गोरेगावची 'अरुण सामंत क्लाइबिंग वॉल' पुन्हा सुरू होणार

    24-Apr-2024
Total Views |
arun samant
 
मुंबई : मुंबईतील प्रस्तारारोहकांसाठी आनंदाची बातमी आहे. गोरेगाव पूर्व येथील नंदादीप शाळेच्या प्रांगणातील 'अरुण सामंत क्लाइबिंग वॉल' पुन्हा सुरू होणार आहे. डोंगरात आढळणाऱ्या कडे-कपाऱ्यांची हुबेहूब प्रतिकृति या भिंतीवर साकारण्यात आली आहे. त्यासाठी फेरो-सिमेंट या विशेष तंत्राचा वापर केला आहे.
 
नैसर्गिक कडे-कपाऱ्यांतील चढाई तंत्रशुद्ध व सुरक्षित पद्धतीने व्हावी यासाठी नियमित सराव आवश्यक आहे. पण मुंबईपासून दूर जाऊन नियमित सराव करणे गैरसोयीचे, वेळकाढू व खर्चिक असते, त्यामूळे मुंबईतील ही सोय गिर्यारोहकांना व निसर्गप्रेमींना खूप उपयुक्त आहे. नियमित प्रस्तारारोहकांबरोबर नवोदित इच्छुक व शाळेतील विध्यार्थीसुद्धा या सोयीचा लाभ घेतात. अरुण सामंत हे उत्कृष्ट गिर्यारोहक व अभ्यासू निसर्गप्रेमी होते. दुर्दैवाने एका हिमालयीन गिर्यारोहण मोहिमेत त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामंत कुटुंबियांनी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळासाठी ही वैशिष्ट्यपूर्ण ४३ फूट उंचीची कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत उभारली आहे.
 
स्पोर्ट्स क्लाइबिंग या क्रीडा प्रकारात प्रथम छत्रपति शिवाजी पुरस्कार मिळवणाऱ्या कुमारी सिद्धी मणेरीकरने याच भिंतीवर प्राथमिक धडे गिरवले. कांगचेंनजुंगा माऊंटेनेंरीग फाउंडेशन व माऊंटेन स्पोर्टस अकॅडेमी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. २८ एप्रिल २०२४ रोजी नांमवतांच्या उपस्थितीत या भिंतीवर दिमाखदार प्रात्यक्षिके होणार आहेत. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजता शाळेच्या डॉ. भानुबेन नानावटी कलाघरामध्ये प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लाइबिंगचे अध्यक्ष, ब्रिगेडिअर एम. पी. यादव, विशिष्ठ सेवा मेडल (निवृत्त), भारतीय सेना, यांच्यासह मान्यवर प्रो. चारुहास जोशी व सिद्धी मणेरीकर यांचे स्वागत व मनोगत होईल.