डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आणि के डीएमसी क्षेत्रातील एक गाव असलेल्या भोपर मध्ये मूलभूत सुविधांची कमतरता आहे. आधीच पिण्याचे पाणी, कचऱ्यांची बोंब याठिकाणी असताना गेल्या अनेक महिन्यापासून याठिकाणी सुरू असलेल्या जेएनपीटी रेल्वेमार्गाचे सुरू असलेले काम येथील रस्ते मार्गाच्या मूळावरती आले आहे. त्यामुळे भविष्यात अपघाताची घटना येथे घडू शकते. स्थानिक आमदारांनी भेटी दिल्याचे ग्रामस्थ सांगत असले तरी ही या परिस्थिती कोणताही फरक पडला नसल्याचे दिसते.
शहर असो अथवा गाव याठिकाणी पाणी, रस्ते, शाळा, कचरा संकलन आदी कामे करून आधी सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुरविली जातात. पण भोपर गावांचा आजवरचा प्रवास ग्रामपंचायत ते केडीएमसी असा राहिला असताना ही या मूलभूत सुविधांची बोंब येथे प्रकर्षाने जाणवते. याठिकाणी जेएनपीटी रेल्वे मार्गाचे काम गेल्या पाच महिन्यापासून सुरू आहे. या कामांमुळे जेसीबी, मोठमोठे डंपर गावातून ये-जा करतात. यात गावांचे रस्ते खराब झाले आहेत. कुठे चिखलाची वाट तर कुठे खोदकामामुळे खदाणी निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्य़ात साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कामामुळे गावातील सुसज्ज अशा मैदानाची नासधुस झाली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच परिसरात नाला असून त्याची योग्य प्रकारे बांधणी झाली नाही. या नाल्यावरचा रस्ता देखील सुस्थितीत नसल्याने हा संपूर्ण परिसर पावसाळ्य़ात पाण्याखाली जाण्याची भिती स्थानिक व्यक्त करतात. गावात डांबरीकरणाबरोबरच सिमेंटक्रॉकीटीकरणाची रस्त्याची कामे झाली आहेत. यामुळे प्रवास सुखकर झाला असला तरी कामांचा दर्जा चांगल्या प्रकारे ठेवला नसल्याचे दिसते. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पावसाळ्य़ात गावांमध्ये ठिकठिकाणी जलमय परिस्थिती होण्याची शक्यता असताना दुसरीक डे घरात मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या कायम सतावत आहे. एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने बऱ्याच वेळेला आम्हाला टॅकरचे पाणी प्यायला लागत आहे. काही वेळेला टॅकरचे पाणी दूषित असल्याने आजाराचा देखील सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची समस्या सातत्याने भेडसावत असताना अमृत योजनेंतर्गत जलकुंभ बांधण्यात आले परंतु हे काम रखडल्याने पाण्याचा ठणठणाट आज ही कायम राहिला आहे. पाण्याची समस्या असताना ज्याठिकाणावरून पाणी सोडले जाते तेथील व्हॉल्वह ही नादुरूस्त झाले आहेत. त्यातून मोठय़ा प्रमाणावर पाणी बाहेर पडून नासाडी होत आहे.
कचरा संकलन आणि वाहतूक यासाठी महापालिकेने चेन्नई पॅटर्न राबवायला सुरूवात केली आहे. पण घनकचऱ्यांच्याघंटागाडय़ा नियमितपणे याठिकाणी येत नाही . त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्यांचे डोंगर येथे दिसून येतात. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने रोगराई पसण्याची शक्यता आहे. कचरा संकलनासाठी गाड्या येत नसल्याने नागरिक कचरा रस्त्यावर फेकत आहेत. हा कचरा नाल्यात जात असल्याने नालेकचऱ्याने तुंडुब भरले आहे. त्यामुळे पावसाळ्य़ात प्रवाह अडून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिका हद्दीत आम्ही आहोत मात्र शाळा अजून ही जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत असे ग्रामस्थांनी सांगितले.