काकांना गम

    09-Feb-2024
Total Views |
sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विभाजनानंतर आणि आता तर निवडणूक आयोगाने हा पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर, या पक्षाचा एकेकाळी दबदबा असणार्‍या पुणे महानगरात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात एक गोष्ट निश्चित झाली. ती म्हणजे, काकांच्या गोटात अगदीच सामसूम आणि गम पसरला असल्याचे वातावरण दिसून आले. याचाच दुसरा अर्थ असा की, जो काही पक्ष या भागात विस्तारला गेला, त्यात अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांचेच अधिक योगदान होते, हेदेखील या निमित्ताने स्पष्ट झाले. अर्थात, या पक्षातील गटबाजी आणि आमदारांची काकांवरील नाराजी ही अलीकडील काळात लपलेली नव्हती. राज्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांसारख्या तरूण नेतृत्वाची गरज जनतेला वाटू लागली होती. त्यामुळे परंपरागत सत्तेत चिकटून राहिलेल्यांबाबत तसाही अनेकांना तिटकारा होताच. राष्ट्रवादी पक्षात तो सातत्याने दिसून येत होता. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरात या पक्षाची वाटचाल दमदार होण्याला अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची साथ होती, हे कोणीही नाकारणार नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने जो निकाल अजित पवारांच्या बाजूने दिला, तेव्हा दादांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह अर्थातच द्विगुणित झाला आणि काकांच्या गोटात सर्वार्थाने गम पसरला. अक्षरशः पुण्यात तर या पक्षाचे दादांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कार्यालय परिसरातील कोनशिला काढून टाकताना, हे दुःख काकांच्या समर्थकांकडून जाहीर झाले. यात दादांचे नाव काढून टाकावे लागत असल्याच्या वेदनाच अधिक होत्या. त्यामुळे काका समर्थकांत असलेल्या गममध्ये संमिश्र भावनादेखील भविष्यात काकांपेक्षा दादांनाच उपकारक ठरू शकतात, असे संकेत देणारे, हे वातावरण कितीही लपवित राहिले, तरी खुद्द काकांना गमकारक राहील, यात संदेह नसावा. त्यामुळे काकांनी काय गमावले, यापेक्षा काय कमावले, याचीच चर्चा हे सगळे समर्थक करीत आहेत. एकूणच राजकीय मानसिकतादेखील आता सकारात्मक होत आहेत. सकाळचे वाजणारे भोंगे, टोमणे मारणारे लोक आणि उठसूठ राजकारण करणारे राजकारणी, यांच्यात आणि विधायक कामे करणारे राजकारणी यांच्यात श्रेष्ठ कोण, हे जनतेला तर कळतच आहे; मात्र कार्यकर्त्यांना देखील ते आता उमजत आहे.

गुन्हेगारांना दम


पुण्यात काय-काय शक्कल लढविल्या जातील, याचा नेम नाही. त्यामुळे ’पुणे तिथे काय उणे’ ही म्हण वेळोवेळी प्रचलित होत असते. नुकतेच येथे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार रूजू झाले. त्यामुळे त्यांनी येथील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणे क्रमप्राप्त होते. अर्थातच, वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी, अशा पदांवर असलेल्या व्यक्ती त्या भागातील परिस्थितीचा एकूणच आढावा घेऊन, कारवाईचे अस्त्र बाहेर काढीत असतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांना दम देण्यासाठी, जी क्लृप्ती नव्या पोलीस आयुक्तांनी अंगीकारली, त्याची चर्चा केवळ त्या दिवशीच नव्हे, तर सर्वत्र आता समाजमाध्यमांवर देखील होत असून, एकमेकांचे शत्रू असणार्‍या गुन्हेगारांना अशा प्रकारे आमनेसामने आणून, त्यांनी एक प्रकारचा कठोर इशाराच दिल्याने, गल्लोगल्ली पुण्यात सुळसुळाट असणार्‍या अशा टोळक्यांच्या सामान्यांना होणार्‍या त्रासदायक कारवायांना आळा बसेल, असा विश्वास जनतेत देखील निर्माण झाला आहे. एका तीरात अनेक पक्षी मारण्याची ही आयुक्तांची कल्पकता भविष्यात पुण्यातील जनजीवन भयमुक्त राहण्यास उपयुक्त ठरणार आहे, यात संदेह बाळगायला हरकत नाही. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यावर ज्या काही चांगल्या गोष्टी केल्यात, त्यातील दोन म्हणजे आजची सोशल मीडियावर व्हायरल होणारी पिढी ताळ्यावर आणण्यासाठी उचललेले कारवाईचे पाऊल आणि गल्लोगल्ली जी गुन्हेगारी रिकामटेकडी लोकं पसरवित होते, त्यांना आळा घालण्यासाठी त्यांना भरलेला जाहीर दम.आजकाल मोबाईलसारखा कृत्रिम जीव प्रत्येकाच्या हातात काय आला आणि जो तो त्यावरून व्यक्त होताना, भान हरपून बसला आहे. त्यात गुन्हेगारी क्षेत्रात वावरणारी काही टाळकी आपला तोरा मिरविण्यासाठी, या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करू लागल्याचे चित्र अलीकडे दिसत आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, अशा लोकांना दम देणे गरजेचे आहे. अर्थात, अशा प्रकारचा दम भरल्यावर, आता ही गुन्हेगारी लगेचच संपुष्टात येईल, असे म्हणणे घाईचे ठरेल. मात्र, उठसूठ कोयते घेऊन वावरणार्‍या टोळक्यांना आणि गल्लीबोळात जाऊन वर्चस्ववादातून खुन्नस काढणार्‍यांना यामुळे जरब बसेल, हे निश्चित.


-अतुल तांदळीकर


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.