कलात्मक पद्धतीने समाजाला दिशादर्शन घडवावे : राजदत्त

    09-Feb-2024
Total Views |
Raj Dutt


“आपल्या कलाकृतीवर अजिबात भाळून न जाता, त्यातून शिकवण घेत ती अधिक चांगली कशी करू शकतो, याचा प्रत्येक कलावंताने विचार केला पाहिजे. याच पद्धतीने काम करत संघ स्वसंसेवक, ‘विवेक’मधील मंडळींनी आपली वाटचाल सुरू ठेवावी आणि कलात्मक पद्धतीने समाजाला दिशादर्शन घडवावे, अशी इच्छा आहे,” असे मौलिक विचार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले. राजदत्त यांना त्यांच्या मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल २०२३ सालचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते ‘विवेक फिल्म्स’ या नव्या आयामाच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयाचा शुभारंभ सोहळा गुरुवारी संपन्न झाला. त्यानिमित्ताने राजदत्त यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
 
सर्वप्रथम आपल्याला ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. पुरस्कार जाहीर होणार आहे, हे कळले तेव्हा कोणत्या भावना दाटून आल्या?

मी मानतो की, कलाकाराने जे मिळाले आहे, त्याचा आनंद जरुर घ्यावा. पण, त्याचबरोबर थोडसं स्वत:कडे पुन्हा पाहण्याची गरज असते, तेव्हाच कलावंत विकसित होऊ शकतो. माझ्या हातून जे कार्य घडले आहे, त्याचा अभिमान किंवा दुराभिमान न बाळगता ‘मी अजून प्रयत्न का केले नाही’ याचा विचार प्रत्येकाने कायम केला पाहिजे. मला जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल मी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो.
 
अगदी लहानपणापासूनच आपली नाळ रा. स्व. संघाशी जोडली गेली. तेव्हा, आज मागे वळून पाहताना या संघमय प्रवासाकडे आपण कसे बघता?

वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच मी रा. स्व. संघाशी जोडला गेलो. माझे वडील रेल्वेत कार्यरत असल्यामुळे अमरावतीमध्ये त्यांची बदली झाली होती. ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर आमच्या जवळपास राहत होते. एकेदिवशी ते आईला म्हणाले की, याला आता मी संध्याकाळी एकेठिकाणी घेऊन जातो. त्यादिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. मी त्यांच्यासोबत संध्याकाळी ७ वाजता एका मंदिरात गेलो. तिथे काही कार्यक्रम झाले. पण, मला तिथे जाण्याचा एक वेगळाच आनंद होता, तो म्हणजे तिथे जाऊन मला आटिव दूध प्यायला मिळाले होते. त्यामुळे माझ्या मनात असे आले की, संघात गेले की रोज वाटीभर दूध मिळणार. या कल्पनेतून मी संघात जाण्यास सुरुवात केली. पण, जसजसे वय वाढत गेले, तसेतसे मी अधिकाधिक संघाशी जोडत गेलो, शाखेत राहायला लागलो. अकोल्याला वडिलांची बदली झाली होती, तेव्हा तिथल्या शाखेमध्ये आमचा खेळ चालू असताना प्रमुख शिक्षकांनी येऊन आमचा खेळ थांबवला आणि सांगितले की, आत्ताच निरोप आला आहे डॉ. हेडगेवारांचे निधन झाले. त्यावेळी माझे लहान वय होते. ते ऐकून मी कपाळाला हात मारला आणि म्हटले, अरे दोन तास अजून थांबले असते, तर काय झाले असते? आमचा खेळ तर झाला असता!तर ही मानसिक अवस्था असतानाचा काळ आणि त्यानंतर संघाचे संस्कार होत राहणे, अशी संघासोबतची अतूट नाळ बांधली गेली. आजही माझे क्षेत्र वेगळे असेल किंवा मी ‘संस्कार भारती’चा अध्यक्ष झालो असलो तरीही मी संघ स्वयंसेवक आहे, हे ध्यानात ठेवूनच माझे काम करत राहिलो आणि आजन्म करत राहीन.

संघबंदीच्या काळात तुम्हाला तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्या कठीण काळाच्या काही आठवणींबद्दल काय सांगाल?

त्यावेळी मी १६ किंवा १८ वर्षांचा होतो. त्यावेळी असा निरोप आला की, वर्षभर संघाची शाखा लागली नसल्यामुळे आज शाखा लावायची आहे. तिथे गेलो आणि आम्हाला पोलिसांनी गराडा घालून पकडून नेले. जवळजवळ १ महिना १७ दिवस मी तुरुंगात होतो. आम्हाला जरी तुरुंगात ठेवले असले तरी तिथे सगळेच स्वयंसेवक असल्यामुळे आम्हाला संघ विसरता येत नव्हता. स्वयंसेवकांनी जो त्याग केला, त्या प्रत्येकाने त्या संघ सत्याग्रहाच्या यज्ञात काडी टाकून तो यज्ञ पेटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच पुन्हा संघ शाखा सुरू झाली ती आजतागायात सुरू आहे.

‘संस्कार भारती’चे अध्यक्षपद भूषवताना एकूणच अनुभव कसा होता?

‘संस्कार भारती’चे काम करताना कलाक्षेत्र हे आपल्यापुरते मर्यादित न ठेवता समाजापर्यंत ते पोहोचले पाहिजे, असा माझा अट्टाहास होता. लहानपणापासूनच नाटकांमध्ये मी कामं केली. केरळमध्ये डांगे हे प्रचारक होते, जे शाळेत माझे शिक्षकही होते. त्यांनी जी नाटकं लिहिली, त्यातही मी कामं केली. इतकंच नाही, तर मी स्त्री भूमिकादेखील साकारली आहे. नाटकात काम करणे हा माझा एक नादच होता.

संघाचे स्वयंसेवक ते चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक, हा आपला प्रवास नेमका कसा झाला?

मी नागपूरच्या दै. ‘तरुण भारत’मधील रविवारच्या अंकात एक विद्यापीठाचे सदर लिहायचो. त्यानंतर ‘बी.कॉम’ झाल्यानंतर मी ग. दि माडगुळकरांना सांगितले की, मला तुमच्याकडे यायची इच्छा आहे. तिथे मला नोकरी द्या. काही काळाने त्यांनी मला एक पत्र दिले आणि मद्रासला ‘चांदोबा’ मासिकात संपादक म्हणून पाठवले. तिथे जरी मी संपादक असलो तरी स्वत: विचार करून काही लिहिण्यासारखे नव्हते. कारण, इंग्रजी भाषेत जो मजकूर यायचा, तो मी मराठीत अनुवादित करायचो, इतकेच माझ्याकडे काम असल्यामुळे वेळ खूप असायचा. तेव्हा ज्येष्ठ दिग्दर्शक आणि माझे गुरू राजा परांजपे मद्रासला आले होते. त्यांच्याकडे शिकण्यासाठी गेलो. तिथे त्यांनी ‘बाप बेटे’ हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मला त्यांच्यासोबत येण्याबद्दल विचारणा केली. ते मला म्हणाले की, “तुला पैसे मिळणार नाही. माझ्यासोबत राहायचे, केवळ जेवण मिळेल.” मी विचार केला आणि दोन पत्रं लिहिली. त्यातील पहिले पत्र मी वडिलांना लिहिले आणि चित्रपट क्षेत्रात मी जाऊ का, असे त्यांना विचारले. त्यावर त्यांनी उत्तर कळवलं की, “तू आता २० वर्षांचा झाला आहेस. तुझे निर्णय घेण्यास तू सक्षम आहेस. त्यामुळे तुझे तू ठरवावे. माझ्याकडून मनीऑर्डरची अपेक्षा करू नये.”

त्यानंतर दुसरं पत्र मी वर्धा जिल्ह्याच्या आमच्या संघचालकांना, आप्पा जोशी यांना लिहिले. त्यात त्यांना मी विचारणा केली की, मी चित्रपट व्यवयासात जाऊ का? चालेल का? बैठकीच्या ठिकाणी त्यांना माझे ते पत्र मिळाले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस तिथे बसले होते. आप्पासाहेबांनी त्यांना मला या पत्राचे उत्तर लिहायला सांगितले. बाळासाहेबांनी मला जे पत्र पाठवले त्यात - ‘तू हा प्रश्न केलाच का?’ असे विचारत पुढे म्हटले की, “संघ स्वयंसेवकांनी कुठल्याही क्षेत्रात जावे, पण मी संघ स्वयंसेवक आहे, हे विसरू नये” आणि तिथून माझ्या चित्रपटसृष्टीची सुरुवात राजाभाऊंचे बोट धरून सुरू झाली. सात वर्षं त्यांच्याकडे शिकल्यानंतर १९६७ साली मी माझा पहिला स्वतंत्र चित्रपट ‘मधुचंद्र’ दिग्दर्शित केला. त्यावेळी माझ्या मनात आले की, तुला हे सगळे कुणी शिकवले? तर ज्यांच्यामुळे तू हे सारे काही शिकलास, त्याचे नाव कायम लक्षात ठेवून त्यांचा आदर ठेवला पाहिजे. त्यामुळेच माझे चित्रपटसृष्टीतील गुरू राजा परांजपे यांच्या नावातील ‘राज’ आणि माझ्या खर्‍या ‘दत्तात्रय’ नावातील ‘दत्त’ असे नाव घेऊन मी माझ्या गुरुंचे, राजा परांजपे यांचे स्मरण राहावे म्हणून समाजाला माझे नाव ‘राजदत्त’ असे केले.

तुमचे गुरू ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे यांच्यासंदर्भातील काही आठवणी किंवा एखादा अविस्मरणीय प्रसंग, जो आजही तुमच्या मनात तितकाच ताजा आहे...

‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. राजाभाऊ या दरम्यान भेटले आणि मला त्यांनी विचारले की, कसं वाटतयं तुला? शिकतो आहेस ना? त्यावर मी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक करायला लागलो. तेव्हा ते मला म्हणाले, “माझे कौतुक करू नकोस. माझा अभिनय माझ्यापाशी. यातून तू कसा शिकत जातोस, हे फार महत्त्वाचे आहे आणि मग लोकांकडून ते करून घे,” असे म्हणत खरं तर त्यांनी मला दिग्दर्शनाची दिशा दिली आणि पुढे माझ्या हातून अनेक कलाकृती घडल्या.

रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तुम्ही माहितीपट दिग्दर्शित केला होता. त्याची खास आठवण जाणून घ्यायला आम्हाला आवडेल...

ज्यावेळी डॉ. हेडगेवार यांचे निधन झाले, ही दुर्दैवी घटना मी माहितीपटात दाखवली, त्यावेळी त्यांचे मृत शरीर मी दाखवले नाही, तर मी एक पाठमोरे हेडगेवार एका टेकडीवर चढत आहेत आणि उतरताना ते दिसेनासे होतात आणि तिथून एक भगवा ध्वज येतो आणि त्याच्यातून संचलित चाललेले स्वयंसेवक दिसतात. याचा अर्थ असा होता की, जरी डॉ. हेडगेवार आपल्यातून निघून गेले असले तरी संघ अमर आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक आणि चित्रतपस्वी भालजी पेंढारकर ज्या प्रकारच्या ऐतिहासिक किंवा पौराणिक चित्रपटांची निर्मिती करत होते, तसाच काहीसा काळ पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत अवतरलेला दिसतो. याकडे तुम्ही कसे पाहता?

भालजी पेंढारकर यांची चित्रपट तयार करण्याची एक वेगळी कला होती. त्यांचा प्रत्येक चित्रपटांच्या माध्यमातून एक अट्टाहास होता की,छत्रपती शिवाजी महाराज हे पात्र समाजात बिंबवायचं आणि याच दृष्टीने त्यांनी सर्व चित्रपट केले. आता तिच कला प्रत्येक ऐतिहासिकपट करणार्‍या कलावंतांनी ठेवली पाहिजे, असे नाही. परंतु, कलेच्या क्षेत्रात आपले स्वत:चे विचार मांडता आले पाहिजे.

आजच्या मराठी चित्रपटसृष्टीविषयी, एकूणच स्थित्यंतराविषयी काय सांगाल?
 
प्रत्येक माणसाचं काळानुसार विचार आणि जगणं बदलले आहे. आजचा मनुष्य तंत्रज्ञानाच्या काळात ‘मशीन’ झाला आहे. त्यामुळे मशीन न होता पुन्हा एकदा माणूस झाले पाहिजे. मराठी चित्रपटसृष्टीचा वापर हा संदेश न देता, सहजतेने एखादी गोष्ट प्रेक्षकांच्या मनात बिंबवण्याचे काम नवोदित कलावंतानी करावे, अशी अपेक्षा करतो आणि कला मुळात असमाधानी असणे, ही कलाकाराची खरी गरज आहे. जे आपण करू शकलो, त्याच्याबद्दल टिमकी वाजवत बसण्यापेक्षा स्वत: त्यामध्ये गुंतले पाहिजे.


- रसिका शिंदे-पॉल

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.