लोअर परळ स्थित डिलाईल पुलाच्या पूर्व दिशेची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

करीरोड, लोअर परळ तसेच दक्षिण मुंबईच्या दिशेने वाहतूक होणार सुलभ

    18-Sep-2023
Total Views |

lower parel bridge


मुंबई :
लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पुलाच्या पूर्व दिशेची एक मार्गिका दिनांक १७ सप्टेंबर पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नारळ वाढवून तसेच गणेशमूर्ती आगमन मिरवणूक मार्गस्थ करून ही मार्गिका खुली करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्‍या ‘जी/दक्षिण’ विभागात लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळ, ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर डिलाईल रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलावर ना. म. जोशी मार्गावरुन येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा १ असे तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. पैकी, पश्चिम दिशेची मार्गिका याआधीच दिनांक १ जून रोजी खुली करण्यात आली होती. असे असले तरी, ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ आणि करी रोड स्थानकांना जोडणारा पूर्व दिशेला स्थित मार्ग हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
या मार्गावरील दोन्ही बाजुपैकी किमान एक मार्गिका श्री गणेशोत्सवपूर्वी सुरू करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत होते. त्या नियोजनात यश आले आहे. मुंबईकर नागरिकांची वाहतुकीची सोय व्हावी, या उद्देशाने डिलाईल पुलाची पूर्व बाजूस असलेली एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला आहे.

मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. १ जून रोजी पश्चिम दिशेची मार्गिका उपलब्ध करून दिली होती तर आता पूर्व बाजूची एक मार्गिका खुली झाल्याने वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. दुसर्‍या मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत या एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू राहणार आहे, असे श्री. केसरकर यांनी नमूद केले.
स्थानिक गणेशोत्सव मंडळांनी या पुलावरून श्री गणेश मूर्ती आगमन मिरवणूक देखील नेली आहे. सर्व राजकीय पक्षांनी सामंजस्याने भूमिका घेऊन मुंबईतील नागरिकांना सदर पूल वापराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे केसरकर यावेळी म्हणाले. आमदार सुनील शिंदे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून हा पूल खुला व्हावा म्हणून पाठपुरावा करण्यात येत होता. आज सुरू झालेल्या मार्गिकेमुळे लोअर परळ, करी रोड या भागातील नागरिकांसोबतच दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुविधा होईल.
विशेषतः श्री गणेश उत्सवामध्ये भाविकांची आणि वाहनांची वाढती संख्या पाहता ही मार्गिका खुली होणे महत्त्वाचे होते. पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक पोलीस आणि नागरिक यांच्या समन्वयातून व सामंजस्यातून ही मार्गिका खुली झाली, प्रयत्नांना यश आले.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.