पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात भाजपाचा सेवा पंधरवडा

शहरातील विविध भागात कार्यक्रम

    13-Sep-2023
Total Views |


narendra modi


ठाणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे शहर भाजपाच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने शहरातील विविध भागात नागरिकांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली.

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावरील चित्र प्रदर्शनाने सेवा पंधरवड्याला सुरुवात होईल. टाऊन हॉलमध्ये होणाऱ्या प्रदर्शनावेळी आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्याचबरोबर गावदेवी मैदानानजीक कांती विसारिया हॉलमध्ये महिला सेल्फ डिफेन्स शिबीर होईल. सेवा पंधरवड्याच्या संयोजकपदी सरचिटणीस मनोहर सुगदरे, महिला संयोजकपदी वैद्यकीय आघाडीच्या डॉ. अपर्णा ताजणे, युवा सहसंयोजकपदी युवा मोर्चाचे नौपाडा अध्यक्ष प्रशांत कळंबटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 
या पंधरवड्यात मनोरमानगर येथे रक्तदान शिबिर, घोलाईनगर, लोकमान्यनगर आणि इंदिरानगर येथे आरोग्य शिबीर, महागिरी कोळीवाड्यात घरेलु कामगार शिबीर, सिव्हील हॉस्पिटलमध्ये फळवाटप, तृतीयपंथीय बांधवांबरोबर स्नेहभोजन, दिव्यांगांना साहित्यवाटप, पाचपाखाडीत असंघटित कामगारांसाठी नोंदणी शिबीर घेतले जाणार आहे.

 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने २५ सप्टेंबर रोजी मंडल व शक्तीकेंद्र प्रमुख स्तर आणि माजी नगरसेवक-नगरसेविकांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रतिमा पूजन व चित्रफित प्रदर्शन करण्यात येणार आहे. सेवा सप्ताहाच्या काळात बूथ सशक्त अभियान, बूथ निहाय सरल ॲप, सरल व नमो ॲपची नोंदणी, २४ सप्टेंबर रोजी मंडलनिहाय `मन की बात' व टिफीन बैठक, ३० सप्टेंबर रोजी वस्ती संपर्क अभियान, शहरातील सर्व गणेश विसर्जन घाटांवर स्वच्छता मोहीम, शिधापत्रिका नोंदणी व दुरुस्ती शिबीर, ब्रह्रांड येथे १ ऑक्टोबर व मंगला हायस्कूल येथे २ ऑक्टोबर सेल्फ डिफेन्स शिबीर भरविण्यात येणार आहे.


'मेरी माटी मेरा देश' उपक्रमात सेल्फी!
'मेरी माटी मेरा देश' उपक्रमांतर्गत गणेशोत्सवात ठिकठिकाणी कलश ठेवण्यात येणार आहेत. या कलशाबरोबर नागरिकांना सेल्फी काढता येईल. त्याचबरोबर पंचप्राण शपथ घेता येईल. या पंधरवड्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांसाठी मतदारनोंदणी व नागरिकांसाठी आरोग्यावरील आभा कार्डची नोंदणीही केली जात आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.