वरळी वाचविण्यासाठीच आदित्य सक्रीय

    08-Mar-2023
Total Views | 123
Aditya Thackeray



मुंबई (aditya thackeray in worli) 
: निष्ठावंत शिवसैनिकांकडे होणारे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक पद्धतीने केली जाणारी डोळेझाक आणि वैचारिक विरोधकांशी युती करून मिळवलेल्या सत्तेचा परिणाम काय होऊ शकतो हे माजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समोर निर्माण झालेल्या अस्तित्वाच्या प्रश्नाच्या स्वरूपात दिसून आला आहे. वडील मुख्यमंत्री आणि स्वतः कॅबिनेट मंत्री असताना युवराज आदित्य ठाकरेंकडून (Aditya Thackeray) वरळीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. नव्हे तर त्यांनी वरळीकडे ढुंकूनही बघण्याचे कष्ट घेतले नाही. मात्र, आता तेच आदित्य ठाकरे सत्ता गेल्यानंतर वरळीच्या गल्लीबोळात फिरू लागले आहेत. त्यामुळे ठाकरेंना आपल्या आमदारकीसाठी कराव्या लागणार्‍या संघर्षाची चाहूल लागली आहे का? याची चर्चा आता मतदारसंघात केली जाऊ लागली आहे.


मतदारसंघाकडे फेर्‍या वाढल्या!

तीन वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद आणि सत्तेची सर्व सूत्र आदित्य उद्धव ठाकरे यांच्या हाती होती. वडील मुख्यमंत्री असताना शॅडो कॅबिनेट किंवा किचन कॅबिनेटमध्ये असलेल्या आदित्य ठाकरेंना आपल्याला हवा तसा मतदारसंघाचा विकास करता आला असता, पण त्यांनी दुर्लक्ष करण्यापलीकडे वरळीकरांसाठी काहीही केले नाही. रखडलेले प्रकल्प, नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले नुकसान, ‘कोविड’मध्ये झालेली वरळीकरांची गैरसोय आणि गॅस सिलेंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्य कुटुंबाशी न साधलेला संवाद यातून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरेंची मतदारसंघाप्रति असलेली उदासीनता आणि निष्क्रियता सातत्याने दिसून येत होती. परंतु, अंधारात कुणीतरी पाठीमागून येऊन आपल्याला भीती घातल्यावर जो धक्का बसतो, तसा धक्का सत्ता हातातून निसटल्यावर ठाकरेंना बसला आणि त्यानंतर आदित्य यांच्या वरळीच्या गल्ल्यांमध्ये फेर्‍यांमध्ये वाढू लागल्या आहेत. कधी शिमगोत्सव, कधी कुठलीही पार्श्वभूमी नसताना घेतलेली जाहीर सभा, दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवात मारलेला फेरफटका यातून काही ना काही कारण काढून ठाकरे आता वरळीत फेर्‍या मारू लागले आहेत.
 
३ वर्षांनंतर ‘कोस्टल’ची पाहणी
 

आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) उण्यापुर्‍या तीन वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांना सर्वाधिक रोष सहन करावा लागला, तो वरळीतील ‘कोस्टल रोड’ प्रकल्पामुळे. वरळी-कोळीवाड्यातील मासेमारी करणार्‍या स्थानिकांचा या प्रकल्पातील जाचक आणि त्रासदायक अटींना विरोध होता. आपल्या मागण्या घेऊन स्थानिक मासेमार आणि कोळीसमाज आदित्य ठाकरेंकडे पाठपुरावा करण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. परंतु, त्यांचा आवाज कधी पोलीस बळाने तरी कधी बैठकांमध्ये दामदडपशाही करून दाबण्याचेच काम ठाकरेंकडून करण्यात आले, असा आरोप वरळीकर करतात. मात्र, फडणवीस-शिंदेंनी ठाकरेंच्या हातून अपघाताने मिळालेली सत्ता खेचून घेतल्यावर आदित्यांना ‘कोस्टल’ बाधितांच्या प्रश्नांची जाणीव झाली आणि ते ‘कोस्टल रोड’ची आणि प्रकल्पबाधितांची पाहणी करायला दाखल झाल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले. तीन वर्षे प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष केलेल्या स्थानिकांच्या समस्यांवर फुंकर घालण्यासाठी आल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करणार्‍या आदित्य ठाकरेंना आजही कोळी बांधवांच्या कमालीच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून संभाव्य राजकीय समीकरणे काय असतील याचा अंदाज सर्वसामान्य मुंबईकर बांधू शकतो.
 
उरले सुरलेही शिवसेनेच्या वाटेवर?


२०१९ मध्ये आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) आमदारकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी माजी मंत्री सचिन अहिर आणि आमदार सुनील शिंदेंचा राजकीय बळी देण्यात आला होता. विद्यमान असलेल्या सुनील शिंदेंना आपली आमदारकी आदित्यसाठी सोडावी लागली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या अहिरांनादेखील शब्द देऊन वरळीत आदित्य ठाकरेंना आमदार करण्यासाठी सगळे रस्ते मोकळे करण्यात ठाकरे यशस्वी झाले होते. कालांतराने अहिर आणि शिंदेंना आमदारकी देण्यात आली. परंतु, आता ती मंडळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा दबक्या आवाजात का होईना, पण वरळी आणि शिवसेना भवनसोबतच विधान भवनातही ऐकू येत आहे. आधी आमदार मग खासदार मग पदाधिकारी आणि अखेरीस वरळीतील स्थानिक शिवसैनिकांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता आदित्य ठाकरेंना या दोन आमदारांचा मोठा पाठिंबा आहे. पण जर ही मंडळी येत्या कालावधीत शिवसेनेत डेरेदाखल झाली, तर वरळीत निवडणूक न लढवता उरलीसुरली इभ्रत वाचविणे, हाच ठाकरेंसमोरचा एकमेव पर्याय असणार आहे.
 
‘आता धडाडणार मुख्यमंत्र्यांची तोफ’ 

 
पक्ष आणि चिन्ह हातातून गमावल्यानंतर खेडमध्ये झालेल्या सभेत माजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप शिवसेना युतीसह केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवरही असभ्य शब्दांमध्ये टीका केली होती. तसेच स्थानिक आमदार योगेश कदम आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यावरही शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्याला आता उत्तर देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री दि.१९ मार्च रोजी मैदानात उतरणार असून तीच जागा आणि तीच वेळ निश्चित करून एकनाथ शिंदे आपल्यावर झालेल्या आरोपांवर ठाकरेंना प्रत्युत्तर देणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समाजमाध्यमातून दिली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121