पोलिंग बूथ जिंकण्यावर भर द्या; पंतप्रधानांचा भाजप कार्यकर्त्यांना संदेश

    03-Apr-2024
Total Views |
BJP Polling Booth PM Modi
 

नवी दिल्ली :    निवडणुकीमध्ये मोठा विजय प्राप्त करायचा असल्यास प्रथम आपापल्या बूथला मजबूत करून तेथे विजय मिळवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. भाजपने केंद्र – राज्य – जिल्हा – मंडळ – बुथ अशी कार्यकर्त्यांची रचना केली आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजप आपली ही यंत्रणा अतिशय प्रभावीपणे राबवते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ॲपद्वारे उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या १ लोकसभा मतदारसंघातील सर्व २२ हजार ६४८ बूथवरील कार्यकर्त्यांना संबोधित केले.
निवडणुकीत विजय मिळवण्याची आपली कितीही इच्छा असली तरी मतदान केंद्र अर्थात बूथ जिंकल्याशिवाय आपण निवडणूक जिंकू शकत नाही, त्यामुळे निवडणुकीतील विजयाचा आत्मा मतदान केंद्राच्या विजयात असतो. म्हणूनच आपला आग्रह असतो की आपापले बूथ मजबूत करा आणि तेथे विजय मिळवा. त्यामुळे यंदा आपापल्या बूथवरी यापूर्वीचे सर्व विक्रम मोडण्यासाठी सज्ज व्हा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


हे वाचलंत का? - दिल्ली मद्य घोटाळा : केजरीवालांना न्यायालयीन दिलासा नाहीच!


कार्यकर्त्यांची मेहनत निवडणुकीत महत्त्वाची ठरते, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक, प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे नवनवे विक्रम होत आहेत. भाजप कार्यकर्त्याचा हा उत्साह पाहून अन्य पक्षांचे नेते गर्भगळीत झाले आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक बूथवर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी बूथ कमिटी सदस्य आणि पन्ना प्रभारींनाही संबोधित केले.


श्रीराम मंदिरास काँग्रेस आणि सपाचा विरोध

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे जाहिर सभेस संबोधित केले. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात काँग्रेससह समाजवादी पक्षाचाही विरोध होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्रल मोदी यांनी शतकांपासूनचे ते स्वप्न पूर्ण केले. त्याचप्रमाणे भाजपच्या कार्यकाळात कैराना, मुजफ्फरपूर, सहारनपूर येथील पलायनदेखील रोखले असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.


राहुल गांधींचे सहकारी विजेंदर सिंहही भाजपमध्ये

ऑलिम्पिकपटू मुष्टीयोद्धा आणि राहुल गांधी याचे निकटवर्तीय विजेंदर सिंह यांनी बुधवारी दिल्ली येथे भाजपमध्ये प्रवेश केला. देशाचा विकास आणि नागरिकांची प्रगती यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे विजेंदर सिंह यांनी म्हटले आहे. यापूर्वी विजेंदर सिंह यांनी २०१९ साली काँग्रेसतर्फे दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढविली होती. विशेष म्हणजे अवघ्या २४ तासांपूर्वीच त्यांनी राहुल गांधींचा एक व्हिडीओदेखील ‘एक्स’वर रिपोस्ट केला होता.