भारतीय बँकिंगची सरशी

    23-Mar-2023
Total Views |

Narendra Modi



भारतीय बँकांची सरशी उचित राजकीय धोरणांची व त्याच्या शिस्तबद्ध अंमलबजावणीची फलश्रुती आहे. यातले महत्त्वाचे चार-पाच घटक समजून घेतले, तरी ही प्रक्रिया समजू शकते.


नरेंद्र मोदींना कोणीही ‘बँकिंग’ या विषयातले तज्ज्ञ म्हणून ओळखत नाही. तसे ओळखले जावे अशी त्यांची किंवा त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा नाही. त्यांच्या विरोधकांना त्यांना पराभूत पाहाण्याशिवाय दुसरे काहीही झालेले चालणार नाही. मोदींच्या विरोधात ज्या निरनिराळ्या मोहिमा चालवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यात प्रमुख मुद्दा होता मोदींचे अर्थविषयक ज्ञान. रिझर्व्ह बँकेच्या माजी गर्व्हनरांपासून ते पोंगा पंडित अर्थतज्ज्ञांपर्यंत अनेकांनी याविषयी आपले ज्ञान पाजळले. यातले काही राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होऊन पावन झाले आणि त्यांचे खरे रूप लोकांसमोर आले. मोदी हे अर्थशास्त्र, बँकिंग यातले काहीच न कळणारे राजकारणी असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वच वित्तीय संस्था देशोधडीला लागणार आहेत, असा एक ‘नॅरेटिव्ह’ बिंबविण्याचा प्रयत्न झाला. हा ‘नॅरेटिव्ह’ किती पोकळ होता, हे आता हळूहळू सिद्ध होत आहे. या मंडळींचे दावे किती खोटे होते व ते नुसते खोटे नसून ते पूर्वग्रहदुषितही होते, हे परवाच्या ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ या रघुराम राजन यांच्या विधानावरून लक्षात येते.

राजन हे अर्थतज्ज्ञ. मात्र, देशाचा ‘जीडीपी’ कसा मंदावला, हे दाखविण्यासाठी त्यांनी केवळ तीन महिन्यांचे आकडे टाकले आणि एक भयगंड निर्माण करण्याचा प्रयत्न निर्माण केला. त्यातून झाले काहीच नाही. पण, हे लोक किती दांभिक आहेत, हे मात्र नक्की कळले. याच राजन यांच्या काळात बँकांमधील गैरव्यवहारांनी कळस गाठला होता. सरकारीच काय, पण ‘येस बँके’सारख्या खासगी बँकेमध्येसुद्धा गडबडी समोर आल्या होत्या.मोदींनी भारतीय बँकांच्याबाबतीत फक्त एकच गोष्ट केली ती म्हणजे, ‘एनपीए’ ही टर्म त्यांनी ठिकठाक करून घेतली आणि ती ठीक राहिली पाहिजे, अशी सक्त ताकीदच दिली. पर्यायाने आज अमेरिकेसारख्या वित्तीय गोष्टीवर टिकून असलेल्या देशालाही सदोष बँकिंगमुळे दम लागला आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय बँकिंग आणि त्याचे पोषण करणार्‍या व्यवस्थांमध्ये काही मूलभूत बदल झाले आहेत. त्याचे चार-पाच निकष आहेत, ज्याच्यामुळे आपले बँकिंग क्षेत्र तगले आहे, चांगल्या प्रकारे वाटचाल करीत आहे. परकीय वित्तीय संस्थांचे दावे हा त्यातला महत्त्वाचा भाग.


 स्टेट बँकेच्या ‘इकोनॉमिक रिसर्च रिपोर्ट’नुसार भारतीय बँकांमधील परकीय वित्तीय संस्थांचा दावा युरोपच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. अमेरिका व युकेवरचा हा दावा ४ हजार, ३४५ अब्ज डॉलरच्या पुढचा आहे. बँकिंग व्यवसायातील शिस्तीचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. भारतीय बँकांची भांडवली स्थितीही चांगली आहे. गांधी परिवाराच्या नादी लागून ‘येस बँके’सारख्या मोठ्या बँकेनेही अवलक्षण दाखविले असले तरी त्यांच्यासारख्या अन्य कर्जदात्यांनीही आपली स्थिती ठीक ठेवली आहे. भारतीय बँकांची भांडवली स्थिती सातत्याने सुधारत असल्याचेही विद्यमान आकडे सांगतात. ‘एनपीए’ हा बँकिंगमधील महत्त्वाचा घटक. सप्टेंबरमध्ये हा आकडा पाच टक्के होता.


१०.८ टक्क्यांवरून हा आकडा इथवर आला आहे. अत्यंत कडक पद्धतीने केलेल्या कर्जवाटपाचा आणि बुडणार्‍या आकड्यांचा ठीकठाक ताळमेळ बसविल्यामुळे हे शक्य झाले आहे. ‘पीसीआर’ म्हणजेच ‘प्रोव्हिजनल कव्हरेज रेशियो’ हा देखील भारतीय बँकांच्या संदर्भात उत्तम आहे. ‘एनपीए’ म्हणजेच ‘नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट’ यातूनच बँका अडचणीत येतात. कर्ज घेऊन बुडविण्यातून हे सारे आकाराला येते. या धोक्यापासून वाचण्यासाठी बँका स्वत:चा म्हणून एक निधी तयार ठेवत असतात. भारतीय बँकांच्या बाबतीत हा टक्का आज ७१.५ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. अमेरिकन बँकांच्या समोरचा सगळ्यात मोठा धोका हा वाढलेल्या व्याजदाराचा होता, यातून मोठा तोटा या बँकांना झाला.


 भारतात व्याजाचे दर या बँकांच्या तुलनेत वाढलेले नाहीत. या सगळ्याच्या मुळाशी असलेले व्यवहार ज्ञान आणि व्यवस्थाकेंद्रित संचालन यामुळे आपल्या बँकांना एक शिस्त लागली आहे. अर्थात, या सगळ्या गोष्टी आशादायी असल्या आणि ‘भारत प्रथम’ विचार करणार्‍या कोणत्याही भारतीयाला आश्वासक वाटाव्या अशा असल्या, तरी नव्या भारताच्या नव्या आव्हानांना तोंड देऊ शकणार्‍या बँकिंग व्यवस्थांची उभारणी, हे खरे आव्हान असेल.

नवे उद्यमी, या उद्यमींच्या आधारावर निर्माण होणारी अर्थचक्रे, त्यांच्या लहानमोठ्या वित्तीय गरजा, या गरजा वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान, अशा कितीतरी गोष्टी भारतीय बँकांना करणे आवश्यक आहे. ‘भारत पे’ किंवा ‘भीम’ अ‍ॅपसारख्या पुढाकारातून रोखीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर औपचारिक माध्यमातून होत आहेत. म्हणजेच या पैशाचा माग काढणे सोपे झाले आहे. ही चपळता आपल्याला गृहकर्जासारख्या दुसर्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणार्‍या उद्योगांसाठी निर्माण करता आली, तर कितीतरी नवी दालने उघडताना दिसतील. ही सारी देशांतर्गत आव्हाने आहेतच. पण, जगाच्या शर्यतीत आपण काहीसे का होईना, पुढे आहोत हेही नसे थोडके! अमेरिकेतल्या या लडखडत्या बँकिंग संस्था कोणा भारतीय बँकांनीच विकत घेतल्या, तर नवल वाटू नये!



 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.