दादर-माहीमच्या जनतेचा कौल मान्य : अमित ठाकरे

    24-Nov-2024
Total Views |

Amit Thacheray

मुंबई : दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ( Amit Thacheray ) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो,” असे अमित यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये अमित ठाकरे म्हणतात, “अगदीच मूलभूत गरजांसाठी या प्रभागातील लोकांचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष पाहिला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचे आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझे कर्तृत्व सिद्ध करायचे आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचे आहे.”

आजचा कौल माझ्या
प्रवासाचा शेवट नाही!

माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती. कारण, ही लढाई कोणा राजपुत्राची नसून ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची- जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य आणायचे होते. आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहीम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी मी 24 तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे.
ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केले, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. मी वचन देतो की, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. कारण, माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू! आपलाच, अमित ठाकरे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.