डोंबिवली : पुनीत सागर अभियानांतर्गत डोंबिवली पूर्व येथील आयरेगावमधील तलाव आणि त्याचा परिसर स्वच्छ करण्याचे अभियान डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिर आणि धनाजी नाना चौधरी या शाळांनी राबविले. या अभियानांतर्गत परिसरातून एक मेट्रिक टन कचरा काढण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जागृती निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. टिळकनगर विद्यामंदिर ते आयरेगाव तलावापर्यन्त प्रभात फेरी काढत शहरातील नागरिकांमध्ये जाणीव निर्माण करण्यात आली. नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक घोषवाक्यांचा गजर केला.
या उपक्रमांतर्गत तलावाचे चौथरे, पायऱ्या आणि सभोवतालच्या परिसरातील गवत, प्लास्टिक, थर्माकोल, कागद आणि कापड इत्यादी प्रकारचा कचरा वेगवेगळा करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीत जमा करण्यात आला. तलाव व परिसरातून एक मेट्रिक टन कचरा काढण्यात आला. टिळकनगर शाळेचे ४० तर डी एन सी शाळेचे ३१, एनसीसी छात्र सैनिक त्यांचे एन सी सी ऑफिसर नामदेव चौधरी आणि भूषण संखे यांच्यासह उपस्थित होते.
स्वच्छता अभियान राबवण्यासाठी कल्याण डोंबिवली विभागाच्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या सदस्य रूपाली शाईवाले, प्रिया राणे, उज्वला केतकर, सुरेखा जोशी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ग प्रभाग क्षेत्राचे स्वच्छता अधिकारी गाडे आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवण्यात आले.