निवडणूक व्यवस्थापनातील प्रारंभीचा टप्पा

    28-Mar-2024
Total Views |
Election Management


सार्वजनिक निवडणूक प्रसंगी निवडणुकीच्या तारखा, वेळापत्रक व संबंधित तपशील यांची घोषणा होताच, प्रत्यक्ष निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात होते. या निवडणूक तयारीला राजकीय-व्यावहारिकच नव्हे, तर व्यापक व्यवस्थापन पद्धतीची जोड देणे गेल्या काही निवडणुकांपासून अत्यावश्यक ठरले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला पहिल्या टप्प्यात सुरू असणार्‍या निवडक घडामोडींचा व्यवस्थापन, कार्यपद्धतींच्या पार्श्वभूमीवर ढोबळ आढावा घेणे रंजक व माहितीपर ठरावे.

 
प्रथमपणाला प्राधान्य

व्यवसाय-व्यवस्थापनामध्ये विशेषतः वाढत्या स्पर्धेवर मात करण्यासाठी, संबंधित क्षेत्रात तयारी सुरू करणेच पुरेसे नसते, तर प्रथम पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. विशेषतः जनसामान्यांशी निगडित मुद्दे त्यांच्यपर्यंत निर्धारित वेळेत व प्रभावीपणे मांडणे नेहमीच निर्णायक ठरते. जनतेवर या सुरुवातीच्या व पुढाकारासह केलेल्या प्रयत्नांचा नेहमीच परिणाम होतो.यासंदर्भात सध्याच्या निवडणूक तयारीचा पडताळा घेतल्यास स्पष्ट होते की, इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपने निवडणूक लढणार्‍या आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून, आपले प्रथमपण प्रस्थापित केले आहे. मुख्य म्हणजे, भाजपच्या या पहिल्या उमेदवार यादीने व्यापक म्हणजेच १९५ नावांची घोषणा करण्यात आल्याने, त्याला व्यापकता लाभल्याचे दिसून येते.

जुन्या-नव्यांचा उचित मेळ

व्यवस्थापन कंपन्यांमध्ये जुन्या-नव्या म्हणजेच अनुभवी व नवीन कर्मचारी-अधिकार्‍यांचा ताळमेळ घालणे आवश्यक ठरते. केवळ निवडक व अनुभवी अधिकारी ज्याप्रमाणे पुरेसे ठरत नाहीत, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येत व नवे व अनुभवी कर्मचारी अपेक्षित पद्धतीने काम करू शकत नाहीत.राजकारण असो वा व्यवस्थापन, या उभय क्षेत्रांमध्ये संस्था-संघटनेवरील निष्ठा असणे, ही मूलभूत बाब महत्त्वाची ठरते. अर्थात जुन्या-जाणत्यांचे महत्त्व सर्वविहित असतेच; मात्र त्याचवेळी संस्था-संघटनेत नवे सदस्य, त्यांची संख्या, नवा उत्साह व त्याद्वारे वाढीव पाठबळ मिळणे नितांत गरजेचे ठरते. कंपनीचे मुख्याधिकारी असो वा पक्षप्रमुख व त्याचप्रमाणे पक्षाचे पुढारी असोत वा प्रत्यक्ष निवडणूक लढणारे उमेदवार, त्यांना या जुन्या-नव्यांचा ताळमेळ साधण्याचे तंत्र असे आणि कितपत जमते, हीच बाब वैयक्तिक व संघटनात्मक यशाचा मुख्य निकष ठरते.

अपयशातून यशाकडे वाटचाल

स्पर्धेच्या जगात कुठल्याही क्षेत्रात सहज-सुलभ यश शक्य नसते. व्यवसाय व राजकारण या उभय क्षेत्रांमध्ये अधिकांश बाबी या आपल्या प्रयत्नांच्या पलीकडे असतात व त्या साध्य करण्यासाठी काळजीपूर्वक व कठोर प्रयत्नांना पर्याय नसतो. मुख्य म्हणजे, त्यासाठी कालबद्ध स्वरुपात व विशिष्ट कालावधीत प्रयत्न करणे महत्त्वाचे व निर्णायक ठरते.प्रामुख्याने तुलनात्मकदृष्ट्या व ढोबळमानाने सांगायचे झाल्यास, व्यवस्थापनामध्ये धोरणात्मक व व्यावसायिक निर्णयांसह साधारणतः दरवर्षी प्रयत्न करावे लागतात, तर राजकारणातील पक्ष-पुढार्‍यांसाठी सार्वजनिक स्वरुपात दर पाच वर्षांनी जनतेतर्फे त्यांची पारख व निवड केली जाते. त्यासाठी आपल्या क्षेत्रात या मंडळींनी केव्हा, कसे कितपत व कुठल्या कारणांनी यश मिळविले अथवा त्यांना अपयशाचा सामना करावा लागला, त्याचा आढावा घेणे फार महत्त्वाचे ठरते.

यशातील वाटेकरी व अपयशाचे धनी

वैयक्तिक-सामाजिक जीवनाप्रमाणेच राजकीय क्षेत्रात सुद्धा यशाचे धनी बहुसंख्य असतात, तर अपयशाचे धनी अल्पसंख्य. नव्यासंदर्भात व नव्या निवडणुकीच्या दृष्टीने वरील तत्त्व नेहमीच महत्त्वाचे व मार्गदर्शक ठरते.राजकीय पक्ष आणि नेतृत्वाचे यशापयश हे पक्षाचा व्याप, सदस्य संख्या, निवडणुकीतील यशापयश, निवडून आलेले उमेदवार, राज्य वा केंद्रस्तरावरील सत्तेतील सहभाग, सत्तास्थानाचे राजकारण यांवर अवलंबून असते. मुख्य म्हणजे, राजकीय संदर्भातील यशाचे मापदंड व चढउतार हे अत्यंत बदलत्या स्वरुपाचे असतात व त्याचे परिणाम प्रसंगी व्यापक व दूरगामी असतात.यासंदर्भातील प्रमुख उदाहरण म्हणून कधी काळी केवळ दोन खासदार असणार्‍या भाजपचे आता राष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित व जागतिक स्तरावरील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनणे, दशकांपर्यंत देशपातळीवर सातत्याने राज्य करणार्‍या काँग्रेसशासित राज्यांची संख्या दोन वा तीनपर्यंत येणे व त्याचवेळी राष्ट्रीय राजकारणात सत्तेसह राजकीय आब राखणार्‍या साम्यवाद्यांचे नाममात्र स्वरुपात उरणे, हे विविध राजकीय चढउतार यासंदर्भात राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक ठरतात.

नव्या जुन्यांच्या संगम-समन्वयाचे व्यवस्थापन

निवडणुकीच्या राजकारणात नव्या पक्षकार्यकर्त्यांच्या प्रवेशापासून पदाधिकार्‍यांच्या निवडीपर्यंत सर्वच टप्पे महत्त्वाचे असतात. त्यातही जटिल व पक्षनेतृत्वाच्या नेतृत्व-व्यवस्थापनाचा कस ठरतो, तो विविध स्तरांवरील निवडणुकांच्या निमित्ताने. यामध्ये निवडणुकीची पूर्वतयारी, निवडणुकांचे व्यवस्थापन, त्यादृष्टीने आवश्यक धोरण-आखणी व त्यांची इच्छित स्वरुपातील अंमलबजावणी निर्णायक ठरते. यावरच निवडणूक, पक्षनेतृत्व व राजकीय पक्षांचे भविष्य-भवितव्य अवलंबून असते.

व्यक्तीची पारख, निवड व पर्यायाची व्यवस्था

व्यवस्थापन व राजकीय पक्ष आणि निवडणुकांच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व समान सूत्र म्हणजे त्यामधील कायमस्वरुपी होणारे बदल. उभय क्षेत्रात लोकांचे येणे-जाणे सुरूच असते व त्यांच्या राहण्या-स्थिरावण्यावरच संस्था-संघटनेचे यश अवलंबून असते. अर्थात, त्यासाठी व्यवस्थापन कंपन्यांप्रमाणेच राजकीय पक्षांना मोठ्या संस्थेत व महत्त्वाच्या लोकांना कायम राखणे व त्यांच्यासह संस्था विकासाचे दुहेरी आव्हान पूर्ण करावेच लागते.बदलांचे व्यवस्थापन व व्यवस्थापनातील बदल व्यवस्थापनासंदर्भात बदलांचे व्यवस्थापन-नियोजन यशस्वीपणे करणे, ही प्रत्येक व्यवस्थापकाची महत्त्वाची जबाबदारी ठरते. हेच काम राजकीय पुढार्‍यांना आपापल्या क्षेत्रात करावे लागते. व्यवस्थापन विषयातील बदल हे मुख्यतः व्यवसाय-सेवा क्षेत्राशी निगडित असतात, तर राजकीय क्षेत्रातील बदल हे शासन-प्रशासन, आर्थिक घडामोडी, सामाजिक व राजकीय स्थितीवर बहुतांशी अवलंबून असतात. वरील दोन्ही बदलांची एक निश्चित व विहित प्रक्रिया असते व या प्रक्रिया पालनाच्या सरावावरच व्यवस्थापक असो वा पुढारी, या उभयतांसाठी सारख्याच स्वरुपात आवश्यक असते.

 
बदलांच्या व्यवस्थापनाच्या याच पुढील टप्प्यात संस्था-पक्षाच्या वा व्यवस्थापन नेतृत्वाच्या गरजांनुरूप व विविध वेळच्या परिस्थितीला पूरक अशा व्यक्ती-कार्यकर्त्यांची अदलाबदल वा फेरमांडणी नियुक्ती करावी लागते. कंपनी असो वा पक्ष, या दोन्ही ठिकाणी बदलांसाठी नियोजनपूर्ण व मानवीय पैलूंवर आधारित पद्धतीने बदल घडविणे व त्यांची अंमलबजावणी करण्यावरच त्याचे यश अवलंबून असते. व्यवस्थापनातील व्यवस्थापक-अधिकारी व राजकीय क्षेत्रातील कार्येकर्ते-पदाधिकारी यामध्ये बदल करणे म्हणूनच विचारपूर्वक करावे लागते.हल्ली राजकारणासह निवडणुकीच्या संचालन अंमलबजावणीत व्यवस्थापक आणि व्यवस्थापन पद्धतीचा बोलबाला वाढता आहे. वेगवेगळ्या राजकीय निवडणुकींमध्ये याचे प्रत्यंतर येतेच व यावेळची लोकसभा निवडणूकदेखील याला अपवाद ठरणार नाही.


-दत्तात्रय आंबुलकर
 
 
लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.