संत नामदेव कृत ‘रामकथा महात्म्य’ (पूर्वार्ध)

    27-Apr-2024
Total Views |
sant namdev ramktha

संत नामदेव हे संत ज्ञानदेवांचे संतसांगाती होते. ज्ञानेश्वर समाधीस्थ झाल्यावर ५० वर्षे नामदेवांनी भक्ती संप्रदायाचे नेतृत्व केले व विठ्ठल भक्तीला पंजाबपर्यंत नेऊन राष्ट्रीय स्वरूप दिले. संत नामदेवांचे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत भक्तीकाव्य आहे. शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेवांची पदे समाविष्ट आहेत. हिंदी भक्ती साहित्याचे व निर्गुण रामोपासनेचे प्रवर्तक म्हणून संत नामदेवांचा कार्यगौरव कबीरांसह सकल संतांनी केलेला आहे. संत नामदेवांच्या मराठी अभंगगाथेत ‘रामकथा महात्म्य’ असे २७ अभंगांचे स्वतंत्र प्रकरण आहे. संत नामदेवांच्या मराठी व हिंदी भक्तीकाव्यातील ‘रामदर्शन’ सलग दोन लेखात घेणार आहोत.

नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥

भक्ती आणि ज्ञानाचा असा सुरेख संगम साधून विठ्ठल भक्तीची पताका थेट पंजाबात फडकविणारे संत शिरोमणी, पांडुरंगाचे प्रेमभंडारी संत नामदेव म्हणजे संत ज्ञानदेवांचे सखे सांगाती. ‘ज्ञानदेवे रचिला पाया।’ ही संत बहिणाबाईंची उक्ती ‘ज्ञानदेवे-नामदेवे रचिला पाया।’ अशी परिवर्धित केली तर अधिक सार्थ व समर्पक ठरावी, असे संत नामदेवांचे ज्ञानदेवांच्या कार्यामध्ये योगदान आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतीय लोकजीवनात समता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याचे महान कार्य संत नामदेवांनी (इ.स. १२७० ते इ.स. १३५०) केले. संत नामदेवांच्या कार्याचा गौरव अनेकांनी, अनेक प्रकारांनी केलेला आहे. पण, त्यामध्ये समकालीन संत सांगाती, संत ज्ञानदेवांनी केलेला गौरव सर्वाधिक विशेष आहे. संत ज्ञानदेव म्हणतात-

भक्त भागवत बहुसाल ऐकिले। बहु होऊनी गेले, होती पुढे॥
परी नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व। हा रस अद्भुत निरूपम॥

संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर पुढे तब्बल ५०-५५ वर्षे संत नामदेवांनी भक्तीपंथाचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरात, राजस्थान, पंजाब आणि उत्तर भारतात आजही दिसून येतो. पंजाबमधील घुमान शहरातील नामदेवांचे स्मृतिमंदिर-गुरूद्वारा त्याची धवल साक्ष आहे. त्यांच्या अभंगाची गाथा, ‘नामवेद’ म्हणूनच वारकर्‍यांमध्ये पूजनीय आहे. ‘सर्वसामान्य संसारी साधक ते सिद्ध संत’ अशा पारमार्थिक प्रगतीचा थक्क करणारा आलेख नामदेवांच्या अभंगातून दिसतो. संत नामदेव हे मराठीतील पहिले संत चरित्रकार आहेत. एवढेच नव्हे, तर डॉ. शं. गो. तुळपुळेंच्या मते, संत नामदेव हे मराठीतील पहिले आत्मचरित्रकार आहेत. संत चोखामेळा व दासी जनीचे गुरू आहेत. जनाबाईंचा ‘दासी जनी ते संत जनी’ हा व्यक्तिविकास, संत नामदेवांच्या स्त्री विषयक उदार दृष्टीचा व कार्याचा प्रताप आहे.

संत चोखोबांची विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात स्वहस्त समाधी बांधण्याचे १३व्या शतकातील सामाजिक पार्श्वभूमीवर संत नामदेवांनी केलेले कार्य, अस्पृश्य सन्मानाचे पहिले कृतिशील पाऊल आहे. यादृष्टीने नामदेव हे समता व समरसतेचे क्रियाशील पुजारी आहेत. संत नामदेवांचे पंजाब व उत्तर भारतातील कार्य अवघ्या मराठी समाजालाच भूषणभूत आहे. शीखांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या परमपवित्र धर्मग्रंथात गुरू नानकदेवांनी संत नामदेवांचे ६३ अभंग, पदे समाविष्ट केलेली आहेत. हे नामदेवांच्या कार्याचे चिरंतन दर्शन आहे. गुरू नानक, संत कबीर, संत रविदास, संत दादू यांसह उत्तर भारतातील अनेक संतांनी नामदेवांना गुरूसारखा मान देऊन त्यांच्या आपल्या काव्यात गौरवाने उल्लेख केलेला आहे. थोर हिंदी अभ्यासक आचार्य विनय मोहन शर्मा, भगीरथ मिश्र आदींनी ‘उत्तर भारतातील निर्गुण संप्रदायाचे प्रवर्तक’ अशा शब्दांमध्ये संत नामदेवांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. महाराष्ट्र शासन प्रकाशित नामदेव गाथेत २१०७ मराठी अभंग आणि २२४ हिंदी पदे अशी एकूण २ हजार, ३३१ एवढी काव्यरचना आहे, तर साखरेमहाराज संपादित गाथेमध्ये २ हजार, ३७३ अभंग रचना आहेत-
 
नामदेव गाथेतील ‘रामकथा माहात्म्य’
अयोध्यें केला अवतारू। रामनामया दातारू॥
 
संत नामदेवांच्या अभंगगाथेमध्ये ३० प्रकरणे आहेत. त्यात एक स्वतंत्र प्रकरण ‘श्री रामकथा माहात्म्य’ नावाचे असून या प्रकरणात २७ अभंग आहेत. वारकरी संप्रदायाचा मंत्र ‘राम कृष्ण हरी’ असल्याने वारकरी संतांना राम व विठ्ठल हे एकच आहेत. त्यामुळे संत नामदेवांनी विठ्ठलाएवढेच जिव्हाळ्याने रामाबद्दल लिहिलेले आहे. वारकरी कीर्तनकारांना चैत्र शुद्ध नवमीच्या रामजन्म उत्सवाच्या कीर्तनास उपयुक्त ठरेल, अशा दृष्टीने अत्यंत संक्षेपात संत नामदेवांनी या प्रकरणात रामचरित्रातील ठळक प्रसंगाचे भक्तिभावपूर्ण वर्णन केलेले आहे. संत नामदेवांच्या या ‘रामकथा माहात्म्य’ प्रकरणाबद्दल विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात, “संत नामदेव प्रभू रामचंद्र चरित्र तीन टप्प्यांत कथन करतात. पहिल्या टप्प्यात कौसल्येचे डोहाळे आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म वर्णिलेला आहे. दुसर्‍या टप्प्यात रामचंद्रांचे सगळे चरित्र नामदेवांनी थोडक्यात सांगितले आहे. शेवटच्या टप्प्यात हनुमंताने रामदूत म्हणून जो पराक्रम केला आणि लंका जाळून एक प्रकारे सीताशुद्धी घडवून आणली, त्याचे गतिमान वर्णन आहे. या तीन टप्प्यांतील अभंगातून नामदेवांच्या रामभक्तीचे विविध स्तर आपल्या डोळ्यापुढे येतात.”

‘रामकथा माहात्म्य’ या प्रकरणातील २७ अभंगांपैकी पहिले आठ अभंग कौसल्या, सुमित्रा व कैकेयीच्या डोहाळ्याचे वर्णन करणारे आहेत. ‘डोहाळे’ हा विषय आजच्या आधुनिक जीवनशैलीत कालबाह्य झाल्याने, या विषयाला नामदेवांनी एवढे महत्त्व का दिले? असे वाटेल. पण, त्रेतायुगातच नव्हे, अगदी अलीकडच्या काळापर्यंत दाम्पत्य जीवनातील ‘डोहाळे पुरवणे’ हा एक धर्मशास्त्रीय संकेत मानला गेला आहे. त्यामागे सूक्ष्म मानसशास्त्राचाही विचार अनुस्यूत आहे. हेच भारतीय ऋषी चिंतनाचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व आहे. रघुकुलाचे कुलगुरू वसिष्ठ ऋषी ‘तिन्ही राण्यांचे डोहाळे पुरवावे,’ असे राजा दशरथाला सांगतात, असाही स्पष्ट उल्लेख रामायणात व अभंगात आहे.

कुलगुरू वसिष्ठ सांगे नृपवरा। असती गरोदर तुझ्या कांता॥१॥
धर्म शास्त्र ऐसे डोहाळे पुसावे। त्यांचे पुरवावे मनोरथ॥२॥

संत नामदेवांच्या रामकथा माहात्म्याचा अधिक विचार आणि हिंदी पदांमधील ‘रामदर्शन’ पुढील लेखात पाहू.
॥जय श्रीराम ॥


विद्याधर ताठे
(पुढील अंकात: संत नामदेवांच्या हिंदी पदांतील ‘रामदर्शन’)