गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक वाद्यांचा गजर

    16-Sep-2023
Total Views |


tabla


मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  मुंबईसह परिसरातील बाजारपेठा गजबजू लागल्या. या उत्सवानिमित्त पारंपरिक वाद्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. लालबाग तसेच अन्य ठिकाणी या वाद्यांची मागणी आणि दुरूस्तीला वेग आला. त्यामुळे बाजारपेठेत उत्साह संचारला आहे.
 
गणेशोत्सव म्हटला की, मुंबईसह कोकणात उत्साहाला उधाण आलेले असते. त्यानिमित्त बाजारपेठांमध्येही उत्साह वाढला असून बाप्पाचा आरास तसेच पुजा अर्चा यासाठी लागणार्‍या वस्तूंची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवात गणरायाची आराधना करताना भजन, आरती आदींसाठी पारंपरिक वाद्यांची गरज असते. त्यात टाळ, ढोल, ताशा, झांज आदिंचा प्रामुख्याने समावेश आहे.
 
हे सर्वप्रकारचे साहित्य वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाणी म्हणजे लालबागची बाजारपेठ. येथे सजावटीचे साहित्य, पूजेचे सामान, फुलांचे हार आणि आरास आदीं सामान स्वस्तात मिळत असल्यामुळे गणेशभक्तांची रीघ या बाजारपेठेत दिसून येत आहे. त्याचबरोबर पखवाज, ढोलकी, ढोलक ही वाद्येही वापरली जातात. त्यामुळे या पारंपरिक चर्मवाद्यांची दुकानेसुद्धा लालबागमध्ये विक्री आणि दुरुस्तीसाठी सज्ज आहेत.
 
लालबागमधील नरसय्या गंगाराम हे व्यक्तीमत्व वाद्य क्षेत्रातील नावाजलेले असून तब्बल 7 दशकांपासून ते या व्यवसायात आहेत. त्यांची ही दुसरी पिढी या क्षेत्रात सक्रिय असून त्यांचा चर्मवाद्य बनवण्याचा स्वत:चा कारखाना आहे. तेथे पखवाज, ढोलकी, ढोलक, तबला-डग्गा इत्यादि वाद्ये तयार केली जातात. हे काम जवळपास वर्षभर सुरूच असते.
 
चर्मवाद्य बनवण्यासाठी ते दिल्लीहून अमरोहा सिसम झाडाचे लाकुड मागवतात. झाडाच्या खोडाचे हे लाकूड आतून पोखरून पहिला सांधा तयार केला जातो. यानंतर चामड्याच्या पट्ट्यांनी वाद्यांची बांधणी होते. शेवटी तासणीने गोलाकार आकार देऊन वाद्य विक्रीसाठी तयार केले जाते. ढोलकी किंवा पखवाज बनवण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागतो असे त्यांनी सांगितले. अन्य ठिकाणीही किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांकडे विविध प्रकारची वाद्ये खरेदी आणि दुसुरस्तीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत.

"गणेशोत्सवात आमच्याकडे प्रामुख्याने ढोलक, ढोलकी, पखवाज या वाद्यांना जास्त मागणी असते. जूनपासून सप्टेंबरपर्यंत आमचा व्यवसायाचा काळ असतो. त्याची आम्हाला वर्षभर तयारी करावी लागते."
- नरसय्या गंगाराम, तबल्यांचे व्यापारी

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.