न्यायालयाच्या निकालानंतर राणांना अश्रू अनावर, म्हणाल्या, "खालच्या पातळीवर..."

    04-Apr-2024
Total Views |
 
Navneet Rana
 
अमरावती : माझ्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर बोलून मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला, अशी भावना खासदार नवनीत राणांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले.
 
नवनीत राणा म्हणाल्या की, "गेल्या ११ ते १२ वर्षांपासून मी जो संघर्ष केला त्याला विरोधकांनी खूप चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला. ते खूप खालच्या पातळीवर बोलले. एका माजी सैनिकाच्या मुलीला आणि एका स्त्रीला दिलेला त्रास मी गेल्या १० ते १२ वर्षांपासून सहन करत आहे. आपण मेहनत करु शकत नाही आणि इमानदारीने लोकांसाठी झटू शकत नाही अशावेळी एका स्त्रीला कसं थांबवायचं? तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि तिला कोर्टात फसवायचं. तिच्या परिश्रमाच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु होता."
 
हे वाचलंत का? -  नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा!
 
"महिलांच्या जीवनात संघर्ष हा जन्मत:च येतो आणि तो शेवटपर्यंत राहतो. पण आज सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून दुध का दुध आणि पाणी का पाणी झालं आहे. हा नवनीत राणाचा विजय नसून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या मुलांचा विजय आहे. मी खूप संघर्ष केला आणि खूप कठीण दिवस बघितले आहेत," असे त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "जेव्हा महिला संघर्ष करते तेव्हा तिला तिच्या मुलांनाही उत्तर द्यावं लागतं. मुलं मला विचारायची की, आई तू काय केलंस? त्यावेळी एकच उत्तर निघायचं की, बाळा मी काहीही केलेलं नाही. पण तेव्हा वाटायचं की, मैदान सोडलं तर मी खोटी सिद्ध होणार आणि मी लढली नाही तर माझ्या विचारांचं काय होणार? त्यामुळे जो खरा आहे देव त्याच्या पाठीशी उभा असतो. जे लोकं मला बोलतात त्यांना एकच विनंती करते की, महिलांवर कधीही पातळी सोडून बोलू नका," असेही त्या म्हणाल्या.