मोदी हैं तो मुमकीन हैं!

    13-Sep-2023   
Total Views |
PM Modi Mets Canadian counterpart Justin Trudeau On G20 Summit

'जी २०’ परिषदेत उपस्थित प्रत्येक मुद्दा सर्वानुमते मान्य झाला, हे भारताचे मोठे यशच. त्यातच ‘जी २०’चे यजमानपद सांभाळणार्‍या भारताच्या पंतप्रधानांनी उपस्थित सगळ्यांचेच आदरातिथ्य अगदी भरभरून केले. सक्षम भारत, सजग भारताचे समर्थ रूप मोदींनी त्यावेळी सर्व जगासमोर मांडले. कॅनडाच्या पंतप्रधानांचे आदरातिथ्यही अगदी भारतीय परंपरेने उदार स्वरुपात केले.

कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी भारतीय दूतावास, हिंदू धर्मीयांची श्रद्धास्थाने याविरोधात होणार्‍या कारवायांबद्दल यावेळी नरेंद्र मोदी यांनी जस्टीन ट्रुडो यांना विचारणादेखील केली. यावर जस्टीन यांनी म्हटले की, “कोणत्याही प्रकारची हिंसा आणि दहशतवादी कृत्याला कॅनडाचे समर्थन नाही.“ पंतप्रधान मोदींनी जस्टीन यांना कॅनडातील दहशतवादावर जाब विचारावा आणि परदेशात सगळ्या जगासमोर जस्टीन यांना दहशतवादावर स्पष्टीकरण द्यावे लागले, हे कॅनडातल्या काहींना मात्र अजिबात रुचले नाही.

असो. ‘जी २०’ परिषदेनिमित्त कॅनडाच्या ‘टोरंटो सन’ या आघाडीच्या वर्तमानपत्राने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा हात पकडला आणि मोदीजी ट्रुडो यांना पुढे जाण्याची खूण करीत आहेत, असे छायाचित्र छापले. तोच फोटो कॅनडाचे विरोधी पक्ष नेता पियरे पोइलीवरे यांनी प्रसारमाध्यमांवर टाकला. त्यावर संदेश लिहिला की, ’राजकीय पक्षपात बाजूला ठेवू; पण कुणीही हे पाहू शकणार नाही की, कॅनडाच्या पंतप्रधानांना जगातील इतर देशांनी वारंवार अपमानित करावे.’ त्यातच जस्टीन ट्रुडो ‘जी २०’ परिषदेसाठी भारतात आले. मात्र, भारतात आल्यावर त्यांचे विमान खराब झाले आणि त्यामुळे भारतात त्यांना दोन दिवस अधिकचे थांबावे लागले. परदेशात जाऊन कॅनडाच्या पंतप्रधानांची पुनश्च फजिती झाली.

मागील ‘जी २०’ बैठकीत चीनच्या जिनपिंग यांनीही ट्रुडो यांना तर जाहीरपणे सुनावले होते आणि यंदा भारतात त्यांना साहजिकच खलिस्तानवाद्यांवर कारवाई करण्याबाबत जाब विचारण्यात आला. दुसरीकडे कॅनडामध्ये काही ठरावीक लोक भारताविरोधी फुटीरतावादी कारवाया करीत असतात. अर्थात, त्यांना चिथावणारे भारताचे शत्रुराष्ट्रच आहे, हे काय सांगायला हवे? भारताशी ट्रुडो यांनी संबंध वाढवावेत, हे या गटाला अजिबात पचनी पडले नाही. त्यामुळेच कॅनडामध्ये दि. १० सप्टेंबर रोजी ‘सीख्ज फॉर जस्टिस’ या दहशतवादी संघटनेने खलिस्तानी सार्वमत कार्यक्रमाचे आयोजन केले. भारताचे विभाजन होऊन खलिस्तानची निर्मिती व्हावी, अशा मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवण्याचा हा कार्यक्रम.

भारत कुठे? कॅनडा कुठे? कॅनडातील काही भरकटलेल्या फुटीरतावादी लोकांनी भारताच्या विभाजनासाठी सह्यांची मोहीम राबवली. म्हणून लगेच भारताचे विभाजन होऊन दहशतवाद्यांचे खलिस्तानी स्वप्न पूर्ण होईल का? अजिबात नाही. मात्र, आता ट्रुडो भारतात ‘जी २०’मध्ये सहभागी होत असताना या कार्यक्रमाचे आयोजन का? ‘सीख्ज फॉर जस्टिस’ दहशतवादी संघटनेला वाटले की, ‘जी २०’ परिषद सुरू असताना भारतविरोधी कारवाई करणारा कार्यक्रम केला. कार्यक्रमाला कॅनडातील ७० हजार शीख सहभागी होतील. ते खलिस्तानच्या निर्मितीच्या मागणीसाठी सह्या करतील. त्यामुळे ट्रुडो यांच्यावर दडपण येईल आणि ते दहशतवादी कारवाईसाठी भारताला कोणतेही समर्थन देणार नाहीत. मात्र, झाले उलटेच. या कार्यक्रमात दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू हजर होता. कार्यक्रमात ७० हजार लोक नाहीत, तर अगदी बळेबळे सहा ते सात हजार लोक जमले.

’सीख्ज फॉर जस्टिस’च्या दहशतवादी घाणेरड्या स्वप्नाला जनमत आणि समर्थन लाभले नाही. भरीसभर ट्रुडो यांना भारतविरोधी कारवायांना कॅनडा समर्थन करणार नाही, असे म्हणणे भाग पडले. खलिस्तानी दहशवाद्यांबद्दल कानाडोळा करणार्‍या कॅनडा प्रशासनालाही आता कळून चुकले की, भारत आता कोणताही दहशतवाद खपवून घेणार नाही. दुसरीकडे विदेशामध्ये बसून आपण भारतविरोधी कारवाया करू. त्याला भारी जनसमर्थन लाभेल, तसेच त्याविरोधात भारताकडून जाब विचारला जाणार नाही, या भ्रमात असलेल्या दहशतवाद्यांना चांगलीच चपराक बसली; तीही जगभरातले सामर्थ्यशाली देश ‘जी २०’ निमित्त भारतात असताना! थोडक्यात, भारत तर शक्तिशाली आहेच; पण ‘मोदी हैं तो मुमकीन हैं!’

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.