महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन; भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला विजयाचा कानमंत्र
02-Oct-2024
Total Views |
मुंबई : (Amit shah)"महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा बदलणारी ठरणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवा, विजय आपलाच होईल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही आणि इथले प्रश्न सोडवण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत", असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवार, दि. १ ऑक्टोबर रोजी केले.
अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील योगी सभागृहात भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश जी, व्ही. सतीश, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख रावसाहेब दानवे, राज्यातील भाजपचे सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले, कार्यकर्ते ही आमची ताकद आणि जनसेवा हा आमचा ध्यास आहे. भाजप कार्यकर्ता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचणारा आहे. भाजप राज्य करण्यासाठी सत्तेत, नाही तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर गेल्या १० वर्षांत दहशतवाद आणि नक्षलवाद गाडला गेला. मोदीजींच्या नेतृत्त्वामुळे जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तीन वेळा सरकार बनविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, असेही त्यांनी सांगितले.
महायुतीची सत्ता येणार, ही काळ्या दगडावरची रेघ!
येत्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत १० टक्के मतदान वाढवा, सरकार आपले आहे. बूथनिहाय १० कार्यकर्ते कामाला लावा. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील. महाराष्ट्रात ६ लोकसभा मतदारसंघ असे आहेत, जेथील ५ विधानसभा क्षेत्रात भाजप-महायुतीला बहुमत होते. परंतु, केवळ एका ठिकाणी मोठे बहुमत घेऊन विरोधक जिंकले. याचा अर्थ आपण पाच विधानसभा मतदारसंघात जिंकू, तर ते केवळ एका ठिकाणी विजयी होतील. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.