ठाणे महापलिका प्रशासनाची होणार दमछाक!, १०० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत

    31-May-2023
Total Views |
Thane Municipal Corporation

ठाणे
: ठाणे महापालिकेमध्ये आधीच अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या तुटपुंजी असताना आज मे अखेरीस जवळपास १०० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत झाले. यात ११ वरीष्ठ अधिकाऱ्यांच सेवानिवृत्ती होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याने लवकरच भरती प्रक्रिया राबवण्याचा मानस पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. राज्य सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एकीकडे गेल्या काही वर्षापासून ठाणे महापालिकेत अधिकारी,अभियंता आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांची चणचण भासत असताना मे महिन्यांनंतर जम्बो सेवानिवृत्तीनंतर ठाणे पालिका रिकामी होणार असल्याने प्रशासनाच्या नाकीनऊ येणार आहे. ठाणे महापालिकेत वर्ग १ - १७६, वर्ग २ - १५५, वर्ग ३ - २ हजार ४६५ तर चतुर्थश्रेणी - ४ हजार १० एवढे मनुष्यबळ आहे. ३१ मे रोजी १०० हून अधिकजण निवृत्त झाले आहेत.अशाप्रकारे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना दुसरीकडे भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याने कारभार कसा करावा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. ठाणे पालिकेत मागील दोन वर्षांचा विचार केल्यास प्रत्येक महिन्याला सरासरी ३० ते ९० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची कसर भरून काढण्यासाठी कंत्राटी स्वरूपात कर्मचारी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तरीदेखील पालिकेच्या महत्त्वाच्या पदांवर असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची कसर यामुळे भरून निघत नसल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांची पदेही रिक्त असल्याने पालिकेच्या एका एका अधिकाऱ्यावर किमान पाच ते सात विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. परंतु कामाचा व्याप लक्षात घेता हा अतिरिक्त कारभार हाकताना अधिकाऱ्यांची त्रेधातिरपिट उडत आहे. महापालिकेत अधिकारी भरती प्रक्रियेचा आकृतिबंध मंजूर झाला असला तरी, तो देखील अर्धवट स्वरूपातच आहे. त्यामुळे पालिकेला आवश्यक असलेले मनुष्यबळ मिळवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याची भावना अधिकाऱ्याची आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर आपत्ती विभाग अधिकाऱ्याविना

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमूख अधिकारी म्हणून पदभार संभाळणारे अविनाश सावंत हे देखील ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकाऱ्याविना असल्याने पालिकेसमोर पेच उभा ठाकला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.