अद्भुत रामायण

    16-Mar-2024
Total Views | 68
Article on Ramayan
 

‘अद्भुत रामायण’ हे नावाप्रमाणेच अद्भुत. अनेक शाप आणि वर यांच्या अद्भुतरम्य कथांची यात रेलचेल आहे. यामध्ये रामापेक्षाही सीतेची ‘शक्तीचा अवतार’ म्हणून थोरवी वर्णिलेली आहे. रामकथेचा जनमानसावरील प्रभाव लक्षात घेऊन, अनेक संप्रदायांनी रामकथेचा उपयोग करून घेतला आहे. ‘अद्भुत रामायण’ शक्ती-देवी उपासकांच्या शाक्तपंथीय कवीने लिहिला असल्याने, देवी उपासकांमध्ये प्रसिद्ध आहे.

रामकथांच्या विविधेतील ‘अध्यात्म रामायण’ आपण गेल्या लेखात पाहिले. या लेखात रामकथेचा एक वेगळा अद्भुत शब्दाविष्कार म्हणजे ‘अद्भुत रामायण’ पाहू. रामाचा, सीतेचाच नव्हे, तर या रामायणातील सर्व पात्रांचा जन्म हा कोणाच्या तरी शापाने व उःशापाने झालेला आहे. या रामायणातील सर्व अद्भुत कथांच्या मुळाशी ‘कर्मविपाक’ या सनातन हिंदू धर्मतत्त्व सिद्धांताचा विचार अनुस्युत आहे. ‘जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ।’ हा कर्मविपाक सिद्धांत येथे विविध कथांमधून व्यक्त केलेला आहे. हा सिद्धांत आपण एकदा मनोमन स्वीकारला की, ‘अद्भुत रामायण’ अतर्क्य वाटत नाही. या रामायणातील शाप आणि वराच्या कल्पनेमागे कोणाच्या अहिताची भावना नसून, अंतिमतः सर्वांचे मंगल हा हेतू आहे. सकारात्मक विचार आहे. वाईट कर्माचे फळ भोगणे मनुष्याला जसे अटळ आहे, तसे देवालाही ते अटळ आहे, असा ‘अद्भुत रामायणा’चा सांगावा आहे.

नावाप्रमाणेच यातील कथा भाग अद्भुत आहे. ‘वाल्मिकी रामायण’ हे रामकेंद्री आहे, तर ‘अद्भुत रामायणा’त रामाएवढेच सीता माहात्म्याला प्राधान्य आहे. राम ‘पुरूष’ आणि सीता ‘प्रकृती’ असे कल्पून, प्रकृतीपुरुषाचे ऐक्यदर्शन असे या रामायणाचे स्वरूप आहे. सीता माहात्म्य प्रभावीपणे भाविक भक्तांच्या मनामध्ये रूजविण्यासाठी, सीतेने त्वेषाने चंडिकेचे रूप धारण करून, सहस्रमुख रावणाचा वध केला, अशा अद्भुत कथा या रामायणात आहे. या रामायणात २७ सर्ग आहेत. या रामायण लेखनाचा हेतू शाक्त पंथाचा प्रचार असा स्पष्ट असून कोणी शाक्तपंथी, देवी उपासक लेखकाने हे ‘अद्भुत रामायण’ लिहिले आहे. त्या लेखकाचे नाव मात्र ज्ञात नाही. त्याने मोठ्या कौशल्याने वाल्मिकी ऋषी ही रामकथा भारद्वाज मुनींना सांगतात, अशी मांडणी केलेली आहे.

‘वाल्मिकी रामायणा’पेक्षा आणखी एक वेगळेपण या ‘अद्भुत रामायणा’त आढळते ते म्हणजे, रामजन्म-रामावताराची एक आगळी वेगळी कथा यात आहे. अंबरीष राजाची कन्या ‘श्रीमती’च्या लोभाने देवर्षी नारद आणि पर्वत हे मामाभाचे स्वयंवरात भाग घेतात; पण ती विष्णूच्या गळ्यात वरमाला घालते. यामुळे क्रोधीत होऊन, देवर्षी नारद विष्णूला शाप देतात की, ‘या विश्वासघाताबद्दल तुम्हाला मनुष्याचा जन्म घ्यावा लागेल’ आणि त्या शापामुळे विष्णूचा मनुष्यरूपाने दशरथापोटी जन्म होतो. अशाच एका शापाने लक्ष्मीदेवीला रावण भार्या मंदोदरी पोटी म्हणजे राक्षसकुळात जन्म घ्यावा लागतो.

रामाद्वारे सीता स्तुती
 
या रामायणावर देवी माहात्म्याचा एवढा प्रचंड प्रभाव आहे की, ‘शिवापेक्षा शक्ती श्रेष्ठ’ या श्रद्धेप्रमाणे रामापेक्षा देवी सीता श्रेष्ठ-वंदनीय आहे, हे भाविकांच्या मनामध्ये ठसविण्यासाठी, इथे अद्भुत रामायणकार एका नव्या कथेची भर घालतात. ‘पुष्कर द्वीपातील सहस्रमुख रावणाचा सीताद्वारे चंडिकेचे रूप घेऊन वध आणि देवीरूप सीतेची रामाद्वारे सहस्रनाम स्रोताद्वारे स्तुती प्रार्थना, असा नवा कथा भाग जोडून सीतेचे श्रेष्ठत्व दर्शवितात. ती कथा अशी की, रावण वधानंतर ऋषी, मुनी, देव राम पराक्रमाची स्तुती करतात, तेव्हा सीता म्हणते की, ‘हा लंकेतील दशानन रामाने मारला यात काहीच पुरुषार्थ-पराक्रम नाही. यापेक्षा पुष्करद्वीपातील सहस्रमुख (हजार तोंडाचा) रावणास रामाने ठार केले, तरच तो खरा पुरुषार्थ, पराक्रम आहे.’ त्यानंतर राम ते आव्हान स्वीकारून, पुष्करद्वीपातील सहस्रमुख रावणाशी युद्ध करतो. युद्धात राम शस्त्र लागून मुर्च्छित पडतो. तेव्हा सीता घाबरते आणि चंडिकेचे, दुर्गेचे रूप घेऊन रावणाशी घनघोर युद्ध करून, त्याला ठार मारते. धरणीवर मुर्च्छित पडलेला राम ते सारे दृश्य पाहून आश्चर्यभय चकित होतो. सीतेच्या चंडिका रुपास नमस्कार करतो आणि तिची सहस्रनामाने स्तुती करतो, मूळ रुपात प्रगट हो अशी प्रार्थना करतो.’ हा सारा कथा भाग रामायणातील न वाटता, देवी सप्तशती गाथेतीलच वाटतो. अशा अनेक अद्भुतरम्य कथा हेच या रामायणाचे वैशिष्ट्य आहे.
 
संत एकनाथांनी रावणाच्या बंदीवासातील ‘देवबंध विममोचन’ची संकल्पना ‘भावार्थ रामायणा’त सविस्तरपणे रंगवली, ती याच रामायणातील देवबंध मुक्तीच्या कथेवरून घेतलेली आहे. कारण, मूळ ‘वाल्मिकी रामायणा’त रावणाच्या बंदीवासातील देवाची कल्पना नाही. वाल्मिकींचा राम, सीता मुक्तीसाठी रावण व लंकेवर आक्रमण करतो. देवबंध विमोचनासाठी नव्हे.

शाप कथांची मालिका ः सीता रावणाची कन्या

‘अद्भुत रामायणा’त जे काही घडते, ते शाप आणि वर यामुळेच. या रामायणात सीता ही मंदोदरी रावणाची कन्या असल्याची अद्भुत गोष्ट आहे. विष्णूचा जसा शापाने दशरथापोटी रामरुपात जन्मला होता, तसाच देवी लक्ष्मीच्या शापामुळे सीता म्हणून रावणाची राणी मंदोदरी पोटी जन्म होतो. लक्ष्मी देवीला तुझा दैत्यकुळात स्त्री म्हणून जन्म होऊन, अनंत कष्ट भोगावे लागतील, असा शाप असतो आणि आणखी एक कथा म्हणजे रावणाला अनेक वर प्राप्त असले, तरी जेव्हा तुझी दुष्ट दृष्टी तुझ्या कन्येवर पडेल, तेव्हा तुझ्या पापाच कळस होऊन, त्या कन्येच्या पतीकडूनच तुझा अंत होईल, असा शाप असतो. या सार्‍या शापकथा खूप पाल्हाळीक आणि विचित्र आहेत, तरी पण मंदोदरी पोटी दैत्यकुळात ’सीता जन्माच्या शाप कथे’वर प्रयाग विद्यापीठात कोणी अरविंदकुमार व कुसुमकुमार यांनी प्रबंध लिहून ’पीएचडी’ केलेली आहे.

’अध्यात्म रामायण’, ’अद्भुत रामायण’ ही रामकथेची विविधता व विपुलता म्हणून अभ्यासकांना आणि त्या-त्या संप्रदायांना महत्त्वाच्या असल्या, तरी या सार्‍या अद्भुत कथांमुळे आणि वैचित्र्यामुळे वाल्मिकींचे मूळ रामायण हरवून गेलेले आहे. या नव्या-नव्या रामायणांनी रामोपासनेची व्याप्ती वाढली, या नव्या रामायणातून राम उपासकांना अनेक ‘स्तुती स्तोत्रे’ मिळाली, हे खरे आहे. त्यामुळे भक्ती संप्रदायातील संतांनी-भक्तांनी ‘वाल्मिकी रामायणा’पेक्षा ‘अध्यात्म रामायण’, ‘अद्भुत रामायण’ यामधील कथांचा आधार घेऊन अभंग, दोहे अशी भक्ती रचना-काव्य केलेले अभ्यासांती आढळते.
(पुढील अंकात ः आनंद रामायण)

विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
vidyadhartathe@gmail.com
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121