यंदाचा बारावीचा निकाल ९१. २५ टक्के

    25-May-2023
Total Views |
HSC Board exam result maharashtra

पुणे
: राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. पुणे विभागाचा निकाल ९३. ३४ टक्के, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.

यंदाच्या निकालात राज्यातील ७ हजार ६९६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. ३५ ते ४५ टक्के गुण १ लाख ६७ हजार ७६३ विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. गेल्यावर्षी १० हजार ३७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी गेल्यावर्षीच्या तुलनेत २ हजार ३५१ने घटले आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.