माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढते रोजगार आणि भवितव्य

    10-May-2024
Total Views |
Technology Sector
मुंबईसह नव्या मुंबईतील संगणक उद्योग परिसरासाठी एक उत्साहवर्धक घटना नुकतीच घडली आहे. ‘गुगल’ने भारतातील आपल्या पहिल्यास विशाल स्वरुपाच्या माहिती-तंत्रज्ञान केंद्रासाठी नव्या मुंबईतील जुईनगर येथे जागा निश्चित केलेली आहे. सुमारे २२.५ एकर जागेत त्या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर हे विकसित स्वरुपातील माहिती-तंत्रज्ञान विकास केंद्र कार्यान्वित होणे, हा भारतीय संगणक सेवा उद्योग क्षेत्राच्या भविष्यासाठी मोठा व महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
 
आर्थिक वर्ष २०२४-२५ या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच माहिती-तंत्रज्ञान आणि संगणक सेवा क्षेत्रात वाढत्या रोजगार संधींची नांदी दिसून आली आहे. यासंदर्भात उत्साहवर्धक बाब म्हणजे, फेब्रुवारीमध्ये म्हणजेच निवडणूकपूर्व अस्थायी अर्थसंकल्प सादर होणार्‍या सुमारासच संगणक क्षेत्राने सुमारे ५० टक्के नव्या नोकर्‍यांचा अंदाज वर्तविला होता. आता रोजगार व्यवस्थापन-मार्गदर्शन क्षेत्रातील कंपन्यांनी नव्या आर्थिक वर्षात माहिती-तंत्रज्ञान व संगणक सेवा क्षेत्रात दरमहा सुमारे सहा टक्के रोजगारांची भर पडेल, असा सबळ अंदाज व्यक्त केल्यामुळे अर्थसंकल्प पूर्वकाळातील वरील अंदाजाला निश्चितच पाठबळ मिळाले आहे.

संख्येद्वारे व तुलनात्मकदृष्ट्या सांगायचे झाल्यास, देशांतर्गत संगणक सेवा क्षेत्रात फेब्रुवारी २०२४ मध्ये उपलब्ध रोजगारांची अंदाजे संख्या होती १ लाख २४ हजार. ही संख्या तुलनात्मकदृष्ट्या जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध रोजगार संधीपेक्षा ५० टक्के, तर डिसेंबर २०२३ मधील रोजगार संख्येपेक्षा सुमारे ३० टक्क्यांनी अधिक होती. ‘एक्सफेनो’ (दहिशपे) या विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उमेदवारांना रोजगारविषयक मार्गदर्शन करणारी वरील टक्केवारी व आकडेवारी पुरेशी बोलकी ठरते.दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, रोजगाराची वरील आकडेवारी ही प्रत्यक्षात माहिती-तंत्रज्ञान व संगणक सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी घोषित केलेल्या प्रचलित रोजगार संधीचा एकत्रित तपशील आहे, हे विशेष. यावर आधारित रोजगार व्यवस्थापन कंपन्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या दरम्यान दरमहा सुमारे सहा ते आठ टक्के या प्रमाणात रोजगार संधीमध्ये वाढ होण्याचा व्यावसायिक अंदाज बांधला असून, त्यानुसार आपले व्यावसायिक-नियोजन आखले आहे.

यासंदर्भातील अन्य प्रमुख व उल्लेखनीय बाब म्हणजे, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तांत्रिक क्षेत्र व विषयांशी संबंधित व त्यातील प्रशिक्षित उमेदवारांना सध्या मोठी व प्राधान्याने मागणी आहे. या क्षेत्रात विशेषत: मध्यम व उच्चस्तरीय उमेदवारांच्या निवडीतील व्यवस्थापन तज्ज्ञ व ‘एक्सफेनो’चे व्यवसाय प्रमुख कृष्णा गौतम यांच्या मते, ही स्थिती यावर्षी अशीच कायम राहणार आहे. त्यांच्या मते, या आर्थिक वर्षात माहिती-तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रातील तांत्रिकदृष्ट्या अनुभवी उमेदवारांसाठी दरमहा सुमारे १५ हजार नव्या रोजगार संधी सहजपणे उपलब्ध असतील. त्या खालोखाल आवश्यक व प्राधान्यक्रम संगणकसेवा- पद्धतींसाठी आवश्यक उमेदवारांचा असेल.
 
रोजगार सल्ला-व्यवस्थापन क्षेत्रात प्रदीर्घ काम करणार्‍या ‘टीमलीज’ कंपनीच्या अभ्यासानुसारसुद्धा, या आर्थिक वर्षातील सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार्‍या दुसर्‍या सहामाहीत संगणक क्षेत्रात नोकरी-रोजगाराच्या संधी नव्याने व मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. त्याचा लाभ या क्षेत्रातील योग्य व पात्रताधारक उमेदवारांना मिळू शकेल. ‘टीमलीज’चे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ वं व्यवसाय प्रमुख कृष्णा विज यांच्यानुसार, माहिती- तंत्रज्ञानासह संगणक सेवा क्षेत्रातील व्यवसाय व त्याद्वारे भारतातील रोजगारवाढ होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, गेल्या दोन वर्षांत युरोपसह पाश्चिमात्य देशांमधील संगणकीय सेवा-व्यवसायाचा मुख्य भर हा भारतात त्यांच्यासाठी व्यवसाय विकसित करण्यासाठी संगणक-सेवा प्रक्रियांची स्थापना करण्यावर आहे. ही केंद्रे संबंधित तंत्रज्ञानविषयक तंत्रासह युक्त आहेत. जागतिक स्तरावर दर्जेदार व्यावसायिक सेवा देणारी ही केंद्रे प्रामुख्याने भारतात स्थापन होत असल्याने त्याचा मोठा फायदा भारतातील वाढीव रोजगार संधींसाठी होत आहे व होणार आहे. मुख्य म्हणजे, या नव्या व ंवाढत्या संधींचा फायदा भारत आणि भारतीयांना होऊ घातला आहे.
 
 
२०१९ ते २०२३ या पाच वर्षांमध्ये भारतातील माहिती-तंत्रज्ञान व संगणक सेवा क्षेत्रात करण्यात आलेल्या उमेदवारांची वार्षिक आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

 
Technology Sector

याशिवाय, वर्ष २०२३-२४ दरम्यान विविध टप्प्यांमध्ये देशांतर्गत संगणक सेवा क्षेत्रात खालीलप्रमाणे भरती करण्यात आली-


Technology Sector
याचाच अर्थ २०२४ पासून संगणक सेवा-उद्योग क्षेत्रातील नव्याने रोजगार उपलब्ध होण्यामध्ये लक्षणीय स्वरूपात वाढ झाली आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मतांनुसार, देशांतर्गत माहिती-तंत्रज्ञान व संगणक सेवा क्षेत्रात गेल्या सुमारे वर्षभरात उपलब्ध झालेल्या संधी या मोठ्या महानगराशिवाय राजधान्यांची शहरे, मोठे व्यावसायिक ठिकाणे व प्रसंगी छोट्या शहरामधील संगणकीय सेवा - प्रक्रिया व माहिती-तंत्रज्ञान व्यवस्थापनाच्या संदर्भातील वाढत्या व्यवसाय विस्तार व गरजांपोटी झाली. अर्थात, व्यवसायवृद्धी व त्याद्वारे रोजगारवाढ या क्षेत्रात सर्वत्र व सर्वच आलबेल आहे, असे समजण्याचे कारण नाही. याचे प्रत्यंतर गेल्या वर्षी माहिती-तंत्रज्ञान व संगणक सेवा क्षेत्रातील सुमारे ६५ हजार कर्मचार्‍यांना नोकरीवरून कमी करण्याच्या निमित्ताने आले. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३च्या दरम्यान तर या कर्मचार्‍यांच्या नोकरकपातीची झळ अधिक तीव्रतेने जाणवली.या सार्‍या पार्श्वभूमीवर मुंबईसह नव्या मुंबईतील संगणक उद्योग परिसरासाठी एक उत्साहवर्धक घटना नुकतीच घडली आहे.

‘गुगल’ने भारतातील आपल्या पहिल्यास विशाल स्वरुपाच्या माहिती-तंत्रज्ञान केंद्रासाठी नव्या मुंबईतील जुईनगर येथे जागा निश्चित केलेली आहे. सुमारे २२.५ एकर जागेत त्या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर हे विकसित स्वरुपातील माहिती-तंत्रज्ञान विकास केंद्र कार्यान्वित होणे, हा भारतीय संगणक सेवा उद्योग क्षेत्राच्या भविष्यासाठी मोठा व महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, नव्या मुंबईसह राजधानी क्षेत्र दिल्लीच्या नोएडा येथे ‘गुगल’ने आपल्या माहिती संकलन-प्रक्रिया केंद्र स्थापनेचा प्रस्ताव ठेवला असून, त्यालासुद्धा प्रारंभिक मान्यता मिळाली आहे. ‘गुगल’चे नवी मुंबई स्थित माहिती प्रक्रिया केंद्र हे देशातील सर्वात प्रगत व अद्ययावत केंद्र ठरणार असून जागतिक स्तरावरील भारतीय माहिती-तंत्रज्ञान व संगणक सेवेला मोठी वाढ यानिमित्ताने नजीकच्या भविष्यात मिळणार आहे.दत्तात्रय आंबुलकर
 
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)