दिल्ली : दिल्ली येथे आयोजित जी-20 परिषदेदरम्यान भारत मंडपम हे नाव अनेकदा ऐकण्यात, वाचण्यात आले. याच ठिकाणी जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी या जागेचे विशिष्ट पध्दतीने बांधकाम आले होते. संजय सिंह नामक व्यक्तीने आपल्या कल्पनाशक्तीतून हे बांधकाम केले होते. संजय सिंह कोण आहेत? आणि त्यांच्या कामाची का चर्चा आहे? हे जाणून घेऊया.
याआधी भारत मंडपम प्रगती मैदान या नावाने ओळखले जायचे. जी-20 परिषदेच्या निमित्ताने भारत मंडपममध्ये साकारण्यात आलेल्या विशेष कलाकृतींची चांगलीच चर्चा रंगली. भारताचा इतिहास, संस्कृती आणि कलेचा यात विशेष समावेश करण्यात आला. परदेशी पाहुणेदेखील या कलाकृती बघून भारावून गेले. संजय सिंह यांच्या डोक्यातून ही कल्पना आली आहे,
संजय सिंह हे एक प्रसिध्द आर्किटेक्ट आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारत मंडपमच्या सजावटीकरीता कलेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यात भारतातील शिल्प, संस्कृती आणि जीवन जगण्याच्या पध्दतींना विशेष स्थान देण्यात आले आहे. माध्यमांशी बोलताना संजय सिंह यांनी सांगितले की, भारताची प्रतिमा समोर यावी अशा पध्दतीने भारत मंडपमला सजविणे हा त्यांचा उद्देश होता.
संजय सिंह म्हणाले की, आम्हाला एक चित्र सापडले ज्यामध्ये दोन मासे पाण्याच्या प्रवाहाने जोडलेले आहेत. ते बघून आमच्या लक्षात आले की, हे दोन मासे गंगा आणि यमुनेचे प्रतीक आहेत, तर पाणी हे जीवनाचे अमृत आहे. याच चित्रावर आधारित भारत मंडपमची रचना आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी सांगितले की, आम्ही इमारतीला अंडाकृती आकार दिला आहे. त्यामुळे तिथे कोणत्याही खडबडीत कडा किंवा मजबूत कोपरे सापडणार नाहीत. ज्या बिंदूपासून ही वास्तू बघाल तिथून ती यमुनेच्या पाण्यासारखी दोन्ही बाजूंनी सारखीच दिसेल. आम्ही इमारत 6 मीटरच्या व्यासपीठापर्यंत वाढवली आहे. स्टेजच्या दोन्ही बाजूला रिट्रीट लाउंज, टी हाऊस आणि बिझनेस सेंटर आहे. त्यामुळे या वास्तूला नीट बघितल्यास संपूर्ण पायाभूत सुविधा यमुनेच्या लाटांप्रमाणे वर-खाली होताना दिसतील.
भारत मंडपममध्ये भारतातील सर्वात मोठा झुंबर बसवण्यात आला आहे. भारत सरकारशी फलदायी चर्चेनंतर २०१६ मध्ये भारत मंडपमचे बांधकाम सुरू झाल्याचे संजय सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधानांना काय हवे आहे, याबाबत ते स्पष्ट होते. इमारत ही जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांशी स्पर्धा करू शकणारी आणि देशासाठी अभिमानाची बाब ठरणारी प्रतिष्ठित असली पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत होते, असेही संजय सिंह यांनी सांगितले.