ना घर के रहे, ना घाट के

    13-May-2024
Total Views |
 UBT
 
निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी महाभकास आघाडीतील उबाठा सेनेतील अस्वस्थता वाढताना दिसते. हिंदू आणि मुस्लीम मतदारांना एकाच वेळी गोंजारण्याचे हे धोरण म्हणजे दोन दगडांवर पाय देण्यासारखे आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याच मतदाराच्या मनात या पक्षाबद्दल विश्वास निर्माण झालेला नाही. वैयक्तिक सत्ताकांक्षेमुळे उबाठा सेना हा पक्ष ना हिंदूंचा राहिला, ना मुस्लिमांना तो आपला वाटतो. या अविश्वासाची मोठी किंमत या पक्षाला निवडणुकीत चुकवावी लागेल.
 
मुंबईसह परिसराला सोमवारी संध्याकाळी धुळीचे वादळ आणि गडगडाटासह जोरदार पावसाने तडाखा दिला. हे वादळ दोन तासच टिकले असले, तरी त्यामुळे अनेक बेसावध प्रवाशांची धावपळ उडाली. तासाभरानंतर पाऊस थांबला, तरी या वादळाची चर्चा सुरू राहिली. मुंबई आणि लगतच्या परिसराच्या राजकीय वातावरणातही असेच एक वादळ घोंघावत आहे. ते वादळ आहे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सेनेच्या (उबाठा सेना) उमेदवारांना मिळणार्‍या मतदारांच्या सामान्य किंवा थंड प्रतिसादाचे!मुंबईसह नाशिक, जळगाव, रावेर वगैरे उत्तर महाराष्ट्रातील एकंदर ११ जागांवर येत्या सोमवारी मतदान होणार आहे. सार्‍या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबईतील निवडणुकीत मोदी यांच्याविषयी विलक्षण लोकप्रियता दिसून येते. महाभकास आघाडीतील एक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे सेनेच्या (उबाठा सेना) उमेदवारांमध्ये मात्र निवडणुकीचा दिवस जवळ येत असताना अस्वस्थता आणि निराशा दिसून येत आहे.

पारंपरिक हिंदू मतदारांकडून उबाठाच्या उमेदवारांना थंड प्रतिसाद मिळत असून शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या रोडशोजना गर्दी उसळलेली दिसत आहे. त्याचबरोबर मतदारांना आणखी एक अजब चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते चक्क शिवसेनेच्या, म्हणजे उबाठा सेनेच्या उमेदवारांना मत देण्याचे आवाहन मुस्लीम मतदारांना करताना दिसत आहेत. मुस्लीम मतदारांकडून त्यांना उदासीन प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे हिंदू मतदारांकडे मते मागताना त्यांच्याकडून नेहमीचा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभताना दिसत नसल्याने उबाठा उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.सत्तेच्या लालसेपोटी आपल्या निष्ठावंत राजकीय सहकार्‍यांचा आणि आपल्यावर अनेक वर्षे प्रेम केलेल्या पारंपरिक हिंदू मतदारांचा विश्वासघात केल्यामुळे उबाठा सेनेचा पायाच उखडल्याचे जाणवत आहे. मुंबई हा शिवसेनेचा आणि एकंदरीतच हिंदुत्ववादी मतदारांचा बालेकिल्ला असताना मतदारांच्या या उदासीन प्रतिसादामुळे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत, ते दिसून येते. भिवंडीसारख्या मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास काँग्रेसचे कार्यकर्ते तयार नाहीत, असा अनुभव येत आहे.
 
मुंबई-ठाणे-पुणे या व अन्य शहरांतील मराठी मतदारांच्या मनात उबाठा सेनेविरोधातील नाराजी इतके दिवस सुप्त होती. मात्र, निवडणुकीतील प्रचाराने ती आता धारदार झाली आहे. ज्या पक्षावर गेली अनेक दशके प्रेम केले आणि त्यांच्या नेत्यांच्या घोडचुकाही पदरात घेत त्यांना निवडून दिले, अशा नेत्यांनी केवळ वैयक्तिक सत्ताकांक्षेपोटी आपल्याच मतदारांच्या पाठीत सुरा भोसकला. ज्यांना सत्तेवर बसविण्यासाठी मते दिली, त्या भाजप या एकनिष्ठ सहकार्‍याचा विश्वासघात करून ज्यांना सत्तेपासून दूर ठेवले होते, त्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गळ्यात घालून वैयक्तिक सत्तालोलुपता पूर्ण करण्याचा उबाठा सेनेचा धक्का मराठी मतदारांना सहन झाला नाही. उबाठा सेनेच्या नेत्यांच्या सुदैवाने गेली अडीच वर्षे राज्यात कोणत्याच निवडणुका झााल्या नसल्याने मतदारांना आपली नाराजी व्यक्त करण्याची संधीच मिळाली नव्हती. आता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधातील ही नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. ही नाराजी अन्य कोणत्याही मतदारांपेक्षा मराठी मतदारांमध्ये खूपच अधिक आहे. ज्या मराठी माणसाच्या नावावर आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आजवर उबाठा सेनेच्या नेत्यांनी सत्तेची फळे चाखली, त्यांनाच या पक्षाच्या नेत्यांनी गृहित धरले, याचा राग आता मतपेटीतून व्यक्त होईल.
 
हा विश्वासघात राजकीय स्वरूपाचा नव्हता, तर तो सांस्कृतिकही होता. मराठी माणसाने हिंदुत्त्वाचे राजकारण स्वीकारल्यापासून राज्यात भाजप आणि अखंड शिवसेनेला व्यापक पाठिंबा मिळत गेला. आपण हिंदुत्व सोडले नसल्याचा दावा उबाठा सेनेचे नेते जरी करीत असले, तरी त्यांची कृती आणि उक्ती नेमकी त्याच्या उलट आहे. एकीकडे मुस्लीम मतदारांना गोंजारताना त्याचवेळी आपण हिंदुत्त्व सोडले नसल्याचा दावा केल्यामुळे मुस्लीम मतदारांमध्ये गोंधळ आणि नाराजी निर्माण होत होती. दुसरीकडे मोदी यांच्यावर बिनबुडाचे आणि पातळी सोडून आरोप करताना मुस्लीम मतदारांना गोंजारण्याच्या धोरणामुळे हिंदुत्त्ववादी मतदार नाराज होत होते. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात ही कुचंबणा प्रखरतेने दिसून येते. तेथील उबाठा सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे एकाच वेळी मुस्लीम आणि हिंदू मतदारांना खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसले. पण, त्यामुळे ते दोन्ही मतदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण करीत आहेत. त्याचा फायदा उचलण्यास ‘मजलिसे उत्तेहादुल मुसलमीन’ हा असदुद्दिन ओवेसी यांचा पक्ष टपूनच बसला आहे. राज्यातील मुसलमान या पक्षाला आपला पक्ष मानतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम मतदारांची मते याच पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.
 
उरलीसुरली कसर राज ठाकरे यांनी भरून काढली आहे. जे मराठी मतदार अजूनही या पक्षाचे समर्थन करतात, त्यांना आता महायुतीला मते देण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. पुण्यातील सभा असो, रत्नागिरीतील असो की ठाण्यातील, राज ठाकरे यांनी उबाठा सेनेवर जोरदार हल्ला चढविला आहे. त्यांच्या उत्तम वक्तृत्वाने श्रोते भारावून जाताना दिसतात. यामुळे उबाठा सेनेतील निराशा अधिकच गहिरी होत जात आहे. मुंबई, नाशिक, पुणे यासारख्या शहरी आणि राजकीयदृष्ट्या सजग मतदारांना आपल्या बाजूने वळवून घेणे उबाठा सेनेला अवघड जात आहे. त्यांनी आपल्या मर्जीतील वृत्तवाहिन्या आणि लाळघोट्या पत्रकारांद्वारे सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला, तरी सोशल मीडियामुळे आजकाल शहरी मतदार खूपच जागरूक झालेला असल्याने या प्रयत्नाला पुरेसे यश आल्याचे दिसत नाही. थोडक्यात, असंगाशी संग करून उबाठा सेना हा पक्ष हिंदीतील म्हणीनुसार ‘ना घर का ना घाट का’ राहिला आहे. हिंदू व मुस्लीम मतदारांमधील अविश्वासाची मोठी किंमत या पक्षाच्या उमेदवारांना चुकती करावी लागणार आहे.