कल्याण : तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्रीपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. केंद्रीय मंत्र्यांसह अनेकांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असतानाच उदयनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे कल्याण पूर्वेत साखळी उपोषण केले जात आहे.
तामिळनाडूचे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरिया या आजारांशी तुलना केली होती. त्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असून अनेक हिंदुत्ववादी संघटना, नेत्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
स्टॅलिन यांनी केलेल्या या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कल्याण पूर्वेत सकल हिंदू समाजातर्फे साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे अशी माहिती उपोषणकर्ते ॲड. शिवानंद पांडे यांनी दिली आहे. तसेच स्टॅलिन यांच्यावर ज्याप्रमाणे बिहार राज्यात गुन्हा दाखल झाला आहे, त्या धर्तीवर कोळसेवाडी पोलिसांनीही आमच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पांडे यांनी केली आहे.