मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, दि. ३० जून ते दि. १८ जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. अधिवेशनाच्या कालावधीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी विधानभवनात गुरुवार, दि. २६ जून रोजी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, दि. २९ जून रोजी, प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.
या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, तसेच सत्ताधारी व विरोधक पक्षांचे नेते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांनी अधिवेशनाच्या कामकाजाची माहिती दिली.
यंदाच्या अधिवेशनात शालेय शिक्षणातील भाषेचे धोरण, महामार्ग प्रकल्पांमधील भूसंपादन, शेतकरी विषयक योजना, आणि कर्जमाफीची अंमलबजावणी हे काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत येण्याची शक्यता आहे. याशिवाय पावसाळ्याशी संबंधित तयारी, पूरनियंत्रण, पिकविमा आदी स्थानिक विषयांवरही चर्चा होणार आहे.