’पिंक रिक्षा’ नाशिककरांच्या सेवेत ; ‘रोटरी क्लब’चा महिला सक्षमीकरणासाठी अनोखा उपक्रम

    21-May-2023
Total Views |
Pink Rickshaw Nashik

नाशिक
: महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा वितरित करण्यात आल्या असून त्या नाशिककरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. रोटरीच्या या उपक्रमामुळे खर्‍या अर्थाने महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळाली आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि औद्योगिक पार्श्वभूमी लाभलेल्या नाशिकमध्ये आता महिलांसाठी पिंक रिक्षा धावू लागल्याने सुरक्षित प्रवासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.


मागील महिन्यातच शहरातील महिला लाभार्थी नीता सुभाष बागुल आणि शोभा लक्ष्मण पवार दोन गरजू महिलांना रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुंजूनूवाला यांच्या हस्ते पिंक रिक्षांचे वितरण करण्यात आले होते. सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या रोटरी संस्थेच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे नाशिककरांकडून स्वागत होत आहे. ‘रोटरी’चे अध्यक्ष प्रफुल बरडीया आणि सचिव ओमप्रकाश रावत यांच्या संकल्पनेतून उपक्रम साकारला.दरम्यान,आलेल्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करून पात्र आणि गरजू महिलांची निवड विशेष समिती मार्फत करण्यात येईल.
 
इच्छुक महिलांना आवाहन

पिंक रिक्षाच्या या उपक्रमासाठी रोटरी संस्थेमार्फत नाशिक शहरात आणखी पिंक रिक्षा देण्याचा अध्यक्ष प्रफुल बरडीया यांचा मनोदय आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी पुढे येत आहेत. आणखी 6 ते 7 पिंक रिक्षा गरजू महिलांना द्यावयाच्या असून शहरातील ज्या गरजू महिलांनी रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे, ज्यांच्याकडे आरटीओ परवाना तसेच प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड या कागदपत्रांसह कर्ज घेण्याची पात्रता आहे अशा खरोखर गरजू महिलांनी आपला अर्ज दि. 27 मे पर्यंत रोटरी क्लब ऑफ नाशिक, गंजमाळ, नाशिक येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.