आळंदीतला सेवादूत

    12-Feb-2024   
Total Views |
Article on Ashok Deshmane

शेकडो मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी पूर्णतः समर्पित जीवन जगणारे आळंदी येथील अशोक देशमाने यांचे कार्यविचार हे समाजकार्य करणार्‍यांसाठी आदर्श. त्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

'स्नेहवन’चे संस्थापक आळंदीच्या अशोक देशमाने यांचे नाव सामाजिक क्षेत्रात तसे सुपरिचित. ‘आयटी’ क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून ते पूर्णवेळ आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शोषित, वंचित, पीडित कुटुंबांच्या मुलांच्या उत्थानासाठी काम करतात. नुकतेच त्यांच्या संस्थेमार्फत आळंदी येथे २०० मुलांसाठी वसतिगृह बांधण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते या वसतिगृहाचे उद्घाटनही झाले. या सगळ्या कामात सज्जनशक्ती मनापासून त्यांच्या पाठीशी उभी राहिली. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी आळंदी येथील जमीन अशोक यांना सामाजिक कार्यासाठी दानही दिली. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची मूल, भटके विमुक्त गरीब कुटुंबातली मूल, कर्जबाजारी किंवा परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण न करू शकणार्‍या एकल मातेच्या मुलांचे आज अशोक देशमाने पालक आहेत.

देशमाने कुटुंंब मूळचे परभणीतल्या मानवत गावचे वारकरी कुटुंब. त्यांची आई सत्यभामा आणि वडील बाबाराव आयुष्यभर शेतात राबले. पण, हातात कधीच काही पडले नाही. शेतजमीन होती. पण पाऊस कमी, पाण्याचे दुर्भिक्ष. अशावेळी चार वर्षे शेतात काहीच पिकत नसे. त्या काळात गावातल्या सगळ्याच शेतकर्‍यांच्या घरी चुली थंडावलेल्या असायच्या. लहान पोरंबाळं भूकभूक करत रडत निपचित पडून जात. ते दुःख बघून आयाबाया घरात खंगून जात, तर बापे माणूस कामाच्या शोधात घराबाहेर पडे. पण, तरीही दुःख कमी होत नसे. एका वर्षी पाऊस झाला. देशमाने कुटुंबाने शेतात ऊस लावला. कधी नव्हे, पीक-पाणी तरारेल, पैसे हातात येतील, अशी अपेक्षा होती. पण, त्या वर्षी उसाचे उत्पन्न सगळीकडे विक्रमी झाले. उसाला भाव मिळालाच नाही. अगदी तोटा सहन करून विकू म्हणायचे तरीही कुणी ऊस विकत घेतला नाही. तेव्हा अशोक यांनी पाहिले होते की, तोच ऊस उभ्या शेतात जाळावा लागला होता.

असो. याही परिस्थितीमध्ये अशोक शाळेत जाऊ लागले. बाबाराव खताच्या पिशवीला शिवून त्यातून शाळेची बॅग तयार करत. ती बॅग घेऊन अशोक शाळेत जात. कधी पुस्तक नाहीत, तर कधी पन्सिल-पेन नाही. अशोक दहावीला गेले. पण, दहावीचे परीक्षा शुल्क भरायलाही पैसे नव्हते. अशोक यांच्या शिक्षकाने ३५ रु. परीक्षा शुल्क भरले. पुढे ते परभणी शहरात महाविद्यालयात जाऊ लागले. काम करून ते शिकू लागले. शिक्षण घ्यायचेच ही जिद्द होती. कारण, त्यांच्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव होता. स्वामी विवेकानंदांचे आत्मचरित्र तसेच त्यांचे चरित्र घडवताना हे पुस्तक अशोक यांच्या वाचनात आले. त्याच काळात बाबा आमटे यांच्या कार्याचा परिचयही त्यांना झाला. आपल्यापेक्षाही खडतर परिस्थितीमध्ये समाजबांधव जगतात. आपण समाजाचे देणे लागतो. आपण परिस्थितीवर मात करून पुढे जायला हवे आणि समाजालाही सोबत घ्यायला हवे, असा विचार त्यांच्या मनात ठाम झाला. त्यामुळेच त्यांनी पुढे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कॉमप्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी ‘रेडहॅक सर्टिफाईड इंजिनिअर’, ‘रेड हॅट सर्टिपाईड सिस्टीम अ‍ॅडमिन’ हे दोन कोर्स हैदराबाद येथून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करून ते पुण्यात नोकरीसाठी आले. त्यांना चांगली नोकरीही लागली. या सगळ्या काळात ते सुट्टीच्या दिवशी शहरातील काही सेवावस्त्यांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जात, आर्थिक सहकार्य करत.

२०१३ ते २०१५ या काळात परभणी जिल्ह्यात दुष्काळ पडला. परभणीच्या मानवत गावात एका शेतकर्‍याने आत्महत्या केली. अशोक यांचे आई-बाबा मानवतमध्ये गावी राहायचे. गावात दुष्काळाने पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यामुळे सगळ्याच गोष्टींची वानवा. आई-बाबांना पुण्याला आणण्यासाठी ते गावी गेले. पण, त्यांच्या आई-बाबांनी सांगितले की, काही काळाने पुण्यात येऊ, आता नाही. त्यामुळे ते एकटेच पुण्याच्या दिशेने निघाले. एसटीमध्ये बसले, तर गावातले अनेक जण लेकराबाळांसकट गाव सोडून पुण्याला निघालेले. त्यांच्यासोबत लहान मूलं होती, किशोरवयीन मूलंही होती. त्यांच्या शाळेचे काय? विचारल्यावर गावकरी म्हणत होते, “काय करणार ती शिकून. जगू वाचू हेच मोठं,” असे त्यांचे उत्तर. अशोक यांच्या मनावर आघात करून गेले. त्यातूनच पुढे दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करण्याचे अशोक यांनी ठरवले.

पुण्यात त्यांना फ्लॅट घ्यायचा होता. पण, आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च करायचा म्हणून त्यांनी दोन छोट्या खोल्या घेतल्या. तिथे सुरुवातील १८ मूलं होती. आई-बाबा म्हणाले की, “आता कुठे आपली परिस्थिती सुधारली, तू हे काय करतोस.” पण, अशोक यांनी त्यांनाही समजावले. पुढे मुलांची संख्या वाढतच गेली. या मुलांकडे पूर्णवेळ लक्ष देणे गरजेचे होते. त्यामुळे अशोक यांनी चक्क नोकरी सोडली. आता समाजाची सज्जनशक्ती त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी राहिली. पुढे विवाह करतानाही त्यांनी नियोजित वधूला सांगितले की, ही सगळी आपली मूलं आहेत, हे समजूनच माझ्यासोबत संसार करावा लागेल. तिने होकार दिला आणि अशोक यांचा संसार सुरू झाला. अशोक म्हणतात, “शिक्षणाच्या आणि उत्तम भवितव्याच्या संधीपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी मी आजन्म काम करणार आहे.” अशोक यांच्यासारखे लोक समाजाचे दिशादर्शक असतात, हे नक्की. अशोक देशमाने म्हणजे आळंदीतले सेवादूतच!

९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121