पाणमांजर... पाण्यात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटणारा हा प्राणी प्रामुख्याने कोकणातील नद्या आणि खाडी प्रदेशांमध्ये आढळतो. उदमांजर, उद, उदळ, घिर्या अशा विविध स्थानिक नावांनी ओळखला जाणार्या पाणमांजराला इंग्रजीत ‘ऑटर’ असे म्हणतात. समूहाने राहात असलेली ही पाणमांजरे फार क्वचितच किनार्यावर आलेली पाहायला मिळतात. संशोधकांच्या मते, उदमांजर हे पाणथळ जागेचे प्रतिनिधित्व करतात. जगभरात पाणमांजराच्या 13 प्रजाती आहेत. या प्रजातींपैकी स्मुथ कोटेड ऑटर्स, एशियन स्मॉल क्ल्वॉड ऑटर्स आणि युरेशियन ऑटर्स या तीनच प्रजाती भारतात आढळतात.
१) Smooth coated otters (Lutrogale perspicillata) :संपूर्ण आशिया खंडात आकाराने सर्वांत मोठी तर, जगभरात दुसर्या क्रमांकाची आकाराने मोठी अशी ही पाणमांजरे आहेत.
२) Eurasian Otter (Lutra lutra): आकाराने सगळ्यात लहान असे हे उदमांजर संपूर्ण जगात आढळून येते.
३) Asian Small-clawed Otter (Aonyx cinereus):साधारणपणे वाघ, बिबळ्यांप्रमाणे उदमांदरांच्या अंगावरील पट्टे किंवा धब्ब्यांवरून लक्षात येतील, असे नसल्यामुळे संशोधक उदमांजराच्या शरीरावरील बाह्य खुना किंवा त्वचेशी निगडित जखम व व्यंगाचा उपयोग त्यांची संख्या मोजण्यासाठी करतात.

स्मुथ कोटेड उदमांजरांचा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या अनुसूची एक या यादीत समावेश करण्यात आला आहे. तसेच, त्यांना ‘आययुसीएन’च्या लाल सूचीत असुरक्षित म्हणून घोषित केले आहे. युरेशियन उदमांजराचा वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची एकच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, यामुळे त्यांना मारण्यावर किंवा त्यांच्या व्यापारावर अंकुश बसला आहे. मराठीत उदमांजर(उद-पाणी आणि मांजर) तर कन्नडमध्ये नीर नायी (नीर- पाणी, नायी - कुत्रा)किंवा पानी का कुत्ता म्हणून उदमांजरांना ओळखले जाते. बहुतेक ठिकाणी लोक भिजलेले मुंगूस आणि उदमांजरांमधे गोंधळतात. उदमांजरांचे वर्णन करायला गेल्यास त्यांना चपटी शेपटी असते जी पोहोताना, पाण्यात सूर मारताना आणि चपळतेने हालचाल करताना, दिशा बदलताना मदत करते. त्यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदा असतो (webbed feet) आणि अंगावर लहान पण भरपूर केस असतात. माझ्या निरीक्षणानुसार, स्मुथ कोटेड ऑटर नदीच्या खोलगट भागात, दगडांच्या भागात, चिखलात किंवा लहान बेटावर असतात. भारताच्या काही भागात ते खारफुटी आणि शेतात ही सापडले आहेत. उदमांजर हा सामाजिक प्राणी आहे आणि ते एकत्र गटात राहून शिकार करतात. कुटुंबातील सदस्यांमधील ममत्व किंवा संबंध वाढवण्यासाठी व ते टिकवण्यासाठी ते एकाच जागेचा शौचासाठी वापर करतात. याप्रकारे उदमांजर आपली हद्द निश्चित करीत असते.
शक्यतो मानवीवस्तीजवळ न आढळणारा हा प्राणी मानवा जवळपासच्या काही भागात आला तरी माणसांशी कमीतकमी संपर्क येण्याच्या दृष्टिकोनातून ते रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात. परंतु, काही कारणास्तव त्यांना दिवसा बाहेर पडायचे झाले तरी त्यांचा मुख्य ‘अल्फा’ प्रथम बाहेर पडून ती जागा सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासून घेतो. त्यानंतरच शिट्टी वाजवून त्याच्या कुटुंबातील इतरांना बाहेर येण्याचे संकेत देतो. उदमांजर सामाजिक असल्याकारणाने ते त्यांच्या बिळासाठी घरासाठी संरक्षणात्मक असतात. आपल्या हद्दीविषयी संवेदनशील असलेला हा प्राणी प्रसंगी हिंस्त्र झाल्याची ही घटना माझ्या स्मरणात आहे. पूर्वी एकदा एक मगर उदमांजराच्या बिळाच्या आसपास होती, तर कुटुंबप्रमुखाने तिच्या शेपटीला चावे मारले आणि तिला पळवून लावले होते. मगरीला उदमांजरांनी असंख्य चावे मारल्याने ती तिथून निघून गेली होती. त्यावरून असे नक्कीच लक्षात घेता येईल की सर्व क्युट दिसणारे प्राणी निर्दोष असतीलच असे नाही. उदमांजर आपला परिसर असा निवडतात जिथे वाळूचा किनारा आहे. या वाळूत ते लोळून स्वतःला कोरडं करतात. त्यांना असे जंगल आवडते जिथे वेगवेगळे वृक्ष, झुडूपं आजूबाजूच्या परिसरापेक्षा वेगळे असतील तिथेच ते स्वतःची बिळे तयार करतात. उदमांजरांच खाणं पूर्णतः वेगळं असतं.

L. perspicillata (Smooth Coated Otter)जास्त करून मासे, खेकडे, सरपटणारे प्राणी, छोटे पक्षी इ. खातात, तर Cinereus (sian Small clawed other) उदमांजर मासे, खेकडे आणि शिंपल्यांवर जगतात. क्वचितच छोटे पक्षी आणि सस्तन प्राणी ते खातात. उदमांजरांचा वावर किंवा अधिवास माणसांपासून दूर, नदीकिनारी आणि खारफुटीच्या जागी असला तरी मानवाबरोबर त्यांचा संबंध तेव्हाच येतो जेव्हा त्यांचं खाणं माणसं घेतात. उदाहरणार्थ मच्छीमार, खाणकामगार किंवा शेतकरी जेव्हा मासेमारी करायला येतात. साधारणपणे उदमांजर दहा ते बारा किलो खाणं खातात. मासे पकडण्याची जाळी किंवा माशांची शेती या ठिकाणी त्यांना सहज खाणं मिळतं त्यामुळे ते या जागांच्या आसपासच दिसतात आणि यामुळेच या दोघांत मतभेद किंवा विवाद दिसून येतात. परिणामी, पाणमांजरांना मारण्याच्या घटना दिसून येतात. अशा ठिकाणी ‘ट्रॅप’ लावून, विष देऊन, विस्फोट घडवून किंवा त्यांची बिळं जाळून उदमांजरांना मारले जाते. काही लोकांच्या मतानुसार, या मांजरांमुळे चांगले मासे मिळतात, तर काहींच्या मते ते मासे कमी करतात आणि म्हणून त्यांना ते अगदी नकोसे असतात, तर इतर काही लोकांना त्यांच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीचा काहीच फरक पडत नाही. अशावेळी समाजाला न दुखावता उदमांजरांना वाचवणे हे संशोधक आणि पर्यावरण संरक्षकांसमोरचे आव्हान असते.
छुपे रुस्तम असले तरी भारतात उदमांजरांना नेहमीच संरक्षण देण्याच्या दृष्टीने बघितले गेले आहे. सध्या सुरु असलेल्या विकास कामांमुळे उदमांजरांच्या अस्तित्वाला धोका संभवतो. जलविद्युत प्रकल्प, खारफुटीच्या जागेचे कृषी आणि बांधकामासाठी रूपांतरण, उदमांजर मच्छीमार संघर्ष, अनिर्बंध वाळू उपसा, बेकायदेशीर व्यापार यामुळे उदमांजरांचेजीवन धोक्यात आले आहे, असे असले तरी ‘वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स’ वापरून परिसंस्थेतील अनेक घटकांचे संवर्धन आणि संरक्षण करणे अनेक पटींनी सोपे होईल. उदमांजरांवर करण्यात आलेल्या अभ्यासामुळे त्यांची मानवाबरोबरची अनुकूलता समजून घेतली गेली आहे. स्वच्छ आणि साफ पाण्याचे स्रोत ही परिसंस्थेची अत्यंत आवश्यक गरज आहे. त्याचे संरक्षण करणे जरूरीचे आहे. परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी पाणमांजर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळेच वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण मिळालेल्या या प्रजातीला संवर्धित करणे ही काळाची गरज आहे.