विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा आज होणार गौरव

‘गेट वे ऑफ इंडिया’ला महिला दिनानिमित्त ‘मल्टिमीडिया लाईट अ‍ॅण्ड शो’

    08-Mar-2023
Total Views |
'Multimedia Light and Show' on the occasion of Women's Day at 'Gateway of India'


मुंबई: पर्यटन विभाग आणि ‘इंडियन ऑईल’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टिमीडिया लाईट अ‍ॅण्ड शो’च्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले आहे. या दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
मंत्री लोढा म्हणाले की, “स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या भिंतीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा ‘मल्टिमीडिया लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’ दि. २८ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दि. ८ मार्च रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे रात्री ८ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांची माहिती देणारा पाच ते दहा मिनिटांचा ‘मल्टिमीडिया लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’ यावेळी होणार आहेत. तसेच, महिला आणि बालविकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणार्‍या महिलांचा सत्कार होणार आहे.

 ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारां’चे वितरण या दिवशी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिला आणि क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, ‘इंडियन ऑईल’चे कार्यकारी संचालक बी. एन. दास, पर्यटन विभागाच्या उपसचिव उज्ज्वला दांडेकर यावेळी उपस्थित होत्या.
 
 
महिलांसाठी फिरते कौशल्य विकास केंद्र आणि फिरते स्वच्छतागृह ठरणार वरदान!

 
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “मुंबई उपनगरमध्ये महिलांसाठी फिरते कौशल्य विकास केंद्र तसेच, फिरते स्वच्छतागृह हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर आयोजित केला आहे. हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला, तर इतर महानगरातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.”

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.