दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मानवी गरजा आणि दररोज लागणारे नवनवीन शोध यामुळे परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. यामुळेच काही कारणांनी गिधाडांच्या संख्येतही मोठी घट झाली. गिधाडांचे परिसंस्थेतील महत्त्व आणि त्यांचा अधिवास टिकवून ठेवण्यासाठीची गरज याचा आढावा घेणारा हा लेख, नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिनानिमित्त...
जैवविविधतेच्या हानीमुळे परिसंस्थेवर आणि मानवी समाजावर गंभीर आणि दूरगामी परिणाम होत आहेत, याची प्रचिती आपल्याला गेल्या काही वर्षांत आली आहेच. शनिवार, दि. 2 सप्टेंबर रोजी झालेल्या गिधाड संवर्धन दिनानिमित्त आपण त्यांच्यावर केल्या गेलेल्या एका महत्त्वाच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. इयल फ्रँक आणि अनंत सुदर्शन यांच्या फेब्रुवारीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन लेखाने भारतातील गिधाडांच्या संख्येतील झालेली तीव्र घसरणीचा, पर्यावरण आणि मानवाच्या सामाजिक-आर्थिक घटकांवर काय परिणाम होत आहे, या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे. हा शोधनिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो पर्यावरण व मानवातील अज्ञात संबंधांवर चर्चा करतो.
1990च्या दशकात अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत, भारतातील गिधाडांची संख्या 50 दशलक्षवरून तब्बल 95 टक्के कमी झाली. नोंदवलेल्या इतिहासात पक्षांच्या प्रजातींच्या लोकसंख्येतील ही सर्वांत जलद घट आहे आणि युनायटेड स्टेट्समधील प्रवासी कबुतर नामशेष होण्याच्या घटनेनंतरची ही सर्वांत मोठी घटना आहे. संशोधकांच्या मते, भारतातील गिधाडांची स्थिरसंख्या असणार्या जिल्ह्यांमध्ये, गिधाडांच्या विनाशानंतर मानवी मृत्यूचे प्रमाण किमान चार टक्क्यांने वाढले. पण का? ते पाहूया.
निसर्गातील यथेच्छ मानवी हस्तक्षेपामुळे अनेक प्रजाती दुर्मीळ होणं किंवा नामशेष होणे हे सुरू आहेच.त्याचे एकूणच परिसंस्थेवरील परिणाम समजून घेऊन त्यावर कृती करणे फार महत्त्वाचे आहे. गिधाडांची लोकसंख्या कमी होण्याला आपण थेट जबाबदार आहोत का? तर नाही! जस आपण ग्रेट इंडियन बस्टर्ड (माळढोक) खाऊन त्यांची लोकसंख्या अक्षरशः नष्ट केली, तसे इथे घडलेले नाही. दुर्दैवाने, यावेळी संपूर्ण माहिती नसल्यामुळे झालेला हा अपघात आहे. मानवी उत्पादने आणि क्रियाकलापांचा पर्यावरणातील अन्नसाखळीवर काय परिणाम होतो, हे आपल्याला अजूनही समजत नाही, हेच खरं. आपण सगळेच वेदना कमी करायला ‘डायक्लोफेनॅक’ नावाचे औषध घेतो. हेच ‘डायक्लोफेनॅक’, पशुवैद्यकीय औषध म्हणून वापरल्यामुळे भारतातील गिधाडांची संख्या कमी झाली आहे.
इकोसिस्टममध्ये गिधाडांची भूमिका
सामान्यतः आपल्याला, रक्त आणि मांस खाणार्या, वरून अति-सुंदर वगैरे न दिसणार्या गिधाडांबद्दल काही भावनिक सहानुभूती वाटत नाही. पण, गिधाड हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जीव आहे. गिधाड, ही पर्यावरणातील ‘कीस्टोन (Keystone) प्रजाती’ आहे. कीस्टोन, ही निसर्गाचा समतोल राखणारी प्रजाती असते. म्हणून, जेव्हा कीस्टोन प्रजाती नष्ट होते, तेव्हा परिसंस्थेवर आणि त्यावर अवलंबून असलेल्या समाजावर होणारे परिणाम नेहमीच भयंकर असतात. नैसर्गिक सफाई यंत्रणा म्हणून, गिधाडे पोषणद्रव्याच्या चक्राला चालना देतात आणि रोगांचा प्रसार रोखण्यात मूलभूत भूमिका बजावतात. 550 दशलक्षाहून अधिक पशुधन असलेल्या भारतासारख्या देशात आणि मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्यासाठी पायाभूत सुविधा नसताना, पशुपालक शेतकरी अनादीकाळापासून पर्याय म्हणून गिधाडांवर अवलंबून आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत, मृत प्राण्यांचे शव उघड्यावर पडून राहते किंवा पशुपालकांना ते पाण्यात टाकावे लागते.या दोन्हीमुळे रोग आणि जलप्रदूषणाचा धोका वाढतो. केवळ मृत शरीर आहार म्हणून खाऊन, गिधाडे शव उघड्यावर जास्त वेळ टिकू देत नाहीत आणि जलद गतीने त्याची विल्हेवाट लावतात. याच प्रक्रियेने ते मातीमध्ये पोषक तत्वे पोहोचवतात. या आहार पद्धतीमुळे, जंगली कुत्रे किंवा उंदीर यांसारख्या इतर कुजणार्या मांसावर उपजीविका असणार्या प्राण्याची लोकसंख्या नियंत्रणात राहते.

गिधाडांची संख्या कमी का झाली?
‘डायक्लोफेनॅक’ या औषधामुळे गिधाडे मेली. पण कशी? ‘डायक्लोफेनॅक’च्या स्वस्त जेनेरिक आवृत्त्या उपलब्ध झाल्यानंतर गिधाडांना अनपेक्षित आणि अपघाती विषबाधा झाल्यामुळे भारतातील गिधाडांची संख्या कमी झाली. ‘डायक्लोफेनॅक’ हे 1973 मध्ये मानवासाठी वेदनाशामक औषध म्हणून वापरात आणले गेले. परंतु, 1993 मध्ये जेनेरिक आवृत्तीला मान्यता मिळाल्यासह, भारतातील फार्मास्युटिकल उद्योगांने मोठ्या प्रमाणात हे औषध तयार करण्यास सुरुवात केली. यामुळे किंमत कमी झाली आणि ‘डायक्लोफेनॅक’चा वापर पशुधनामध्ये आर्थिकदृष्ट्या फायदेशीर झाला आणि 1994 पासून, ‘डायक्लोफेनॅक’ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले. हे समजून घेणे आवश्यक आहे की, ‘डायक्लोफेनॅक’ हे नेहमीच मानवामध्ये आणि जवळजवळ सर्व प्राण्यांमध्ये अतिशय सुरक्षित औषध असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुरांमध्ये ‘डायक्लोफेनॅक’चा वापर नैतिक किंवा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा नाही आणि म्हणूनच गुरेढोरे किंवा इतर पशुधनांमध्येही वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते.पण प्राणी मेला की ‘डायक्लोफेनॅक’चे काय होते याचा अभ्यास आपण तितका कधीच केला नाही. आता जेव्हा जिप्स (Gyps) वंशातील गिधाडे एखाद्या पशुचे शव खातात ज्याच्या प्रणालीमध्ये ‘डायक्लोफेनॅक’ असते, तेव्हा दुर्दैवाने किडनी निकामी होऊन काही आठवड्यांत त्यांचा मृत्यू होतो. 2004 मध्ये ओक्स(Oaks) यांनी लिहिलेल्या संशोधन लेखापर्यंत ही वस्तुस्थिती अज्ञात होती. गिधाडांवर ‘डायक्लोफेनॅक’चा थेट परिणाम मानवाला पहिल्यांदाच तेव्हा समजला. 1994 मध्ये ‘डायक्लोफेनॅक’चा पशुवैद्यकीय वापर सुरू झाल्यानंतर, मृत गिधाडांच्या बातम्यांमध्ये वाढ झाली. पण ही घटना समोर आणणारा पहिला पुरावा 1996मध्ये मिळाला जेव्हा एका फील्ड इकोलॉजिस्टने याबद्दलचा अहवाल समोर आणला. आज, IUCN रेड लिस्टमध्ये आपल्या तीन गिधाडांच्या प्रजाती गंभीरपणे धोक्यात (Critically Endangered) नोंदवल्या आहेत. सुमारे 2010पासून, भारत, नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये ‘डायक्लोफेनॅक’वर बंदी घालण्यात आली. परंतु, या देशांमध्ये ‘डायक्लोफेनॅक’चा वापर अजूनही चिंतेचा विषय आहे. समाजामध्ये याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.
गिधाडांचा मृत्यू चिंतेचे कारण का होत आहे?
1990पासून भारतातील गिधाडांची लोकसंख्या कमी झाल्यामुळे, ते पुरवत होते ती सेवा नाहीशी झाली. ज्यामुळे प्राण्याचे शव दीर्घकाळ उघड्यावर राहू लागले. यामुळे, त्या भागात मोकाट कुत्रे आणि उंदरांची संख्या वाढली. कारण त्यांना अन्न सहज उपलब्ध झाले. वाढलेल्या कुत्र्यांच्या आणि उंदरांच्या संख्येमुळे, ‘रेबीज’सारख्या अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढला. भारतातील गिधाडे नाहीसे होणे आपल्याला किती महागात पडले आहे याचे विश्लेषण करण्यासाठी 2023च्या एका अभ्यासात लेखकांनी ‘डायक्लोफेनॅक’च्या पशुवैद्यकीय वापरापूर्वी आणि वापरानंतर अशी, गिधाडांसाठी निवासस्थाने असलेल्या जिल्ह्यांची तुलना केली. त्यात असे आढळून आले की, ज्या जिल्ह्यांमध्ये गिधाडे गायब झाली तेथे अभ्यास कालावधीत मानवी मृत्यूचे प्रमाण 4.2-4.8 टक्के इतके वाढले. अभ्यासात पुढे असा अंदाज वर्तवला आहे की, अभ्यासासाठी वापरल्या गेलेल्या 430 दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत अभ्यास कालावधीत तब्बल 1,04,386 लोकांचा मृत्यू अप्रत्यक्षपणे का होईना, पण गिधाडे गायब झाल्याने झाला असू शकतो. तसेच, आर्थिकदृष्ट्या अभ्यासानुसार, या अतिरिक्त मृत्यूंमुळे, भारताला दरवर्षी अंदाजे 69.4 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आधीच्याकाळी गिधाडे जी मृत शरीरे खाऊन टाकत असत, ती नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या पर्यायी उपायांची गणना करून आणि एकूण वैद्यकीय आणि पर्यावरणीय स्वच्छता खर्चाची बेरीज करून या खर्चाचा अंदाज लावला जाऊ शकतो. तथापि, ही गणना अजूनही इन्सिनरेटर चालवण्यापासून उद्भवणारे वायू प्रदूषण किंवा मृतदेह हलविण्यासाठीचे वाहतूक शुल्क मोजत नाहीये.
या अनुभवातून आपण काय शिकले पाहिजे?
हा अभ्यास, जैवविविधता आणि मानवी आरोग्य यांच्यातील परस्परसंबंध समजवतो आणि गिधाड संवर्धन का अत्यंत महत्त्वाचे आहे ते सांगतो. परंतु, आपण हे समजून घेतले पाहिजे की, गिधाडांच्या मृत्यूचे प्रकरण प्रत्यक्षात दिसते त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीचे आहे. गिधाडांची संख्या कमी करण्यासाठी ‘डायक्लोफेनॅक’चा वापर हा महत्त्वाचा घटक आहे. पण, पशुवैद्यकीय क्षेत्रात याला आधी पर्यायी औषध मिळणे आवश्यक आहे. ‘डायक्लोफेनॅक’ वेदानाशामक म्हणून वापरले जात. पण या घटनेमुळे पशुधनाला वेदना होऊ द्याव्यात आणि गरज असतानाही वेदनाशामक औषधे दिली जाऊ नयेत, अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. इतर प्रमुख वेदनाशामक औषधे पशुधनासाठी ‘डायक्लोफेनॅक’इतकी निर्धोक नाहीत आणि त्यांचे दुष्परिणाम नोंदले गेले आहेत. त्यामुळे या पशुधनाची काळजी घेणार्यांसाठीदेखील फारसा पर्याय नाहीये.
‘डायक्लोफेनॅक’च्या पर्यायी म्हणून वापरला जाऊ शकणारे सर्वांत आशाजनक औषध म्हणजे ‘मेलोक्सिकॅम’. ‘मेलोक्सिकॅम’ हे गिधाडांसाठी लक्षणीयरित्या कमी हानिकारक आहे आणि म्हणूनच पशुधनातील वेदना व्यवस्थापनासाठी सुरक्षितपणे वापरले जाऊ शकते. पण, ‘मेलोक्सिकॅम’ हे ‘डायक्लोफेनॅक’च्या तुलनेत बरंच महाग आहे आणि त्यामुळे या विषयात सरकारी पातळीवर आणि धोरणात्मक हस्तक्षेपाची गरज आहे. जेणेकरून, शेतकरी आणि पशुपालकांना ‘डायक्लोफेनॅक’चा एक फायदेशीर आणि योग्य पर्याय मिळेल.
गिधाडांच्या लोकसंख्येचे अनावधानाने झालेल पतन, वन्यजीवांच्या प्रजाती किती लवकर नष्ट होऊ शकतात याचे एक उदाहरण आहे. पण मग, नष्ट झालेल्या जीवांची परिसंस्थेतील भूमिका इतर प्रजातींद्वारे निभावली जाऊ शकत नाही हे आपल्याला समजले पाहिजे. निसर्गाच्या आणि आपल्या क्लिष्ट परस्परसंबंधांबद्दल जाणून घेण्यासाठी देखील अनेक वर्षे लागू शकतात आणि हे पर्यावरणीय असंतुलन नेहमीच मानवासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतो.
आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिनाच्या पार्श्वभूमीवर, आज देशातील गिधाडांच्या स्थितीचे आणि या गुंतागुंतीच्या परिस्थितीचा आपण आढावा घेतला. गिधाडांच्या रक्ताने भिजलेल्या चोचींच्या प्रतिमा सामान्य लोकांमध्ये त्यांच्याबद्दल कमी सहानुभूती निर्माण करू शकतात. परंतु, या अभ्यासाने त्यांच्या अस्तित्वाची चिंता प्रत्येकाने करण्याचे कारण निश्चितच दिले आहे. निसर्गाच्या एका विलक्षण प्रजातीला वाचवण्यासाठी आपल्या प्रयत्नांना उशीर झालेला नसावा, हिच आशा!