राजस्थान: येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राजस्थान विधानसभेसाठी भाजपने २ सप्टेंबरपासून परिवर्तन संकल्प यात्रेला सुरुवात केली आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी गेहलोत सरकारवर जहरी टीका केली. तर, लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठीच ही परिवर्तन यात्रा असल्याचे फडणवीस म्हणाले.
गेहलोत सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले, "राजस्थान भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर, गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेहलोत सरकार राजस्थानला देशात एक नंबरवर घेऊन गेला आहे. पण, चांगल्या कामात नाही तर भ्रष्टाचार, गँगवॉर, पेपर लीक यामध्ये इथल्या सरकारने राजस्थानला एक नंबरवर ठेवलं आहे. माणसाच्या जीवनात अनेक बदल घडत असतील तर ते घडवून आणण्याची क्षमता या देशात फक्त एकाच व्यक्तीमध्ये आहे. मोदींनी ज्या प्रकारे देश बदलला आहे. गरिबांचे जीवन बदलले आहे. देशातील चौदा कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम मोदींनी केले आहे. देशात रस्ते बांधले जात आहेत, देशात रेल्वे बांधली गेली आणि अर्थव्यवस्था उभी राहिली."
"आज मोदी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे काम करत आहेत.चांद्रयान उतरवण्याचे कामही आमच्या मोदींनी केले आहे.मोदींनी पूर्ण ताकदीनिशी आधुनिक भारत दाखवला. भारतीय जनता पक्षाने राजस्थानात सरकार बनवलं तर, राजस्थानचा विकास कोणीही थांबवु शकत नाही." असं फडणवीस यावेळी म्हणाले.