लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे (भाग-२)

    03-Feb-2024
Total Views |
Lakshdweep and Minicoy Island

लक्षद्वीपला जर मालदीवप्रमाणे पर्यटन विकसित करायचे असेल, तर दोन मोठ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. तिथे असलेली सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा विकास केल्यास पर्यटक तिथे मोठ्या संख्येने दाखल होतील. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
 
लक्षद्वीप बेटांना अपारंपरिक, पारंपरिक धोके

लक्षद्वीप बेटाला अपारंपरिक धोके आहेत. अवैध मासेमारी, अवैध घुसखोरी, अ़फू-गांजा तस्करी, वसाहती नसलेल्या बेटांचा, दहशतवादी गटांकरवी तसेच तस्करांकरवी लपण्यासाठी/माल लपवण्यासाठी म्हणून केला जाणारा वापर व लक्षद्वीप बेटांवर नैसर्गिक आपत्तीचीही भीती.

दि. ५ डिसेंबर २०१० रोजी, सहा सोमाली चाच्यांनी बांगलादेशी ध्वज असलेली ’एम.व्ही.जहान मोनी’ ही नौका लक्षद्वीप बेटांपासून ६७ नॉटिकल मैल अंतरावरून पळवली होती.

मार्च २०१० मध्ये, एका माल्टेसी नौकेवर चाच्यांनी घाला घालण्याचा केलेला प्रयत्न, भारतीय नौदलाने/तटरक्षक दलाने लक्षद्वीप बेटांपासून २०० नॉटिकल मैल अंतरावर उधळून लावलेला होता. मे २०१० मध्ये, आठ सोमाली चाचे लक्षद्वीप बेटांवर पकडण्यात आलेले होते.

नोव्हेंबरमध्ये मालडबेवाहू नौकांवरील चाचेगिरीचे दोन प्रयत्न यशस्वीरित्या उधळून लावण्यात आलेले होते. यांपैकी एक घटना मिनिकॉय बेटापासून केवळ १५० नॉटिकल मैल दूरवर घडलेली होती. डिसेंबरच्या सुरुवातीस भारतीय नौदलाने, १५ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असलेल्या १९ परकीय नागरिकांसहितची एक धौलाकडी बोट, लक्षद्वीपमधील बिट्रा बेटानजीक पकडली होती.

चाचेगिरीविरोधी आणि दहशतवादविरोधी उपाय

भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी चाचेगिरीविरोधी गस्ती एडनच्या आखातात सुरू केल्या. आता ‘इंटरनॅशनली रेकमेंडेड ट्रान्झिट कॉरिडोर’ ४९० नॉटिकल मैल लांब आणि २० नॉटिकल मैल रुंद क्षेत्रात प्रवासादरम्यान व्यापारी नौकांची सोबत केली जाते. पश्चिम हिंदी महासागरातील या मार्गिकेचे संरक्षण करण्याचे दृष्टीने, ’शेड’ (शेअर्ड अवेअरनेस अ‍ॅण्ड डिकॉन्फ्लिक्शन) या आंतरराष्ट्रीय गटात भारताने सहभाग घेतला आहे.
 
लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांची ओळख विकसित करा

बेटांनी स्वतःची ओळख, आकांक्षा, दृष्टी आणि राष्ट्रीय चौकटीतली आपली जागा विकसित केली पाहिजे. राजकीय-प्रशासकीय पायाभूत सुविधा वस्ती नसलेल्या बेटांपर्यंतही पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. हे दीर्घकालीन पर्यटनाच्या दृष्टीने अनिवार्य आहे. शिवाय इथे खूप अशोधित (अनएक्सप्लोरड अ‍ॅण्ड अनएक्सप्लॉईटेड) जमीन आणि समुद्री भाग असल्याने, ते आर्थिक वाढीची संधी पुरवतात.

- गतिमान आणि समर्पित राजकीय-नोकरशाही नेतृत्व, नागरी प्रशासनास सशक्त करावे.

- विशेष आर्थिक क्षेत्रे स्थापन केली जावीत.
 
- परावलंबित्व व अनुदाने इत्यादींतून बेटांना बाहेर काढण्यासाठी, सामाजिक-आर्थिक वाढ घडवून स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण झाली पाहिजे.

- व्यावसायिकांना बेटांवर, सुयोग्य तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक सरकारी प्रोत्साहने दिली जावीत.
 
- सागरतळ उत्खननासाठी (ocean bed exploitation) उच्च तंत्र आयात करावे.

मुख्यभूमीशी संपर्कात राहण्यासाठी संचार जाळे

मुख्यभूमी आणि बेटाबेटांतील संचार जाळे सुधारले जावे. आंतर-बेट दळणवळणसेवांच्या वारंवारता वाढवल्या जाव्यात. त्यामुळे बेटांचा गट परस्परांच्या जवळ येईल. शिवाय पुरवठ्याच्या पायाभूत सुविधाही केवळ प्रभावी संचार जालानेच साध्य होऊ शकतात.
नौकागार/गोदी सुविधांचा विकास

या क्षेत्रांत केवळ समुद्री जलमार्गांनीच पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र, बहुतेक बेटांना उत्तमरित्या विकसित नौकागारे/चढ-उतार करण्यासाठी, धक्क्यांसहित गोद्या नाहीत. म्हणून नौकागार/गोदी सुविधांचा विकास खूपच महत्त्वाचा आहे.

लक्षद्वीप द्वीपप्रदेश सुरक्षेकरिता प्रभावी निगराणी जरुरी

बेटांवरील सुरक्षेकरिता प्राथमिक प्रभावी निगराणी जरुरी असते. ती अवलंबून असते, शोधाचे सामर्थ्य आणि ओळख पटवण्याच्या सामर्थ्यावर. विस्तृत भौगोलिक क्षेत्राच्या निरंतर चित्रांकनाचे सामर्थ्य, लवकर पूर्वसूचना देणार्‍या रडारला, मनुष्यविरहित हवाई वाहनांना आणि सुयोग्यरित्या विखुरलेल्या उपग्रहांना तैनात करून साधले जाऊ शकते.
 
लक्षद्वीप बेटांचा वापर, न बुडणारी विमानवाहू जहाजे म्हणून केला जावा. या तळांचे स्थान भारतीय मुख्य भूमीपासून सुमारे ३०० किमी दूर आहे. त्यामुळे विमानांना विस्तारित लढाऊ त्रिज्या प्राप्त होईल. तो लाभ करून घ्यावा.

- भविष्यात आवश्यक ठरल्यास, या बेटांवर क्षेपणास्त्रे तैनात करून, त्यांचा पल्ला विस्तारला जाऊ शकतो.

- हिंदी महासागरातून मालेची इलेक्ट्रॉनिक देखरेख या बेटांवरून प्रभावीरित्या केली जाऊ शकते. येथे आंतरराष्ट्रीय चाचेगिरीविरोधी केंद्र स्थापन केल्यास, चाचेगिरीविरोधी उपायांना गती प्राप्त होईल. मिनिकॉय बेट आणि मालदीव दरम्यानच्या भागाचीही देखरेखही करता येईल.
 
पर्यटनास प्रोत्साहन

पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा आणि समयबद्धरितीने बेटांवरील पायाभूत सुविधा वाढवाव्यात. शेजारी देशांसोबत शक्य ते संस्थात्मक संबंध प्रस्थापित करावेत. ज्याद्वारे चाचेगिरी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध स्थलांतरे रोखली जाऊ शकतील. त्याकरिता शेजारी देशांशी हस्तांतरण करारही केले जावेत. बेटांच्या अर्थव्यवस्थेस चालना देण्याकरिता पर्यटनास प्रोत्साहन दिले जावे. जैवविविधतेचे संरक्षण करावे आणि पर्‍यावरणास सांभाळले जावे.
 
राष्ट्रीय हित जपण्याकरिता सागरी व्यूहरचना

राष्ट्रीय हित जपण्याकरिता, आपले समुद्री सामर्थ्य वाढविणारी व्यूहरचना पुढीलप्रमाणे असावी-

- दुहेरी मार्गांवर चालणारी मुत्सद्देगिरी उपयोगात आणली जावी. अरबी समुद्रात, शक्य ती महासागरी शक्ती आक्रमक षड्यंत्राविरुद्ध वापरली जावी आणि त्याच वेळी कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स अमलात आणून, आर्थिक सहकार्‍याची क्षेत्रे वाढवावीत.

- युद्धापासून संरक्षणार्थ आणि शांतता काळात समुद्रमार्गे होणार्‍या भारतविरोधी हालचाली रोखण्यासाठी, हिंदी महासागरव्यापी निगराणी सामर्थ्य विकसित करणे.
- आंतर-प्रादेशिक नौदल सहकार्य वाढवून, प्रादेशिक संबंध बळकट करणे. या देशांसोबतच्या संबंधांचा विस्तार करणे आणि आसिआन प्रादेशिक मंचात नेतृत्व करणे.

- ‘एक्सक्लुझिव्ह इकोनॉमिक झोन’ क्षेत्रातील, भारताच्या आर्थिक हालचालींकरिता, सुरक्षित वातावरण पुरवणे आणि समुद्रातील आपल्या संसाधनाचे संरक्षण करणे.

- हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि तांबड्या समुद्रात हुती बंडखोर धोक्यांविरुद्ध भारताच्या समुद्री व्यापारास संरक्षण देणे.
 
- कुठल्याही आक्रमकास परावृत्त करेल, अशा प्रकारे शत्रूला धडकी भरवणार्‍या, महासागरी आणि जमिनी पायाभूत सुविधा बेटांवर विकसित करणे.

- मैत्रिपूर्ण किनारी देशांना मदत करणे. मालदीवसारख्या सरकार उलथवण्यासारख्या गंभीर प्रसंगी मदत करणे.

- द्वीपक्षीय/बहुपक्षीय संयुक्त नौदल आणि तटरक्षक दल कवायती आयोजित करणे.

- मदत आणि आपत्ती निवारक कार्यवाही पुरवणे, ज्यामुळे आपली बेटे, वेळेत मदत करण्यास समर्थ असलेली भारताची मैत्रिपूर्ण आघाडी असल्याचे जगाला दिसू शकेल.

- मित्राकरिता हस्तांदोलन करणार्‍या आणि शत्रूकरिता वज्रमूठ घडवणार्‍या समर्थ हातांशी तुलना केली जाते. या बेटांनी भारताच्या एकूण महासागरी व्यूहरचनेत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे आणि प्रदेशात भारताला आपली न्याय्य जागा मिळवून दिली पाहिजे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय भारतासाठी सामाजिक, आर्थिक आणि लष्करी संधी ठरणार आहेत.

मी मुख्य भूमीवर परत असताना, येथील वाहतूक प्रणालीचे अतिशय ठिसूळ स्वरूप निदर्शनास आले. नेहमी वाहतूक करणारे पवनहंस हेलिकॉप्टर आणीबाणी प्रसंगात जखमी व्यक्तींची सुटका करण्यास गेलेले होते. त्यामुळे कवरत्तीहून अगत्ती विमानतळावर जाण्यासाठी ते उपलब्ध नव्हते. बेटांदरम्यानच्या बोट सेवेचा उपयोग आम्हाला अगत्ती बेटावर पोहोचण्याकरिता करावा लागला. विमानतळावर आम्ही जेमतेम वेळेत पोहोचलो. ’एअर इंडिया’चे विमान मग आम्हाला कोचीनकडे घेऊन निघाले आणि आमचा केरळकडचा प्रवास सुरू झाला.
 
लक्षद्वीप बेटे भारताच्या सुरक्षा दलांकरिताचे महत्त्वाचे तळ आहेत. पुरेशा पायाभूत सुविधा प्रस्थापित होण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे संकटप्रसंगी दले झपाट्याने, मुख्यभूमीपासून हलवली जाऊ शकतील आणि त्यांना तैनात केले जाऊ शकेल.
लक्षद्वीप व मिनिकॉय बेटांतील पायाभूत सुविधांचा उपयोग निगराणी-टेहाळणी व गुप्तचर संस्था, घुसखोरी, दहशतवाद आणि अरबी समुद्रातील व हिंदी महासागरातील चाचेगिरी रोखण्यासाठी केला पाहिजे. यामुळे पर्यटनदेखील वाढेल.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.