विश्वाचे अभिराम - प्रभू श्रीराम!

    29-Mar-2023
Total Views |
 
Shri Ram Navami
 
 
आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी. त्यानिमित्त विश्वाचे अभिराम मर्यादापुरुषोत्त्म प्रभू श्रीराम यांच्या अलौकिक कर्तृत्वाचे, पुत्र-पिता-पती अशा सर्वच नातेसंबंधांप्रति त्यांच्या समर्पण आणि निष्ठेचे चित्रण करणारा हा लेख...
 
भारतीय संस्कृतीच्या आदर्श पाऊलखुणा अगदी ठळकपणे उठून दिसतात, त्या असंख्य थोर महापुरुषांच्या प्रेरक जीवनगाथांमुळे. अशा पुण्यवंत नरोत्तमांच्या तेजोमेय गगनमंडळी अगदी उज्ज्वल चमकणारे दिव्य नक्षत्र म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र हे होय.
 
श्रीरामांचे समुज्ज्वल चरित्र म्हणजे साक्षात जगन्नियंत्या परमेश्वराकडून समग्र जगाला लाभलेले एक अभूतपूर्व वरदान. या निर्मल व्यक्तिमत्त्वाच्या उदात्त जीवनाचे कोणत्याही नेत्रभिंगातून अवलोकन करा. चहुकडून दृष्टीस पडेल, तो फक्त आदर्श मानवी मूल्यांचा अथांग सागर. त्यांच्या आद्योपांत जीवनगंगेतून सतत खळाळत राहतो तो पावन निर्झर. असंख्य युगे लोटली, काळ बदलला, नवपरिवर्तने घडून आली, तरी पण श्रीरामांचे मर्यादापूर्ण जीवन या समग्र विश्वाला सतत सतत प्रेरणा देत राहील. म्हणूनच की काय, या पुण्यप्रद प्रेरक रामकथेविषयी एका सुभाषितकाराने तितक्याच दृढ विश्वासाने म्हटले आहे-
 
यावत्स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले। तावद्रामायण-कथा लोकेषु प्रचरिष्यति॥
 
म्हणजेच जोपर्यंत या भूमंडळावर पर्वत उभे असतील आणि नद्या वाहत राहतील, तोपर्यंत रामायण कथा लोकांमध्ये प्रसारित होतच राहील.
 
सध्याच्या संक्रमण युगात प्रभू श्रीरामांचे पावन जीवन हेच समग्र विश्वाच्या नवनिर्मितीसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणारे आहे. अगदीच बालपणापासून ते जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांच्या जीवनपटावर दृष्टिक्षेप टाकला, तर आपणांस असे लक्षात येते की, त्यांनी कधीही आपल्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. त्यांचा ब्रह्मचर्य आश्रमाचा म्हणजेच विद्यार्थीजीवनाचा काळ घ्या की, गृहस्थाश्रमाचा, पुत्राच्या रूपातील आई-वडिलांचा आज्ञापालक असो की, राजाच्या या रूपातील आदर्श प्रशासक असो अथवा त्यांचे इतर कोणतेही रूप डोळ्यासमोर ठेवा, त्यांच्या आद्योपांत जीवन प्रवासातील सर्वच बाबी उत्तमोत्तम असल्याचे निदर्शनास येते. आज्ञाधारक पुत्र, सेवाभावी शिष्य, कर्तव्यपरायण पति, प्रजावत्सल राजा, प्राणप्रिय भ्राता, जीवश्च कंठश्च मित्र. अहो, इतकेच काय तर उदार व गुणग्राही शत्रूदेखील, अशा विविध गुणवैशिष्ट्यांमुळे श्रीरामांचे जीवन अखिल मानवसमूहासाठी प्रेरणेचा वटवृक्ष वाटतो. आयुष्याच्या कोणत्याही क्षणी ते कर्तव्यापासून कधीही दुरावले नाहीत. परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल, कर्मनिष्ठेच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. म्हणूनच त्यांना प्रदान करण्यात आलेले ‘मर्यादापुरुषोत्तम’ हे विशेषण हे आजतागायत इतर कोणालाही लागू पडत नाही. इतक्या उच्च आदर्शांनी समग्रर भूमंडळावर शोभिवंत ठरणारे दिव्योत्तम व्यक्तिमत्व म्हणजे फक्त आणि फक्त श्रीरामच!
 
खरेतर जगातील पहिले आर्ष महाकाव्य कोणाच्या नावाने रचले गेले असेल? तर ते श्रीरामांच्याच नावाने. महर्षी वाल्मिकींसारखे तपस्वी ऋषी हे आद्यकवी. त्यांच्यात जेव्हा काव्यनिर्मितीची दिव्य प्रतिभा जागृत झाली, तेव्हा त्यांना प्रश्न पडला की, आपण कोणाचे काव्य रचावे? मग त्यांनी असंख्य सत्पुरुषांचा धांडोळा घेतला. यासंदर्भात अनेकांना विचारपूस केली. त्यातच मुनिश्रेष्ठ नारद भेटले. त्यावेळी त्यांना वाल्मिकी आपल्या चरित्रनायकाविषयी विचारणा करीत म्हणतात-
 
को न्वस्मिन् साम्प्रतं लोके
गुणवान् कश्च वीर्यवान्
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रती ॥
 
म्हणजेच सध्या या जगात गुणसंपन्न, शौर्ययुक्त, धर्मज्ञानी, कृतज्ञ, दृढव्रती, सत्यवादी, चारित्र्यसंपन्न, सर्व प्राणिमात्रांचे हित साधण्यात कार्यतत्पर, विद्वान, क्रोधावर विजय मिळविणारा, सर्वसामर्थ्यवान, कोणाची निंदा न करणारा आणि प्रियदर्शनी व्यक्ती कोण आहे? ज्ञातुमेवविधं नरम्? म्हणजेच अशा व्यक्तीला मी जाणू इच्छितो, जो की वरील गुणांनी परिपूर्ण आहे.
 
तेव्हा नारदांनीदेखील उत्तर देत म्हटले-
 
मुने वक्ष्याम्यहं बुद्ध्वा तैर्युक्त: श्रूयतां नर:!
 
 
मुनिश्रेष्ठ, मी निश्चयपूर्वक आपणांस अशा माणसाविषयी सांगू इच्छितो, ते आपण ऐकावे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, या दोन्ही मुनिवृंदांनी श्रीरामांसाठी ‘नर:’ या शब्दाचा प्रयोग केला आहे. यातून राम हे नर (महा)मानव होते, हे आपणांस दृष्टीस येते. अर्थातच ते एक श्रेष्ठ असे महामानव होते.
 
वाल्मिकींनी विचारलेले युगपुरुष कोण आहेत? याचे उत्तर देताना मुनिवर्य नारद म्हणतात-
 
इक्ष्वाकुवंशप्रभवो राम नाम जनै: श्रुत:।
नियतात्मा महावीर्यो द्युतिमान् धृतिमान् वशी॥
 
 
म्हणजेच इक्ष्वाकु वंशात जन्मलेले आणि सर्वत्र, सर्व लोकांमध्ये ‘राम’ या नावाची ख्याती असलेले एक महान राजे आहेत. ते नियत आत्मा, महावीर्य, श्रुतिमान, धृतिमान व सर्व इंद्रियांना वशीभूत ठेवणारे आहेत. त्याचबरोबर मुनी नारद हे श्रीरामगुण-वर्णन करताना पुढे म्हणतात, “श्रीराम हे बुद्धिमान, नीतिमान, वाग्मी, श्रीमान, शत्रुसंहारक, धर्मज्ञानी, सत्यसंध, प्रजाहितदक्ष, यशस्वी, ज्ञानसंपन्न व पवित्र आहेत. तसेच श्रीरामांचे शारीरिक बळदेखील तितकेच सर्वोच्च आहे. त्यांचे खांदे विशाल आहेत. दोन्ही भुजा बलशाली तर मान ही शंखासारखी आहे. तसेच हनुवटी विस्तृत आहे. वक्षस्थल हे विस्तारलेले आहे आणि त्यांचे डोळे मोठ्या आकाराचे आहेत. असे हे सर्वगुणसंपन्न श्रीराम सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत. शत्रूंचा नायनाट करणारे आणि समस्त प्राण्यांचे रक्षण करणारे ते धर्मरक्षक व निराश्रितांना आधार देणारे पतितपावन राम. त्यांच्या ज्ञानाविषयी तर काय सांगावे? ते वेदादी शास्त्रांमध्ये निपुण, तर धनुर्विद्येत पारंगत आहेत. ते सर्व शास्त्रांचे तत्त्वज्ञान चांगल्या प्रकारे जाणणारे आहेत. याबरोबरच त्यांची स्मरणशक्ती ही अतिशय तीव्र व सूक्ष्म असून ते प्रतिभाशाली आहेत.
 
असे हे सर्वलोकप्रिय, सुस्वभावी, दीन-दुःखितांचे दुःख व कष्ट हरणारे आणि दैन्य दारिद्य्रापासून सर्वदृष्ट्या दूर असलेले श्रीराम. त्यांच्याविषयी थोडक्यात सांगावयाचे झाले, तर ते आदर्शांचे प्रतीक आहेत. याहीपेक्षा पुढे जाऊन उपमा अलंकाराचा आधार घेत नारद म्हणतात, ’श्रीरामांमध्ये हिमालयासारखे धैर्य, समुद्रासारखे गांभीर्य, विष्णूसारखे बळ, चंद्रासारखी शीतलता व सुंदरता, फुलांसारखी कोमलता आणि वज्रासमान कठोरता आहे. श्रीराम जेव्हा शत्रूंवर कोपतात, तेव्हा त्यांचा क्रोध हा कालाग्नीप्रमाणे भासतो, पण याउलट त्यांच्या क्षमाशीलतेलादेखील मर्यादा नाहीत. ते सर्वसहा पृथ्वीप्रमाणे क्षमावान आहेत. दानशूर तर इतके की साक्षात् ते कुबेरच! सत्याचरणाच्या बाबतीत तर ते जणू काही धर्मच. अशा प्रकारचे श्रीरामांचे शारीरिक, चारित्रिक आणि बौद्धिक गुण अतिशय मोलाचे ठरतात. त्यानंतर मुनिश्रेष्ठ नारदांनी रामराज्याच्या आदर्श व्यवस्थेचे वर्णन केले. थोडक्यात सांगायचे म्हणजे, श्रीराम हे वेदप्रतिपादित मर्यादांचे पालक होते. त्यांची जीवनगाथा ही सर्वदृष्ट्या मानवी मूल्यांचे अधिष्ठान स्वीकारून त्यानुसार चालणारी व विशुद्ध वैदिकज्ञानाला प्रमाण मानून वाटचाल करणारी होती.
 
अशा प्रकारच्या या दशरथनंदन श्रीरामांचे विस्तृत चरित्र जाणून महर्षी वाल्मिकी हे गंगेच्या निकटवर्ती असलेल्या तमसा नदीच्या तटावर भ्रमण करीत असता त्यांना एक दृश्य दिसले, जे की त्यांना खूपच व्याकूळ करणारे ठरले. क्रौंच नावाच्या पक्ष्याची जोडी तेथे क्रीडा करीत असता एका क्रूर पारध्याने त्यांवर निर्दयपणे बाण चालविला. त्यामुळे नर क्रौंच जागीच मारला गेला आणि मादी क्रौंची हे दृश्य पाहून करुण स्वराने विलाप करू लागली. हे अतिशय कारुण्यप्रद दृश्य पाहून वाल्मिकींच्या मुखातून सहजच करुणरसाने युक्त एक श्लोक बाहेर पडला. हाच तो मानवनिर्मित संस्कृत काव्याचा पहिला आर्ष श्लोक होय, जो की खालीलप्रमाणे आहे-
 
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा:।
यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधी: काममोहितम्॥
 
 
‘अनुष्टुप’ छंदातील हा श्लोक चार पदांनी युक्त होता. समान अक्षरांची व तंत्री लयाने परिपूर्ण अशी ही श्लोकरचना खूपच मौलिक ठरली. कारण, याच श्लोकामुळे रामायण हे महाकाव्य उदयास आले. म्हणूनच स्वतः वाल्मिकी म्हणतात-
 
शोकार्त्तस्य प्रवृत्तो मे श्लोको भवतु नान्यथा!
 
 
शोकाकुल हृदयातूनच या श्लोकरुपी काव्याचा जन्म झाला आहे. कारण, करुण रसाचा स्थायीभाव ’शोक’ हाच होय.
संपूर्ण रामायण म्हणजे महर्षी वाल्मिकींना मुनिश्रेष्ठ नारदांनी दिलेल्या प्रश्नांची विस्तारित अशी उत्तररूपातील आदर्श जीवनगाथा होय. नारदांनी रामांविषयीची जी जी गुणवर्णने अभिव्यक्त केली आहेत, त्याचाच विस्तार म्हणजे संपूर्ण रामचरित्र. प्रभू श्रीरामाच्या जीवनातील एकेक प्रसंग मुनी नारदांच्या उत्तरातून मांडले गेले आहेत. यातील काही मोजके प्रसंगदेखील युगानुयुगे नवी दिशा व चालना देण्याचा प्रयत्न करणारे आहेत. सध्याच्या विषम परिस्थितीत, तर श्रीरामजीवन प्रसंग म्हणजे जगातील प्रत्येक मानवासाठी प्रेरणेचे अमृतबिंदू ठरतात.
 
श्रीरामांची थोर कीर्ती ही आम्हाला केवळ त्यांच्या आदर्श मातृपितृभक्तीतून सर्वात आधी दृष्टीस पडते. आपले पिता दशरथ व तिन्ही मातांसमवेत श्रीरामांचा व्यवहार हा अतिशय प्रेमळ, सुस्वभावी आणि एकसमान होता. जेव्हा मंथरा दासीने राणी कैकयीला रामाच्या राज्याभिषेकाची सूचना दिली, तेव्हा अतिशय आनंदित होऊन महाराणी कैकयी म्हणाली, “माझ्यासाठी भरत जसा प्रिय, त्याहीपेक्षा मला राम अधिक प्रिय आहे. कारण, ‘कौशल्यातोऽतिरिक्तं च स तु शुश्रूषते हि माम्।’ रामाने कौशल्येपेक्षा माझी अधिक सेवा केल्याने तो मला भरतापेक्षाही प्रिय आहे.”
 
रामाचे पितृवात्सल्य केवढे उदार होते पाहा? वनवासाला पाठवण्यासाठीची आज्ञा दुःखाने व्याकूळ झालेले राजा दशरथ जड अंत:करणामुळे देऊ शकत नाहीत की त्यांच्या मुखातून शब्दही बाहेर पडत नाहीत. अशावेळी माता कैकयीने दशरथाची भावना व्यक्त करण्याविषयी रामाला विचारले, तेव्हा रामांनी क्षणाचाही विलंब न लावता जे काही उद्गार काढले, ते पित्याच्या साधनेला शिरोधार्य मानण्याचा परमोच्च आदर्श होता. राम म्हणतात-
 
अहं हि वचनाद्राज्ञ: पतेयमपि पावके।
भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चार्णवे॥
तद् ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकांक्षितम्। करिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते॥
 
 
(अयोध्या कांड-18/29,30)
 
हे माते! मी महाराजांच्या आज्ञेने जळणार्‍या आगीतदेखील उडी घेऊ शकतो. भयंकर असे विषदेखील
प्राशन करू इच्छितो. तसेच समुद्रातदेखील उडी घेतो. म्हणूनच सांग आई! राजे काय म्हणू इच्छितात? मी त्यांचे वचन पूर्ण करण्याची आताच दृढप्रतिज्ञा करतो. कारण, राम हा एकदाच बोलतो, दोन वेळा कधीच बोलत नाही. जे काही म्हणतो, त्याला पूर्ण करूनच टाकतो. पितृभक्तीचा किती मोठा उच्च आदर्श आहे हा! वडिलांच्या आज्ञेपोटी स्वतःला संपवणारा पुत्र आज शोधूनही सापडणार नाही.
 
इतकेच काय जेव्हा कैकयीने रामाच्या वनवासाची गोष्ट बोलून दाखविली, तेव्हा रामाची अवस्था एखाद्या महान स्थितप्रज्ञासारखी होती, हे सांगताना महर्षी वाल्मिकी स्वतःहून म्हणतात-
 
आहूतस्याभिषेकाय विसृष्टस्य वनाय च।
न मया लक्षितस्तस्य स्वल्पोऽप्याकारविभ्रम:॥
 
 
राज्याभिषेकास बोलावले असता आणि वनाला जाण्याकरिता निरोप देत असता (या दोन्ही अनुकूल किंवा प्रतिकूल प्रसंगी) रामचंद्रांच्या चेहर्‍यावर मी थोडाही वेगळेपणा भासला नाही. राज्यप्राप्तीचा आनंद किंवा वनगमनाबाबत छोटीशीसुद्धा छटा चेहर्‍यावर अजिबात दिसली नाही. दोन्ही प्रसंगी समदृष्टी होती. यावरून हे लक्षात येते की, श्रीरामांमध्ये किती उच्चप्रतीची सहनशीलता व प्रखर धैर्यवृत्ती होती.
 
प्रभू श्रीरामांचे भक्त असलेल्या वर्तमान रामभक्तांमध्ये काय इतकी उत्कट आदर्श पितृभक्ती दृष्टीस पडेल? जर आम्ही आमच्या आई-वडिलांची सेवा-सुश्रूषा करीत नसू आणि त्यांना थेट वृद्धाश्रमाची वाट दाखवत असू, तर आम्हांस श्रीरामांचे नाव घेण्याचा काय अधिकार? श्रीरामांचे जीवन हे तर मात्यापित्यांच्या भक्तीचे आदर्श उदाहरण आहे. 14 वर्षांचा तो कठोर वनवास, हिंस्र श्वापदांनी भरलेली ती भयावह आणि कंटकाकीर्ण अशी वनयात्रा. कंदमुळे व फळे खाऊन आणि नद्यांचे पाणी पिऊन पर्णकुटीतील तो कष्टप्रद अधिवास! थंडी, ऊन, वारा, पाऊस आदी सर्व काही सहन करीत एकच कर्तव्यभावना अंगी बाळगत प्रसन्न वदनाने वनी वावरणारे ते युगपुरुष आणि त्यांची ती अर्धांगिनी सीता व सेवेत तत्पर असलेला तो लक्ष्मण हा लहान भाऊ. तिकडे अयोध्येतील नंदीग्रामात एखाद्या तपस्व्याप्रमाणे जगत प्रजेची पुत्रवत सेवा करणारा प्रिय भरत आणि हे सर्व घडले आहे, ते केवळ या पवित्र भारतभूमीतच.
 
आपलेही भाग्य की, इतक्या महान सर्वश्रेष्ठ मर्यादापुरुषोत्तमाच्या पावनभूमीत जन्माला आलो. पुराणकारांनीदेखील म्हटले आहे- धन्याऽस्तु ते भारतभूमिभागे! पण, श्रीरामांचे चरित्र हे केवळ भारतापुरतेच किंवा एतद्देशीयांपुरतीच मर्यादित नाही, ते तर समग्र विश्वातील प्रत्येक राष्ट्रात वसणार्‍या मानवासाठी आहे, मग तो हिंदू असो की मुस्लीम, इसाई असो बौद्ध , पारशी असो शीख, चिनी असो की अमेरिकी. कोणीही असो. जो कोणी मानव आहे, त्यासाठी प्रभू श्रीराम आणि त्यांचे उज्ज्वल व्यापक जीवन.
आज केवळ भारतातच नव्हे, तर समग्र जगात अविचारांचे काहूर माजले आहे. माणसाला माणूस म्हणून ओळखले जात नाही. कुटुंबे उद्ध्वस्त होत चालली आहेत. पिता-पुत्र, माता-पुत्र, बहीण-भाऊ, गुरु-शिष्य, राजा-प्रजा, व्यक्ती-समाज, व्यक्ती-राष्ट्र हे सर्व संबंध आज नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. माणसांच्या अंत:करणातून माणुसकी, प्रेम, दया, वात्सल्य, करुणा, सहिष्णुता या सर्व गोष्टी नष्ट होत चालल्या आहेत. अशा या वातावरणात प्रभू श्रीरामांचे चरित्र आम्हा सर्वांचे जीवन विकसित करण्यास अमृतवल्ली ठरणारे आहे. आज खर्‍या अर्थाने गरज आहे ती श्रीरामांच्या सत्चारित्र्याचे पालन करण्याची. नितांत आवश्यकता आहे ती भूमंडळीच्या या नक्षत्रासमान तेजस्वी महापुरुषाचे उदात्त, व्यापक, सर्वमंगलमय असे चरित्र अंगीकारण्याची. चला तर मग जगातील प्रत्येक मानवाचे समग्र कल्याण साधण्यासाठी आणि विश्वात शांतता प्रस्थापित करण्याच्या पवित्र उद्देशाने मानवतेचे मंदिर उभारुया.
 
- प्रा. डॉ.नयनकुमार आचार्य
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.