‘मोदी इज द बॉस’

    24-May-2023
Total Views |
ind aus

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी २० हजार अनिवासी भारतीयांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मोदी इज द बॉस’ असे जाहीरपणे संबोधले आणि त्याला टाळ्यांचा कडकडाट करून दाद देण्यात आली. दक्षिण आशियाई राष्ट्रांचा समतोल राखण्याचे काम केवळ भारतच करू शकतो, हे ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अधोरेखित झाले.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अ‍ॅन्थोनी अल्बानीज यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना त्यांची तुलना अमेरिकन रॉक स्टार ब्रूस स्प्रिंगस्टीनशी केली. “पंतप्रधान मोदी बॉस आहेत,” असे गौरवोद्गार अल्बानीज यांनी काढले आणि संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. सिडनीतील एरिना स्टेडियममध्ये जवळपास २० हजार अनिवासी भारतीयांशी मोदी यांनी जाहीर संवाद साधला. या कार्यक्रमात अल्बानीज यांनी मोदी यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याने काय साधले, असा प्रश्न कोणी उपस्थित केला, तर त्याचे एका वाक्यात देता येणारे उत्तर म्हणजे या दौर्‍यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांचा समतोल राखण्यात भारताचे स्थान अधोरेखित झाले. विस्तारवादी चीनला रोखण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून जे प्रयत्न होत आहेत, ते भारताशी मित्रत्वाचे संबंध जोपासल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत, हे स्पष्ट झाले.

भारत हा आपल्या क्षेत्रातील शांतता, सुरक्षितता आणि स्थिरता अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो, असे अल्बानीज यांनी नमूद केले आहे. गेल्या एका वर्षांत मोदी आणि अल्बानीज यांच्यात झालेली ही सहावी बैठक आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या भाषेत आता आमचे संबंध ‘टी-२०’ मोडमध्ये आले आहेत, अशी टिप्पणी मोदी यांनी केली आहे. आपली लोकशाही मूल्ये आपल्या संबंधांचा पाया असून, आमचे संबंध परस्पर विश्वास आणि आदर यावर आधारित आहेत. ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदाय हा आपल्या देशांमधील सर्वात मोठा दुवा आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. अल्बानीज आणि सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना यावर्षीच्या क्रिकेट विश्वचषकासाठी त्यांनी भारतात येण्यासाठी आमंत्रित केले आहे. या निमित्ताने ते भारतातील भव्य असा दिवाळी सणाचा आनंदही घेऊ शकतील, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियातील माध्यमांनीही ‘मोदी इज द बॉस’ असे मथळे देत मोदी यांच्या या सभेचे सविस्तर वृत्तांकन प्रसिद्ध केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या चर्चेत ११ द्विपक्षीय विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटना तसेच फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवर चर्चाही झाली. यापूर्वीही ती झाली होती. अल्बानीज यांनी भविष्यात अशी घटना घडलीच, तर त्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात असणारे मैत्रिपूर्ण तसेच सौहार्दपूर्ण संबंध कोणीही आपल्या कृतीने अथवा विचारसरणीने दुखवू नयेत, अशी अपेक्षा चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आली. त्याचवेळी उभय नेत्यांमध्ये झालेली चर्चा व्यापार आणि गुंतवणुकीवर आधारित होती. अक्षय ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य मजबूत कसे करता येईल, यावरही चर्चा झाली. प्रदेशातील शांतता, स्थिरता आणि समृद्धीसमोरील आव्हानांवरही झालेली चर्चा ही विशेष महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियन व्यवसायांना भारताच्या भरभराटीच्या ‘डिजिटल’, ‘इनोव्हेशन इकोसिस्टम’शी जोडण्यात मदत करण्यासाठी नवीन वाणिज्य दूतावास बंगळुरुमध्ये उघडण्यात येत असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केली आहे.

24 May, 2023 | 21:25

एप्रिल २००० ते डिसेंबर २०२२ या कालावधीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून १.०७ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक मिळालेली आहे. दोन्ही देशांनी यापूर्वीच गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी अंतरिम मुक्त व्यापार करार लागू केला असून, दोन्ही राष्ट्रे आता त्या कराराची व्याप्ती व्यापक आर्थिक सहकार्य करारात करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या आर्थिक वर्षात ऑस्ट्रेलिया हा भारताचा १३वा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार बनला असून, निर्यात ६.९५ अब्ज डॉलर इतकी होती, तर १९ अब्ज डॉलरची आयात करण्यात आली. त्यामुळेच द्विपक्षीय व्यापार संबंधांचा लक्षणीय विस्तार करण्यासाठी, दोन्ही पंतप्रधानांनी सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी निर्माण होईल. तसेच, दोन्ही देशांचा व्यवसाय मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारही मार्गी लागला आहे. तसेच स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारही झालेला आहे. ही व्यवस्था विद्यार्थी, पदवीधर, संशोधक आणि व्यावसायिकांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल, परस्परसंबंध वृद्धिंगत होतील, असा विश्वास आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवीन उंचीवर नेले आहे. चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘क्वाड’ची स्थापन करण्यात आली. इंडो- पॅसिफिक क्षेत्रात वसाहतवादी चीनला रोखण्याचे काम केवळ भारतच करू शकतो, याची कल्पना असल्यानेच भारत तसेच ऑस्ट्रेलिया यांनी यावर अधिक सविस्तर चर्चा केली आहे.

गेल्या आठवड्यात ‘जी ७’परिषदेसाठी मोदी जपान येथे निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांची स्वाक्षरी घेत, मोदी यांच्या जागतिक नेतृत्व क्षमतेवर शिक्कामोर्तबच केले. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाने आक्रमण केल्यानंतर पहिल्यांदाच मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते पापुआ न्यू गिनी येथे गेले. पॅसिफिक बेटांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तेथून ते ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर होते. ऑस्ट्रेलियात त्यांचे ज्या पद्धतीने स्वागत झाले, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्यांना ‘द बॉस’ असे जाहीरपणे संबोधत जो सन्मान दिला, तो प्रत्येक भारतीयाला सुखावणारा असाच आहे. भारतीय म्हणून स्वतःची ओळख आज प्रत्येक अनिवासी भारतीय अभिमानाने करून देत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली नऊ वर्षे परराष्ट्र धोरण राबविण्यासाठी जी अथक मेहनत घेतली आहे, त्याचेच हे गोमटे फळ आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.