शरद पवारांच्या शिलेदाराचा निवडणूक लढण्यास नकार

    29-Mar-2024
Total Views |
Shrinivas Patil loksabha Election


मुंबई :     आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे राज्यात जोरदार वाहू लागले आहेत. विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत असले तरीही काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेले श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता सातारा लोकसभा जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची, हा पेच शरद पवार यांच्यासमोर पाटील यांच्या माघारीमुळे निर्माण झाला आहे. आपल्या तब्येतीचे कारण देत पाटलांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याचे माहिती मिळत आहे.



 
लोकसभा निवडणूक २०२४ करिता महायुतीकडून भाजपतर्फे सातारा लोकसभेची जागा निश्चित करण्यात आली आहे. भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता श्रीनिवास पाटील यांच्या नकारामुळे उदयनराजे यांच्यासमोर कुणाचे आव्हान असणार, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
 
शरद पवार यांनी नुकताच सातारा दौरादेखील केला होता. या दौऱ्यात त्यांनी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चादेखील केली आहे. त्यामुळे आता भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्याचे लक्ष असेल. तसेच, साताऱ्याची निवडणूक अत्यंत चुरशीची करण्यासाठी शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सातारा येथील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे यांचा पराभव केला होता.