चांदणे शिंपीत जाशी...

    29-Mar-2024
Total Views |
Vincent van Gogh

दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या एका भागात पालीची एक नवी प्रजाती सापडली. तिचे नामकरण व्हिन्सेंट वॅन गॉग यांच्या नावावरून करण्यात आले. त्या पालीच्या पाठीवर असलेले ठिपके गॉगच्या ‘द स्टाररी नाईट’ या गाजलेल्या चित्रसदृश आहेत. ‘द स्टाररी नाईट’ हे चित्र तसं सुप्रसिद्ध. सर्वांनी पाहिलेलं असलेलंही. आज त्याच गॉगचा यांचा जन्मदिवस. जगाच्या कानाकोपर्‍यातून अनेक समीक्षकांनी या चित्राचा अर्थ लावून त्याबाबत विवेचन केले आहे. कलाकार आणि समीक्षक या चित्राबाबत काय म्हणतात आणि गॉग नेमका कोण होता, यावर प्रकाश टाकण्यासाठी हा लेखप्रपंच..

प्रेयसीला आपला कान कापून देणारा सुप्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट वॅन गॉग याने वयाच्या चाळीशीत आत्महत्या केली. त्याचे नाव आज सातासमुद्रापार एक प्रतिभावंत आणि सुप्रसिद्ध चित्रकार म्हणून आवर्जून घेतले जात असले, तरीही त्याच्या संपूर्ण हयातीत त्याचे केवळ एक चित्र, तेही केवळ ४०० फ्रँक इतक्या किमतीत विकले गेले. त्याने आयुष्याच्या पूर्वार्धात अनेक ठिकाणी नोकरी करून पाहिली. शाळेच्या फी वसुलीचे तसेच इतर अशीच कामे करताना त्याच्यातील अंगभूत करुणा आड यायची. शेवटी एक दिवस त्याने आपले संपूर्ण आयुष्य कलेला वाहून घ्यायचे ठरवले. हा कलेचा वारसा त्याला आपल्या आईकडून मिळाला होता. स्वभावातील अत्यंत करुणा आणि त्याच जोडीला असलेला तापट स्वभाव, त्याला माणसे जोडून ठेवण्यात कमालीच्या अडचणीत टाकत होता. त्याच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी त्याचा धाकटा भाऊ थिओने पेलली. आपल्या भावावर आपला भार पडतोय, असे वाटताक्षणी त्याने स्वतःचे आयुष्य संपवून घेतले.

चित्रे काढायची असे ठरल्यावर त्याने दक्षिण फ्रान्समध्ये एक दुमजली पिवळ्या रंगाचे घर घेतले. त्याला इथे कलाकारांची वसाहत करायची होती. पण, पुन्हा स्वभाव आड आला! यातूनच एका सहकलाकाराला चाकूने धमकावण्याचा प्रयत्न गॉगने केला. त्याच दिवशी आपला कान त्याने कापला असल्याचे दाखले आहेत. या घटनेनंतर आपण मानसिकदृष्ट्या अस्थिर आहोत व त्यावर उपाय म्हणून त्याने एका रुग्णालयात स्वतःला दाखल करवून घेतले. ’द स्टाररी नाईट’ हे चित्र त्याने याच रुग्णालयाच्या खिडकीतून काढले आहे. पण, या चित्रातच एक मेख आहे. समीक्षक या चित्रासंबंधी काय सांगतात?हे चित्र रुग्णालयातील खिडकीतून दिसणार्‍या दृश्याचे असले तरीही हे निसर्गचित्र नाही. खिडकीतून दिसणारी ही फ्रेम असली तरी त्या डोंगराच्या पायथ्याशी चित्रात दिसत असलेले गाव मात्र नव्हते. मानसिक रोग्यांच्या रुग्णालयात उपचार घेत असताना हे चित्र काढल्याने साहजिकच समीक्षकांनी चित्रातील दृश्याचा संबंध गॉगच्या तत्कालीन मानसिक स्थितीशी लावला. त्याच्या चित्रात एक विचार सदैव दिसतो. त्याची अशी एक खासियत, एक शैली आहे.

रंगसंगती, पद्धती आणि कुंचल्याचे फटकारे त्याची ओळख सांगतात. या शैलीची चिकित्सा करताना बराचसा ‘गॉग’ आपल्याला गवसू लागतो. पिवळा आणि निळा रंग, तसेच त्या निळ्या गाढ रंगाला जोडून आलेली हिरवट झाक त्याच्या जवळपास बर्‍याच चित्रांत आढळून येते. दिवस आणि रात्रीचा त्याच्या मनात चालणारा हा खेळ या रंगसंगतीतून दिसतो. काही समीक्षकांचे म्हणणे आहे, त्याला ‘लीड पॉयझनिंग’ झाल्याने ही विचित्र रंगसंगती त्याच्या चित्रांतून दिसते, तर कित्येकांना ही रंगसंगती अतिस्पष्ट आणि ठाम विचारांचे स्वप्नाळू प्रदर्शन वाटते. या चित्राच्या वेळी जरी तो रुग्णालयात उपचार घेत असला, तरीही लहानपणी मेंदूला थोडीशी इजा पोहोचल्यामुळे हा मानसिक आजार त्याला प्रथमपासूनच होता. या आजाराचेच कारण ही एकच एक रंगशैली त्याने विकसित केली असावी, असाही कयास बांधला गेला. गॉगच्या कुंचल्याचे फटकारे पाहिले, तर तेही काहीसे जाड आणि अस्ताव्यस्त दिसतात. उद्विग्न मनस्थितीत हे चित्र केल्याचा संभव असल्याने त्यावर जास्त मेहनत घेतली गेली नसावी, असे मत मांडले गेले. परंतु, सर्वच चित्रातील हे फटकारे, या रेघा जाड आणि गडद असल्याने चित्राला एक प्रकारची खोली प्राप्त होते, असे त्याच समीक्षकाने लिहून ठेवले आहे.

तारकांचे ठिपके आणि त्याभोवती रेंगाळणारा प्रकाश स्थिर नाही, तर तो प्रवाही आहे. भोवतालच्या अंधाराशी मिसळण्याचे सामर्थ्य आणि तेवढी दुर्दम्य इच्छा त्या ठिपक्यांच्या ठायी आहे. या कराल जांभळ्या अंधारावर स्वतःचे अस्तित्व केवळ उठून दिसण्याकरिता नाही, तर त्या अंधाराशी नाते सांगणारे आहे. लहान लहान, परंतु एकातून पुढची, तिच्या पुढची अशा रेषा रेषांची ही शैली नेतृत्व करणारी आहे.व्हिन्सेंट वॅन गॉगच्या पेंटिंगच्या ४४ वर्षांपूर्वी, १८४५ मध्ये लॉर्ड रॉसने व्हर्लपूल गॅलेक्सीचे स्केच रेखाटले होते. ही रेखाशैली गॉगच्या सर्व चित्रांच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. कला इतिहासकार रोनाल्ड पिकव्हान्स मात्र या चित्रात अर्थ न शोधता त्यावर अमूर्त चित्र असल्याचा शिक्का मारतात. त्याउलट पिकव्हान्सचा मुद्दा काहीसा असा, हे चित्र अनेक रात्रीचे मिश्रण आहे. रोजच्या रोज एकच रात्र पाहून अनेक दिवसांनी त्यातले घटक एकत्र करून गॉगने हे चित्र रेखाटले. नायफेह आणि स्मिथ, व्हॅन गॉगच्या मानसिक आजाराच्या संदर्भात हे चित्र पाहतात. पण, सर्वज्ञात असलेल्या या एकच परिस्थितीला मापदंड मानून चित्रसमीक्षेचा एकमेव निकष म्हणून कसा वापरता येईल, हाही प्रश्न आहेच.

या चित्रावर संशोधनही मोठ्या प्रमाणावर झाले. चित्र तयार झाल्यानंतर त्याने आपल्या लहान भावाला,थिओला पत्र पाठवून या चित्राबद्दल सांगितले आहे. गव्हाच्या शेतापल्याडच्या पर्वतरांगा, त्यांचे कडेचे लहान डोंगर वजा टेकड्या आणि त्यातले काल्पनिक गाव असे हे चित्र असल्याचा उल्लेख आहे. खगोलशास्त्रीयपुरावे पाहता पात्रातील ‘मॉर्निंग स्टार’चे सत्यहन आणि चंद्रकोरीचा व्यास पाहता मेळ जमतोय. सकाळचा तारा म्हणजे शुक्र. शुक्र हा एकटा असा तारा आहे, जो संध्याकाळच्या सुमारास पश्चिमेकडे उगवतो आणि तेजसंपन्न होत पहाटेस सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडे मावळतो.व्हिन्सेंटने आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक चित्रे रेखाटली, पण त्यापैकी त्याची केवळ ९०० चित्रे उपलब्ध आहेत. अत्यंत गरीब असताना एकच कॅनव्हासवर एका चित्रावर दुसरे चित्र त्याने काढले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मॉडेलसाठी मोजायला पैसे नसल्याने त्याने अनेक ‘सेल्फ पोर्ट्रेट्स’ काढली आहेत. या पोर्ट्रेटचे वैशिष्ट्य मात्र त्याचा कापलेला कान या चित्रात केव्हाच दिसत नाही.शेवटी चित्र म्हटल्यावर आपण त्याबाबत केवळ मतप्रदर्शनच करू शकतो. चित्रकाराचा चित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि समीक्षकांचा दृष्टिकोन यात जर तफावत असेल, तर सर्वच रसिकांचा एक एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो. यापैकी एक खरा इतर सर्व खोटे, असे आपल्याला म्हणता येत नाही. प्रत्येक प्रेक्षक एखाद्या कलाकृतीकडे आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या घटनांच्या निकषांतून पाहत असते. तेव्हा एकच चित्राचे अनेक पदर उलगडत जाणार आहेतच...