संत नामदेव शिष्यांची रामभक्ती

    11-May-2024
Total Views |
Saint Namdev rambhakti
 
संत नामदेवांच्या शिष्य परिवारामध्ये संत जनाबाई आणि संत चोखामेळा हे प्रमुख शिष्य आहेत. संत जनाबाईंचे आणि संत चोखामेळा या दोघांचेही अभंग अनुभव व अनुभूतीचे बोल आहेत. दोघांनीही विठ्ठलाएवढेच रामभक्तीला आपल्या अभंगातून स्थान दिलेले आहे. कारण, ‘विठ्ठल’ आणि ‘राम’ एकच आहेत, अशी सकल संतांची अद्वैत श्रद्धा आहे.

संत जनाबाई

संत जनाबाईंची ‘नामयाची जनी’ हीच खरी ओळख. स्वतःला ‘नामयाची जनी’ म्हणून घेण्यात त्यांना धन्यता वाटते. कारण, ‘दासी जनी’ ते ‘संत जनाबाई’ असा थक्क करणारा व्यक्तिविकास, हा जनीचे गुरू संत नामदेवांनी केलेला प्रताप आहे. अगदी बालवयातच जनीच्या वडिलांनी तिला संत नामदेवांचे वडील दामाशेटी यांना सांभाळण्यास दिले आणि जनी नामदेवांच्या परिवारातील एक सदस्य झाली. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे मूळ जन्म गाव. नामदेवांचे नरसी गावही त्याच भागातले. जनीचे वडील व नामदेवाचे वडील दोघेही पंढरीचे वारकरी होते. जनाबाईंचे एकूण पारमार्थिक जीवन कृतार्थ होते. ‘धन्य माझा जन्म धन्य माझा वंश’, हा अभंग त्याचा पुरावाच आहे. तेराव्या शतकात जनाबाईंनी लिहिलेले ४८५ अभंग अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. त्यामध्ये तत्कालीन समाजात वारकरी संतांनी स्त्री भाविकांना दिलेला अवसर व अवकाश याचे दर्शन होते, तद्वतच स्त्री वर्गात नामभक्तीने निर्माण केलेल्या आत्मविश्वासाचेही दर्शन घडते. ‘स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास।’ असा समस्त स्त्री वर्गाला ती आश्वासक दिलासा देते.व्रतवैकल्ये, कर्मकांड न करता प्राप्त कर्म हेच ईश्वरी भक्तीचे साधन मानून भक्ती करण्यास जनाबाई शिकवते. ‘दळीता कांडिता तुज गायिन अनंता।’ म्हणते. श्रीराम व रामनामाबद्दल ती म्हणते-

स्मरण ते हेचि करू। वाचे राम राम स्मरू ॥१॥
आणिक न करू काम। वाचे धरू हाचि नेम ॥२॥ (अ.क्र.३५१)
 
रामनामाचे माहात्म्य विशद करणारे काही अभंग विशेष लक्षवेधी आहेत. नित्य नेम धरून राम नामस्मरण करण्याचा उपदेश त्या करतात आणि रामनामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी महादेवांचा दाखला देऊन शिव आणि राम हे एकच आहेत, असे कथन करतात.
 
भजन करी महादेव। राम पूजी सदाशिव॥१॥
दोघे देव एक पाही। तया ऐक्य दुजे नाही॥
शिव रामा नाही भेद। (अ.क्र.३८५)

 
जनाबाईंनी दशावतार वर्णनात्मक एक अभंग लिहिलेला आहे. त्यातही रामाचा उल्लेख आहे. अन्य एका अभंगात त्या गुरू नामदेवांचे पूर्व जन्म कथन करून नामदेव हे चारी युगात भक्ती म्हणून अवतरले होते म्हणतात. त्या चार युगांपैकी राम अवतार झाला त्या त्रेतायुगात गुरू नामदेव हे रामभक्त अंगद होते, असे वर्णन करतात. ‘दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त।’ अशी एक ओळ आहे.
 
भिल्लीणीची फळे कैशी। चाखोनी वाहतसे देवासी॥१॥
गुज वान्नरासी पुसावे। राक्षसाने हो जिंकावे ॥२॥
वान्नर अवघे भुभुःकार। बोलताती रामासमोर ॥३॥
आज्ञा करावी आम्हासी। रावण आणितो तुम्हापासी ॥४॥
तुझ्या नामाच्या प्रतापे। हनुमंत गेला तो संतापे ॥५॥
सीताशुद्धी करूनी आला। दासी जनीला आनंद जाला ॥६॥

रामायणातील विविध प्रसंगांपैकी रामभक्त शबरीची भक्ती आणि वानराची हनुमंतांची रामनिष्ठा एवढे दोनच उल्लेख जनाबाई आपल्या अभंगात करतात आणि सीता शोध लागल्याने जनीला आनंद झाला असा स्वसहभाग नोंदवून राम चरित्राशी आपले असलेले तादात्म्य व्यक्त करतात.
 
संत चोखामेळा यांची ‘रामभक्ती’

संत चोखामेळा हे संत नामदेवांचे दुसरे शिष्य. संत चोखामेळा यांची स्तुती करताना संत तुकाराम म्हणतात - ‘चोखा माझा गणपती।’, संत जनाबाईंनीही ‘चोखामेळा संत भला। तेणे देव भुलविला।’ असा संत चोखोबांचा गौरव केलेला आहे. असे साक्षात्कारी संत चोखोबा रामनामाची महती गाताना म्हणतात-

अवघा आनंद राम परमानंद। हाच लागो छंद माझे जीवा ॥१॥
काम क्रोधाचे पळती आघात। वाचे गाता गीत रामनाम ॥३॥
 
रामनामाचा महिमा वर्णन करताना ते गणिका, अजावेळा आणि वाल्मिक या तिघांची उदाहरणे देतात व इतर कोणतेही साधन न करता केवळ रामनामाच्या उच्चाराने त्यांचा उद्धार झाल्याचे म्हणतात.
 
गणिका अजामेळा काय साधन केले।
नामाचि (रामनाम) उच्चारले स्वभावता ॥१॥
ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार।
वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
उफराटे नाम न ये मुखासी ।
मारा मारा ध्यासी स्मरता झाला ॥७॥
चोखा म्हणे ऐसा (राम) नामाचा महिमा । (स.सं.गा.५१)


इतर अनेक नाममंत्रांमध्ये केवळ दोन अक्षरांचा ‘राम’ नाम मंत्र हा सर्वात सोपा आहे, राम मंत्र हाच सार्‍या ग्रंथाचे सार आहे, असे सांगून ते भाविकांना राम नाम का घेत नाही, असा प्रश्न करतात.
‘राम’ ही अक्षरे सुलभ सोपी रे ।

जपता निर्धारी पुरे कोड ॥ (स.सं.गा.५६)
कोणासी साकडे गाता राम नाम वाचे ।
होय संसाराचे सार्थक नेणे ॥१॥
येणे दो अक्षरी उतराल पैलतीर ।
नाम निरंतर जप करा ॥२॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथाचे पै सार ।
राम हा निर्धार जप करी ॥४॥ (स.सं.गा.५७)


राम नाम घेण्यास कोणतेही बंधन, अवघड नियम नाहीत. राम नाम कोणीही केव्हाही घेऊ शकतो व संसारबंधनातून मुक्त होऊन भवसागर तरून जाऊ शकतो. त्यामुळे देवाकडे इतर काही न मागता ‘मुखी रामनाम राहो व संत संग लाभो’ एवढेच मागा असेही चोखामेळा भक्तभाविकांना विनवतात.

मग तुज बंधन घडे सर्वथा।
राम नाम म्हणता होसी मुक्त ॥२॥
चोखा म्हणे एकांती लोकांनी ।
नाम जपे श्रीराम ॥४॥
इतुकेचि देई राम नाम मुखी ।
संतांची संगती सेवा सार ॥१॥


एवढे सांगून, विनंती करूनही जे रामनाम घेत नाहीत, त्यांचा चोखामेळा स्पष्ट शब्दात धिक्कार करतात.

विद्याधर ताठे