दिवाळी या सणादरम्यान साजरा केला जाणारा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवसाला छोटी दिवाळी सुद्धा म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. असे म्हटले जाते की, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याच्या तावडीतून १६ हजार स्त्रियांना मुक्त केले होते. म्हणून हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून ओळखला जातो. या दिवशी १४ दिवे लावणे शुभ मानले जाते. या दिवशी १४ दिवे प्रज्वलित केल्याने सर्व प्रकारच्या बंधनातून, भय तसेच दारिद्र्यातून मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते.
“नरकचतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध झाला होता म्हणून आपल्यातील आणि आपल्या आजूबाजूच्या नरकारसुररूपी वाईट वृत्तींचा नाश व्हावा, त्या दूर व्हाव्यात म्हणून अभ्यंगस्नान केले जाते. कोकणात काही ठिकाणी ‘कारेट’ नावाचं एक फळ असतं, ते पायाच्या अंगठ्याने फोडलं जातं. अशा प्रकारे नकारात्मक शक्तींचा नाश होऊन सकारात्मक शक्ती आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी आपण नरक चतुर्दर्शी हा दिवस साजरा करतो. नरकासुराचा वध कृष्ण अवतारातील भगवान विष्णूंनी केला होता म्हणून या दिवशी भगवान विष्णूंचे स्मरण आणि पूजन केले जाते.” अशी माहिती ज्योतिषशास्त्रज्ञ वल्लभ डोईफोडे यांनी दिली.