा आमंत्रित केले गेले आहे. दरवर्षी नवीन उपक्रम सुरू करून एका नवीन क्षेत्रात काम करण्याच्या ध्यासाने आरतीने आता स्त्रियांसाठी एका खास उपक्रमाची सुरुवात केली आहे. ‘A Beautiful Pause’ या नावाने फेसबुक पेजवरून स्त्रियांना रजोनिवृत्ती काळात येणार्‍या समस्या आणि त्यावर ध्यानाद्वारे उपचार याविषयी मार्गदर्शन केले जाते. दर महिन्याला त्यांचे ऑनलाईन ध्यानवर्ग सुरू असतात. तसेच, वैयक्तिक समस्यांसाठी ‘personalized meditation session’ आयोजित केले जाते, ज्याचा हजारो कुटुंबांनी लाभ घेतला आहे. विशेष मुलांसाठी संस्थामध्ये पाच वर्षे स्वयंसेवक म्हणूनही आरतीने काम केले. तिने तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आवडींचा पाठपुरावा करताना, पालक म्हणून तिच्या जबाबदार्‍या उत्तमरित्या सांभाळल्या आहेत.आजवरच्या आयुष्यात, आरतीने वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा अनेक आव्हानांचा सामना केला आहे. पालक आणि व्यवस्थापक म्हणून तिची भूमिका संतुलित करणे, हे सर्वात महत्त्वाचे आव्हान होते. इतरांना मदत करण्यासाठी ‘औरा हिलिंग’ आणि मानसशास्त्रीय थेरपीचा योग्य वापर करणे, हे तिचे जीवनध्येय आहे, असे ती मानते. तिच्या या कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

 
उमंग काळे


उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.