
मुंबई : मराठी भाषा सातासमुद्रापार पोचवण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सध्या मराठी भाषा १७ देशांपर्यंत पोचली असून, येत्या वर्षभरात ७४ देशांमध्ये बृहन्मराठी मंडळांची स्थापना करून मराठीचा प्रसार करण्याचा संकल्प मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत व्यक्त केला. यासोबतच देशातील सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य संग्रहालय उभारण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
सामंत म्हणाले, “आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जात होते. आता दरवर्षी मराठी विश्व संमेलन घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याशिवाय बाल, महिला आणि तरुणांसाठी स्वतंत्र मराठी भाषा संमेलने आयोजित केली जातील. मराठी भाषेचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. राज्यात इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत मराठी भाषा सक्तीची आहे. हिंदीची सक्ती कधीही करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यांनी तेव्हा हिंदी सक्तीला मान्यता दिली, तेच आता त्याच्या विरोधात बोलत आहेत. हिंदी सक्तीचा कोणताही शासकीय निर्णय नाही. ‘हिंदी सक्ती’ हे खोटे कथानक राज्यात पसरवले जात आहे”, असा हल्लाबोल त्यांनी केला.