नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) चक्रव्युहात अडकले असून मला त्यांची कीव येते, असा टोला राष्ट्रीय लोक जनता दल पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी लगाविला आहे.
बिहारच्या राजकारणता सध्या नितीश कुमार यांच्यावर चौफेर टिकेचा भडिमार होत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामध्ये नितीश यांच्या जुन्या सहकाऱ्यांचा समावेश असून नितीश यांची साथ सोडून राष्ट्रीय लोक जनता दल हा नवा पक्ष स्थापन करणारे माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर टिका केली आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपेंद्र कुशवाह म्हणाले की, नितीश कुमार यांचा पक्ष जदयु संपला आहे. आम्ही एकत्र होतो तेव्हा १२० ते ११८ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, नितीश यांना आता केवळ ४३ जागांवर विजय मिळाला आहे. नितीश कुमार यांना २००५ पूर्वीची स्थिती बिहारमध्ये पुन्हा आणायची आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. ते आता राजदच्या चक्रव्युहात अडकले असून त्यांची आता कीव येते, असा टोला कुशवाह यांनी यावेळी लगाविला.
कुशवाह म्हणाले की, नितीश कुमार आता आपला पक्ष वाचवण्यासाठी लालू यादव यांच्यासोबत गेले आहेत. लालू यादव यांनी आपल्याशी मैत्री केल्याचा गैरसमज नितीश यांना आहे. मात्र, प्रत्यक्षात लालू यादव यांना आपला मुलगा तेजस्वी यास मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्यामुळे राजदकडे सत्ता सोपविण्याची तयारी असलेल्या नितीश कुमार यांना कुर्मी समाजातील एकही मतदार मतदान करणार नाही, असेही कुशवाह यावेळी म्हणाले.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!
https://bit.ly/3RpZbSq