अभाविप : केवळ संघटन नव्हे, तर राष्ट्रीय विचारांची विद्यार्थी चळवळ!

    24-May-2023
Total Views |
ABVP

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज, गुरुवार दि. २५ मे ते रविवार दि. २८ मे दरम्यान पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने अभाविपच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा आढावा घेताना संघटनेची उद्दिष्टे आणि कार्यकारिणी बैठकीचे स्वरुप याचा उहापोह करणारा हा लेख...

'अभाविप’ आपल्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. विद्यार्थ्यांचा, कार्यकर्त्यांचा समूह सतत वाहता व बदलता असतो. मात्र, संघटन स्थायी आहे. म्हणून अशा संघटनेची-चळवळीची तब्बल ७५ वर्षांची- अमृत महोत्सवी वाटचाल ही विशेष अभिमानास्पद, गौरवास्पद आहे. ’मातृमंदिर का समर्पित दीप मैं, चाह मेरी यह की मै जलता रहू...’ अशा प्रेरणेने आणि ध्येयाने राष्ट्रकार्यासाठी, राष्ट्रोत्थानासाठी, राष्ट्रपुनर्निर्माणासाठी हजारो समर्पित कार्यकर्त्यांची फळी अभाविपने निर्माण केली आहे.

शैक्षणिक प्रश्नांना, समस्यांना वाचा फोडत, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना, केवळ समस्या न मांडता त्यावर उत्तर देणे, प्रसंगी स्वतः पुढे होऊन नेतृत्व करणे, असे काम विद्यार्थी परिषदेने केले आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधापासून ते ’ठीक करेंगे तीन काम; प्रवेश, परीक्षा और परिणाम’ अशा अभियानापर्यंत, तसेच खडू, फळा, शाळेचे छप्पर पासून ते ’शिक्षण आमच्या मागणीनुसार, नाही कुणाच्या लहरीनुसार’ या मागणीपर्यंत... शालेय शिक्षणापासून ते उच्चशिक्षणापर्यंत. तसेच विद्यापीठे ही केवळ परीक्षा घेणारी केंद्रे न राहता संशोधनाची केंद्रे बनावीत, या आग्रहापर्यंत अनेक मागण्या परिषदेने लावून धरल्या असून पूर्णही करवून घेतल्या. महाविद्यालय परिसर हे गुन्हेगारीची, व्यसनाधीनतेची केंद्रे न बनता, खर्‍या अर्थाने विद्येची, अभ्यासाची, संशोधनाची केंद्रे बनावीत यासाठी परिषद नेहमी आग्रही राहिली आहे आणि नेहमीच अग्रेसरही राहिली आहे.

’विद्यार्थी हा उद्याचा नव्हे, तर आजचा नागरिक’ ही भूमिका परिषदेने वेळोवेळी मांडली. त्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय विचारांचा संस्कार झाला पाहिजे, विविध भेदांच्या बाहेर येऊन त्याने राष्ट्राचा विचार करावा, अशी भूमिका परिषदेने घेतली. त्यानुसार विद्यार्थीपयोगी, विद्यार्थीहिताची, राष्ट्रहिताच्या कार्यक्रमांची, उपक्रमांची रचना विद्यार्थी परिषद करत असते. त्यानंतर हे उपक्रम, कार्यक्रम केवळ विद्यार्थी परिषदेपुरता मर्यादित न राहता, समाजाचे बनून राहतात. सामाजिक चळवळ म्हणून पुढे कार्यान्वित राहतात. शिक्षणक्षेत्रात काम करत असताना अनेक सामाजिक विषयांना दिशा देणेही आवश्यक. विद्यार्थी परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या सामाजिक जीवनाची किंबहुना आपल्या पुढील आयुष्याची वाटचाल अशा सामाजिक विषयांना घेऊन पुढे चालू ठेवलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने आयुष्य जगण्याची त्यांना जीवनदृष्टीच मिळाली आहे.

आज विद्यार्थी जीवनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न अभाविपने केला आहे. गेल्या ७४ वर्षांत ‘अभाविप’च्या कामाचा विस्तार खूप मोठा झाला आहे. ’क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही’ या ध्येयानुसार परिषदेने अनेक आयाम, गतिविधी, कार्य सुरू ठेवले आहेत. पर्यावरण विषयांत 'Students for Development', सेवा विषयांत ’students for Seva ’, कला क्षेत्रात (गायन, वादन, नृत्य, नाट्य, इ.) ’राष्ट्रीय कलामंच’, आयुर्वेद विद्याशाखेत ’जिज्ञासा’, वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ’'Mede-Avision',’, औषधनिर्माण शास्त्राचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये ’'Pharmavision’, कृषी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये ’Agrivision', तसेच तंत्र शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ’तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य’, तसेच जनजाती विद्यार्थ्यांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी ’जनजाती विद्यार्थी कार्य’, संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ’SHODH’, तसेच केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ’Think India’, आंतरराष्ट्रीय स्तरावर ’WOSY’, तसेच खासगी विद्यापीठांमध्ये ’Indi-gnous’ असे आयाम कार्यरत आहेत.

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी ’ऊळशिु’, विद्यार्थ्यांमधील साहित्य, कला, वाङ्मय यातील प्रतिभेला मंच देण्यासाठी ’प्रतिभासंगम’ साहित्य संमेलन यांचे आयोजन अभाविप करत असते. ’मेरा घर मेरा देश’ ही संकल्पना राबवण्यासाठी ’डएखङ’ (आंतरराज्य छात्र जीवन दर्शन) टूरचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना उर्वरित भारतात विविध शहरात, कुटुंबात आणून सांस्कृतिक आदानप्रदान करण्यात येते. अभाविपच्या या ७५ वर्षांच्या अर्थात अमृत महोत्सवी वाटचालीत, राष्ट्रपुननिर्माणाच्या या कार्यात असंख्य कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले आहे. राष्ट्रकार्याच्या या यज्ञात आपल्या जीवनाची त्यांनी समीधा अर्पित केली आहे. त्याची आवर्जून आठवण होणं क्रमप्राप्त आहे आणि यात सर्वांत मोठं नाव आहे ते म्हणजे अर्थातच मा. प्रा. यशवंतराव केळकर सर यांचं! सरांनी या चळवळीला वैचारिक अधिष्ठान, संघटनेला विशिष्ट तंत्र व मंत्र आणि कालसंगत व कालसिद्ध कार्यपद्धती प्राप्त करून दिली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील राष्ट्रकार्यात झोकून देणार्‍या, स्वतःला गाडून घेणार्‍या कार्यकर्त्यांची फळी उभी केली. “राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे कार्य समर्पण बुद्धीने, स्वयंप्रेरणेने व विचारांशी बांधिलकी ठेवून, ठरलेल्या कार्यपद्धतीने करायचे आहे. ते करताना केवळ आपणच ते काम करत राहायचे नसून, नवी पिढी तयार करायचे आहे,” असे ते म्हणत असत. तसेच “अभाविपचे काम म्हणजे माणूस घडविण्याचे काम आहे,” असे ते नेहमी म्हणत. त्यासाठी उक्तीपेक्षा कृती महत्त्वाची. आधी केले मग सांगितले, अशी त्यांची धारणा होती. उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा स्वतः पुढे होऊन सुरुवात करणे, हा प्रथमपुरुषी विचार त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये रुजवला. सर नेहमी म्हणायचे, अत्यंत आदर्श व्यवहार म्हणजे स्वतःबद्दल कठोर व दुसर्‍यांबद्दल उदार. त्याला (कार्यकर्त्याला) हळूहळू काम करण्याची, सुधारण्याची, गतिमान होण्याची प्रेरणा द्यायची. त्याचा विश्वास, ध्येयप्रवणता आपल्यामुळे कमी होऊ न देता ते वाढण्यास मदत करायची.

यशवंतराव केळकर सरांनी आकार आणि आकारमान दिलेली विद्यार्थी परिषद यावर्षी स्थापनेचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत महोत्सवी वर्षात केवळ उत्सवी कार्यक्रम साजरे न करता, या निमित्ताने अधिक ऊर्जेने पुढील वाटचाल कशी करता येईल, याची दिशादर्शक अशा विविध उपक्रमांची आखणी अभाविपने केलेली आहे. गेल्यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशाने साजरे केले. राष्ट्रप्रेमाच्या या हुंकारात अभाविपनेही सहभाग घेतला. हा हुंकार देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यात उपयुक्त ठरेल, अशा कार्यक्रमांची रचना अभाविपने केली आहे. परिषदेला सर्वस्पर्शी, सर्वव्यापी आणि सर्वग्राही बनवून देशाला शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय, औद्योगिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यात आणि भारतमातेला परमवैभव पुनःप्राप्त करून देण्यासाठी अभाविप आपले योगदान देत आहे व देत राहील.

अशा अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेची बैठक पश्चिम महाराष्ट्र प्रांतात, विद्यानगरी पुण्यात, दि. २५ मे ते २८ मे या कालावधीत कर्वे शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत आहे. या बैठकीसाठी सर्व अभाविपचे सर्व केंद्रीय पदाधिकारी तसेच काश्मीर ते कन्याकुमारी, पूर्वांचलसह मित्रदेश नेपाळ असे संपूर्ण देशभरातून सुमारे ३०० प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षभरातील विविध कार्यक्रमांचा, उपक्रमांचा आढावा घेणे, देशभरातील सामाजिक सद्यःस्थिती, शैक्षणिक सद्यःस्थिती आणि राष्ट्रीय सद्यःस्थितीवर सखोल चर्चा व विचारमंथन करून त्यावर प्रस्ताव पारित करणे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षासाठीची शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय विषयांना घेऊन दिशा निश्चिती करणे, अभाविपची भूमिका ठरवणे, कार्यक्रमांची, उपक्रमांची रचना आखणे इ. विषय या कार्यकारिणी बैठकीत होणार आहेत. संघटन वाढ व विस्तार यावर समीक्षा व नियोजन होणार आहे.

केंद्र सरकार व जवळपास सर्वच राज्य सरकारांनी ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. संपूर्ण भारताच्या शैक्षणिक क्षेत्राला नवसंजीवनी देणारे, किंबहुना नवीन ऊर्जा व दिशा देणार्‍या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये जगातील सर्वांत मोठे विद्यार्थी संघटन म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे योगदान काय असले पाहिजे, कसे असले पाहिजे, यावरदेखील या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीदरम्यान भव्य ’नागरी अभिनंदन सोहळा’ संपन्न होणार आहे. तसेच, उर्वरित भारताला महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा आणि परंपरा दाखवणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रांतातील सर्व पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलनदेखील होणार आहे. देशभरातून येणार्‍या सर्व पदाधिकारी आणि प्रतिनिधींचे स्वागत, सन्मान, पाहुणचार, व्यवस्था करण्यासाठी सुमारे २०० कार्यकर्ते गेली दोन महिने मेहनत करत आहेत. सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.

मराठा साम्राज्याचे केंद्र, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सावित्रीबाई फुले यांनी जेथे रोवली ती विद्यानगरी, पुण्यभूमी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी, पुण्यनगरी अर्थात पुणे शहरात ही बैठक होत आहे. याचा अभाविपला आनंद व अभिमान आहे. राष्ट्रकार्याला समर्पित कार्यकर्त्यांसाठी ही बैठक निश्चितच दिशा देणारी, ऊर्जा देणारी व प्रेरक ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे. या सर्वांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा व आपले कर्तृत्व राष्ट्रकार्यात असेच समर्पित होवो, अशी कामना! जयहिंद!

प्रा. निर्भयकुमार विसपुते 
(लेखक अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.