नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी सर्वपक्षीयांना निमंत्रण : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नव्या संसद भवनाच्या राष्ट्रार्पणावर काँग्रेससह १९ विरोधी पक्षांचा बहिष्कार
24-May-2023
Total Views | 94
नवी दिल्ली : संसदेच्या नव्या वास्तूचे राष्ट्रार्पण राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करणे म्हणजे भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे. त्यामुळे विरोधी आम्ही उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे संयुक्त निवेदन काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी काढले आहे. दरम्यान, आतापर्यंत तेलुगू देशम पार्टी, वायएसआर काँग्रेस, शिरोमणी अकाली दल या पक्षांनी सोहळ्यास उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी, २८ मे रोजी संसदेच्या नव्या वास्तूचे राष्ट्रार्पण होणार आहे. मात्र, त्यावरून विरोधी पक्षांनी वादंगास प्रारंभ केला असून राष्ट्रार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १९ राजकीय पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. यामध्ये काँग्रेस, द्रमुक, आप, शिवसेना (ठाकरे गट), भाकप, झारखंड मुक्ती मोर्चा, विदुथलाई चिरुथिगल कच्ची, राष्ट्रीय लोकदल, तृणमूल काँग्रेस, जदयु, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, मद्रमुक या पक्षांचा समावेश आहे.
नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. सरकार लोकशाही धोक्यात आणत आहे असा आमचा विश्वास असूनही आणि नवीन संसदेची स्थापना ज्या निरंकुश पद्धतीने झाली त्याबद्दल आमची नापसंती असूनही मतभेद बाजूला ठेवून याप्रसंगी उपस्थित राहणार होतो. मात्र, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणे हा राष्ट्रपतींचा अपमान आणि लोकशाहीवरील हल्ला असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. त्याचप्रमाणे भारतीय घटनेप्रमाणे राष्ट्रपती हे केवळ राष्ट्राचे प्रमुख नसतात, तर ते संसदेचे अविभाज्य भागही आहेत. राष्ट्रपतींशिवाय संसदेचे कामकाज चालत नाही. तरीही, पंतप्रधानांनी त्यांच्याशिवाय नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा घेतलेला निर्णय हा राज्यघटनेचा अपमान करत असल्याचेही विरोधी पक्षांनी म्हटले आहे.
सर्वांना निमंत्रण दिले आहे : केंद्र सरकार
केंद्र सरकारने सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, हा राजकारण करण्याचा विषय नाही. जुन्या परंपराना पुन्हा पुनरुज्जीवीत करण्याचा हा ऐतिहासिक प्रसंग आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या विचारप्रक्रियेनुसार निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.