मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी 'वर्ल्ड मॅरो डोनर डे' साजरा केला जातो. या निमित्ताने डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडियाने, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये स्टेम सेल डोनेशनबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविला होता. यावेळी डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडियाचे सीईओ पॅट्रिक पॉल, कोकिलाबेन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. संतोष शेट्टी, पीडियाट्रिक हेमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी व स्टेम सेल प्रत्यारोपण विभागाचे सल्लागार डॉ. शंतनु सेन उपस्थित होते. डीकेएमएस-बीएमएसटी यांच्यातर्फे समर्थ, प्रांजल व शशांक या तिघांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी अलीकडेच त्यांच्या रक्तातील मूल पेशी रुग्णांना दान केल्या आहेत. ते रुग्ण ही यावेळी उपस्थित होते.
आतापर्यंत ४ कोटी १० लाखांहून अधिक दात्यांची जगभरातील स्टेम सेल डोनर सेंटर व रजिस्ट्रींमध्ये नोंदणी झालेली आहे. त्यापैकी फक्त ०.०४% भारतीय दाते आहेत. भारतात अधिकाधिक संभाव्य ब्लड मूल पेशी डोनरची नोंदणी करून ही परिस्थिती बदलण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना सीईओ पॅट्रिक पॉल म्हणाले, "वर्ल्ड मॅरो डोनर असोसिएशनच्या आकडेवारीनुसार जगभरात ४१ मिलियन दात्यांनी नोंदणी केलेली आहे. भारतीय रुग्णांसाठी मॅचिंग रक्त मूळ पेशी दाता मिळणे ही अजूनही एक मोठी समस्या आहे. यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने एक पाऊल पुढे टाकुन डोनर मूल पेशी रजिस्ट्रीमध्ये आपल्या नावाची नोंदणी केली पाहिजे. यामुळे एक जीव वाचेल. आतापर्यंत डीकेएमएस-बीएमएसटीच्या महाराष्ट्रातील डोनर मूल पेशी रजिस्ट्रीमध्ये १३,००० हून अधिक व्यक्तींनी नोंदणी केलेली आहे आणि भारतभरात ९०,००० व्यक्तींची नोंदणी झालेली आहे. या व्यतिरिक्त गेल्या चार वर्षांत या संस्थेतर्फे देशभरातील १०० हून अधिक ब्लड स्टेम सेल प्रत्यारोपणांसाठी मदत करण्यात आलेली आहे. शक्य तेवढ्या रुग्णांना नवसंजीवनी मिळावी यासाठी भारतात व जगभरात अधिकाधिक नोंदणी करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे." असं पॅट्रिक पॉल यावेळी म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.